सप्तशती गुरूचरित्र

हे टेंबे स्वामी लिखित सप्तशती गुरुचरित्र आहे. त्याची एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. श्री टेंबेस्वामींची अफाट प्रतिभा यातून दिसुन येते. श्रीसप्‍तशतीगुरुचरित्र वाचल्याने गुरूचरित्र वाचल्याचेच समाधान आणि पुण्य मिळते.


अध्याय पस्तीसावा

मंत्रोपदेश द्या मला । तेणें नित्य स्मरुं तुम्हांला । गुरु म्हणे स्त्री मंत्राला । पात्र न तिला पतिसेवा ॥१॥

अवश्य ऐकें ही कथा । देवी दैत्यां रणीं मारितां । तयां संजीवनी जपतां । वांचवितां होय भार्गव ॥२॥

अचिन्त्य मंत्रविद्याशक्ती । इंद्र सांगे शिवाप्रती । आणवून शुक्राप्रती । उमापती भक्षीतसे ॥३॥

तो त्याचे मूत्रद्वारा । पडे वांचवी पुनः क्रूरां । बृहस्पती म्हणे इंद्रा । बुडवू मंत्र षटकर्णेशी ॥४॥

असें तया बोलून । स्वसुता कचा दे धाडून । कपटी शिष्य होवून । शुक्रा सेवून तो राहे ॥५॥

न वासः शुभदो नोऽस्य । असे मानुनी दैत्य । मारिती त्या वांचवी काव्य । द्विवार कन्यास्नेहें ॥६॥

दैत्य यत्‍नें त्या जाळून । त्याचें भस्म मद्यातून । देती शुक्र पी नेणून । मग कन्था विरहें रडे ॥७॥

शुक्रदाही दिशा देखे । शेखीं कचा पोटीं देखें । म्हणे देवयानी ऐकें । त्या आणितां मी मरेन ॥८॥

कन्यादिव्यमंत्र मागे । म्हणे कचा वांचवीं वेगें । मग मी तूतें मंत्रयोगें । बापा वेगें वांचविन ॥९॥

देहा त्यजीन मी अन्यथा । अशी कन्योक्ति ऐकितां । आश्वासुनी मोहेंपिता । मंत्र देता झाला तिला ॥

तो मग जपे वाचार्थ । तो ये त्याचें फोडुनी पोट । कन्या ताता उठवीत । कचा क्षुत झाला मंत्र ॥११॥

मंत्रतंत्र प्रगट होता । तत्काल ये निर्वीयेता । शुक्रमंत्रा ये हीनता । आशा घेता झाला कच ॥१२॥

कन्या तेव्हां वरीं म्हणे । विद्या देऊनी दिल्हें जिणें । तूं भगिनी कच म्हणे । ती म्हणे विद्या विसर तूं ॥१३॥

कच जोरानें वदे तिला । विप्रावेगळा वरो तुला । शुक्र उपदेशी स्त्रीला । भ्रष्ट झाला मंत्र त्याचा ॥१४॥

ती द्विजपुत्री असतां । शापें झाली ययातिकांता । दोघां हानी मंत्र देतां । स्त्रिये ब्रता आचरावें ॥१५॥

ती मग म्हणे नाथा । व्रत एक सांगा आतां । गुरु म्हणे सोमव्रता । करितां सर्व सिद्धी होय ॥१६॥

हें सद्भावें करीं परम । आर्यावर्ती चित्रवर्म । तयासीमंतिनीनाम । हो उत्तम कन्यारत्‍न ॥१७॥

तियेस चौदा वर्षें होतां । ये वैधव्य हें कळतां । तिनें मैत्रेयी प्रार्थितां । सोमव्रता ती सांगे ॥१८॥

निश्चय मनीं धरुन । सोमवारीं उपोषण । किंवा नक्तभोजन । करिजे अर्चून गौरीशा ॥१९॥

दुरिते ही नाशा जाती । सौभाग्य सुत राज्यासी । दे शीघ्र गौरीपती । अर्चिता त्या प्रदोषीं ॥२०॥

हो दुःखित तरी व्रता । न सोडिजे सर्वथा । सीमंतिनी तें ऐकतां । करी व्रता दृढचित्ते ॥२१॥

दैवा लंघी कैसा कोण । चित्रांगदा ती देऊन । राजा गेहीं प्रेमें करुन । घे ठेवून त्या जामाता ॥२२॥

बुडे यमुनेत जामाता । कन्या प्राण त्यजूं उठता । वारुनि घरान्हें पिता । तरी व्रता ती न सोडी ॥२३॥

महच्चक्र काळाचें हें । कोणाचेनी दूर नोहे । तीचा श्वशुर शोकीं स्नेहें । त्या बांधून घे शत्रु राज्य ॥२४॥

त्या इंद्रसेनसुता । पाताळी न्हेति राजसुता । जीववुनी वासुकी वार्ता । पुसे, सर्व सांगे तया ॥२५॥

तया मग सर्पनाथ । म्हणे तुझें कोण दैवत । येरु म्हणे गौरीनाथ । मद्दैवत जगदीश ॥२६॥

तो त्यासि राहे म्हणे । चंद्रागद पाठवा म्हणे । मद्विरहें माता शिणे । पत्‍नी जिणें वेचिलची ॥२७॥

तो हय सर्पा सवे धाडी । वेगें आला यमुनाथडी । तेथ सीमंतिनी खडी । पाहतां वेडी हो तयासी ॥२८॥

हो सच्चा कीं हा मत्पति । ऐसें जंव चिंती चित्तीं । तों येवून तो पुढती । वार्ता तिची पुसे तो ॥२९॥

संलग्नौ दासिन्यदीना । कोण ही ऐसें पुसतां खुणा । लाजुनी म्हणे सखीजनां । सर्व खुणा वदा ॥३०॥

सखी तया सर्व सांगे । तो वदे ईचा पति वेगें । भेटेल हें न वावुगें । आण घे शंकराची ॥३१॥

स्वसत्तेनें सोडवी ताता । मायबापांची हरी चिंता । सीमंतीनीसी भेटता । झाला व्रताच्या प्रभावें ॥३२॥

भला जोडा तो शोभला । येउनी राज्जीं आरुढला । असें व्रतें दे शिव भोला । फल तिला गुरु म्हणे ॥३३॥

हें सावित्री व्रत तूं करीं । तथा म्हणुनी ती स्वीकारी । निरोपें ये स्वमंदिरीं । धवासव नारी भेटे स्वका ॥३४॥

सुबुद्धि हो त्या दोघांची । जसी वाचा श्रीगुरुची । फलप्राप्‍ती तसी हो साची । तै दुःखाची कैंची वार्ता ॥

इति श्री०प०प०वा०स० सारे सीमंतिन्याख्यानकथनं नाम पंचत्रिंशो०