गणेश पुराण - उपासना खंड

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


अध्याय ११

एकाक्षरमंत्रमाहात्म्य

 (भुजंगप्रयात)

विधाता वदे व्यास वेदार्थ कर्त्या ।

तुला साह्य व्हावें त्वरें इष्ट कार्या ॥

म्हणूनी अधीं त्वां गणाधीश मंत्र ।

जपूनी कृपा हो वरें तूं सुपात्र ॥१॥

गणाधीश ईशास आहेत मंत्र ।

परी त्यांत ते सात कोटीच मात्र ॥

मला माहिती जे असे वेदव्यासां ।

त्वरें साध्य होण्यास ते कष्ट आतां ॥२॥

तसे शंकराही असे मंत्र ज्ञात ।

तयांमाजि ऐसे महामंत्र त्यांत ॥

सहाअक्षरी नी तशी एक संख्या ।

असे अक्षरांची वदे त्याचि आख्या ॥३॥

अशा दोन मंत्रांमधें सर्वसिद्धी ।

तया व्यास वा या वदे तत्त्वबुद्धी ॥

गणेशास जे सेविती नित्य भक्त ।

त्वरें पावती ते सख्या जीवमुक्त ॥४॥

असे भक्त ते पूज्य देवास होती ।

तयां प्राप्त सिद्धी बरें तूर्ण होती ॥

तया इष्ट कार्यास सामर्थ्य येतें ।

भृगू सांगती सोमकांता असें तें ॥५॥

जया नाहिं भक्ती गणेशप्रभूची ।

तयाच्या मुखाला नको पाहणेची ॥

तया पाहतां विघ्न येतें सदैव ।

वदे व्यास यांना असें ब्रह्मदेव ॥६॥

(साकी)

गणेशभक्तां दर्शन घेतां विघ्न निवारण होतें ।

यास्तव ब्रह्मा एकाक्षरिचा उपदेशीं मंत्रातें ॥७॥

॥धृ०॥ सुन सुन व्यासा कीं । मंत्र असें पावन कीं ।

या मंत्राचा प्रभाव ऐसा इच्छित सिद्धिस जातें ।

अनुष्ठान हें कसें करावें कथितों तुजला मी तें ॥८॥

(गीति)

प्रातर्विधि सारुनियां स्नान करावें सदा शुची व्हावें ।

धौत अशा वसनासी, नेसुन नंतर कुशासनिं बसावें ॥९॥

प्राणायाम करावा न्यासासह त्या गणेशमूर्तीस ।

ध्याउन मानसपूजा, प्रसन्न करणें स्वकार्यपूर्तीस ॥१०॥

संकल्पूनी आधीं, एणेपरि तूं करीं पुरश्चरण ।

ऐसें वदून व्यासां उपदेशी शुभदिनीं सती-रमण ॥११॥

एकाक्षरि मंत्राची, दीक्षा दिधली गणेश नामाची ।

एकान्त स्थल पाहून, जय करणें स्वस्थचित्त नेमेंची ॥१२॥

नास्तिक निर्दय तैसे, दुर्वृत्तीं शठ असा मनुष्यास ।

उपदेश नको देऊं, हे व्यासा, सांगतों तुला खास ॥१३॥

ज्याच्या मनांत भक्ती, उदित असे त्यासि देईं मंत्रास ।

आचार योग्य ज्याचा, करुणार्णव शांतचित्त मनुजास ॥१४॥

जो नर अपात्र आहे, दीक्षा देतां तयास नरकास ।

पूर्वी पुढील दश-दश, घालवितो सत्य जाण वंशास ॥१५॥

जो कोणी मानव तो, भक्तिपुरस्सर गणेशपूजाही ।

करितांच प्राप्त होती, ज्ञान तशी संतति नि संपद हीं ॥१६॥

यापरि सर्व सुखें हीं, उपभोगी नर भवार्णवीं तरतो ।

अंतीं मोक्षपदाला, मिळवुन कीर्तीस धन्य तो होतो ॥१७॥