गणेश पुराण - उपासना खंड

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


अध्याय ५

श्रीचवन ऋषींची भेट

(गीति)

सूत ऋषींना कथिती, राजासह राजपत्‍नि गमन करी ।

युवराज हेमकंठचि मातेला प्रेमाभाव नमन करी ॥१॥

नमन करुनियां तिजला, माते सोडूं नको असें वदला ।

तुम्हांसह मीं यावें, सेवावें नित्य तात नी तुजला ॥२॥

अपुल्या सेवेपासुनि, जें सुख लाधे तसें न राज्याचें ।

मजकरितां तातांची विनति करी मानतों असें साचें ॥३॥

नाथांना दुःखानें, शोकानें ही बहूत पीडियलें ।

निश्चय त्यांचा जाणुन त्वां परतावें असे मला दिसलें ॥४॥

पुत्रास वदे माता, पतिसेवा ही असे मला इष्ट ।

यासाठीं मी जात्यें, त्वां परतावें असें वदे स्पष्ट ॥५॥

यानंतर पुत्रानें मातेला नमन करुनि तोषविलें ।

नगरामध्यें येउन सकल प्रजेला मुदीतसें केलें ॥६॥

(साकी)

सकल प्रजाही आनंदानें युवराजा सत्कारी ।

युवराजाही प्रजाजनांना नानापरि देकारी ॥७॥

धृ० सुनो सुनों मुनिं हो चरित पुढें ऐका हो ।

हेमकंठ हे राज्य करीती साधुन पुरुषार्थासी ।

प्रजापालनीं दक्ष राहुनी मिळविति कीर्तीसी ॥८॥

इतुकें परिसुनि ऋषिवर्यांनीं सूतांना पुशियेलें ।

सोमकांत हा वनीं जाउनी पुढें काय काय केलें ॥९॥

सोमकांत हा पत्‍नीसह त्या वनामाजि चाले ।

त्यांच्या पुढती सुबल आणिक ज्ञानगम्य चाले ॥१०॥

परस्परांच्या सुखदुःखातें जाणुन तसेच होती ।

वनोवनीं हे चालत आले एक तडागावरती ॥११॥

त्यांतिल जलचर गजासारखे पाहुन थक्कचि होती ।

निर्मल जल हें सेवुन सारे शांत चित्तसे होती ॥१२॥

(पृथ्वी)

वनांत असती बहू तरुवरादि नाना लता ।

तशाच असती बहू खगकुलादि नाना जथा ।

तशींच असती बहू ऋषिकुलें हि गृहें बांधुनी ।

असें स्थल विलोकुनी पथिक तोषले ते मनीं ॥१३॥

पदीं गमन जाहलें म्हणुन ते बहू श्रांतले ।

म्हणून करिती इथें स्नपन ते मनीं तोषले ।

बहू क्षुधित ते फळें मुळंहि सेवुनी शांतले ।

प्रवासशमनार्थ ते क्षणभरी तिथें बैसले ॥१४॥

(भुंजगप्रयात)

प्रवासामुळें श्रांतला सोमकांत ।

तया झोप आली असे त्या वनांत ।

सुधर्मा सती बैसली पादसेवें ।

फळें शोधण्यासी अमात्यांनिं जावें ॥१५॥

(वसंततिलका)

राणीस भास्कर असा नयनांस भासे ।

तैसाच हा ऋषिकुमार सतेज भासे ॥

कोणी महावरद सिद्ध घरास आला ।

याकारणें मग तिला बहु मोद झाला ॥१६॥

ती त्या बटूस वदते वद कोण मातें ।

जाणे असें कवण काज तुला असे तें ॥

तूं तें वदें कवण बा तुज जन्मदाते ।

ऐसेंपरी वदतसे प्रभुपत्‍नि त्यातें ॥१७॥

तीतें वदे च्यवन हें मम नाम आहे ।

माझा पिता भृगु-मुनी जवळीच राहे ॥

माता पुलोम वदती जन त्याच नामीं ।

मी नेतसें उदक हें अपुल्याच धामीं ॥१८॥

(भुजंगप्रयात)

सुधर्मा वदे मी असें राजधानी ।

वनांमाजि येणें बहू साळ यत्‍नीं ॥

घडे पूर्वकर्मी अशी ही अवस्था ।

करी पूर्ण बा हे कृपा ही वनस्था ॥१९॥

जयीं लग्न झालें तईं तीच काया ।

असे चंद्र जैसा तशी कांति हे या ॥

पुढें प्राप्त झाली अशी ही अवस्था ।

करी तूर्ण आतां कृपा ही वनस्था ॥२०॥

(गीति)

राणि चावनापाशी कथिती झाली समस्त वृत्तातें ।

ऐक कृपाळू ताता, प्राक्तन हें विधिवशेंचि लेखावें ॥२१॥

पूर्वी राजा असतां, ऐश्वर्याचा सदैव भोक्ता हो ।

आतां त्यांना तेथें, भीवविती वन-पशूदि भूतें हो ॥२२॥

वन-पशु आणिक भूतें, भक्षिति भीतास बहुत सत्वर तीं ।

पण आतां आम्हांला, भक्षित नाहिंत अशीं कशीं असती ॥२३॥

जे नृपती षड्रस हे, अन्नाचे सेवनांत तृप्त असे ।

त्या नृपतींनीं आतां, कडवट अंबट फळांत तुष्ट असे ॥२४॥

ज्या नृपतींनीं पूर्वीं, भोजनसमयीं बहूत विप्रांस ।

पंक्तीस घेत जावें, नशिबीं आलीं फळें मुळें त्यांस ॥२५॥

पूर्वी पहुडति स्वामी, मउ शैय्येवरि बहूत सौख्यांनीं ।

आतां झोपायासी, स्थान मिळे तें जसें तसें रानीं ॥२६॥

काळाचें चरित पहा ! गहन असे फार फार तें मोठें ।

माझा संशय फिटला , थोरांचें वाक्य हें नसे खोटें ॥२७॥

नाथांच्या शरिराचा, सुगंध चाले दिगंतरीं विलयां

दुर्गंधीनें आतां, सेवित नाहीं कुणींच हे काया ॥२८॥

ज्यांच्याभोंवतिं बैसति पंडित शास्त्री तसेच विद्वान ।

आतां तेथें करिती माशा बसुनी घुगंघुगं गान ॥२९॥

ऐसें वृत्त कथुनियां च्यवनाच्या पद-रजास ती लीन ।

दुःखांतुन मुक्त कधीं होऊं ऐसे उपाय करि कथन ॥३०॥