गणेश पुराण - उपासना खंड

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


अध्याय ४

सोमकांत राजाचा अरण्यवास

(गीति)

सूत ऋषींना कथिती, राजानें राज्य दीधलें सूता ।

ब्राह्मणपूजन करुनी, हय, गज धेनू पटादि धन देता ॥१॥

मोठे मोठे पंडित, आणिक सरदार थोर मानकरी ।

राजा परोपरीनें, सर्वांना योग्य योग्य सत्कारी ॥२॥

याउपरी तो राजा, वनवासाचे सुखास हो लाही ।

हें देखुनियां सारें, दुःखानें व्यापिलें जसें कांहीं ॥३॥

सारे दुःखित होउनि, न सुचे त्यांना घरांत उद्योग ।

बाळाचा मातेला, सोसत नाहीं वियोग उद्‌वेग ॥४॥

राजा वनांत निघतां, सकल प्रजाही तयास अनुसरली ।

युवराज तया मागें, चालुनी अवनी बरीच आक्रमिली ॥५॥

(दिंडी)

बहुत वृक्षांचें एक विपिन होतें । बहुत नामीसें एक तळें होतें ।

तया कांठीं हा सोमकांत राजा । उभा राहुनियां रयत बघे ओजा ॥६॥

रयत पाहुनियां सोमकांत बोले । क्षमा करणें हो बहु प्रमाद झाले ।

मदिय पुत्रावर प्रेम असों द्यावें । मदिय नांवाचें स्मरण असों द्यावें ॥७॥

अतां सर्वांनीं परत घरीं जावें । करिल पालन हा मदिय पुत्र भावें ।

पूर्वकर्मानें भोगणें असे प्राप्त । वना जाणें हें उचित अम्हां प्राप्त ॥८॥

(ओवी)

उदक आपली शीतता । अग्नी आपली उष्णता ।

सूर्य आपली प्रखरता । कधीं नाहीं सोडीत ॥९॥

तैसे राजे प्रजेसी । न सोडिती भरंशीं ।

आम्ही येतों सेवेसी । आपुल्या समागमें ॥१०॥

चंद्रावांचून आकाश । आपुलेवांचून राज्यास ।

शोभा न दिसे नयनांस । तैसें आम्हां वाटतें ॥११॥

अगाध सामर्थ्य तीर्थांमाजी । सेवितां होत देव राजी ।

शरीर कांती होतां ताजी । त्वरित येऊं नगरातें ॥१२॥

ऐसा प्रजेचा भाव पाहुनी । राजा दुःखित होत मनीं ।

प्रजेस पुनःपुनः विनवोनी । नगरीं जाण्या आज्ञापी ॥१३॥

हेमकंठ करुणवचनीं । आपुलें चरण मज अंतरुनी ।

राज्य न रुचे मम मनीं । अहो तात ऐकावें ॥१४॥

(गीति)

राजा पुत्रासि म्हणे, तुजला बहुसाळ मोह होईल ।

ऐसें जाणुन तुजला केला उपदेश मान्य करशील ॥१५॥

बापाच्या आज्ञेस्तव, मातेचा वध करी परशुराम ।

तैसेंच रामचंद्र, सोडुन राज्या करि वनांत आराम ॥१६॥

बापासमान रामा, मानुन आज्ञा वनांत सीतेला ।

सोडियलें सौमित्रें, मानुन परते मदीय आज्ञेला ॥१७॥

पांच अमात्यांपैकीं, तीघांसह राज्य रक्षि धर्मानें ।

तूं हें स्वीकारीं बा, दिधलें हें राज्य सर्व प्रेमानें ॥१८॥

ऐसें निक्षुन वदतां, सकल प्रजानन तसाच राजसुत ।

आणिक अमात्य सारे, परतुन गेले सखेद नगरांत ॥१९॥

जातेसमयीं नृपती पुत्राला वदतसे वरदवाणी ।

चतुरंगसैन्य घेउन, सव्य निघे हेमकंठ तूर्णपणीं ॥२०॥