गणेश पुराण - उपासना खंड

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


अध्याय १५

श्रीगजाननाचें बालस्वरुप

 (दिंडी)

सोमकांतासी भृगू सांगतात ।

कथा ऐकाया शांत करी चित्ता ॥

विधी चिंतेनें स्वस्थ बसे खिन्न ।

स्वप्न पडलें तें कथन करी निन्म ॥१॥

(यूथिका)

वेद तुंड विपिनीं बहु भागला ।

वृक्ष एक वट तो तिहिं देखिला ॥

नीर मग्न जग हें तिहिं पाहिलें ।

कोड हें बघुनियां मन शंकलें ॥२॥

(वसंततिलका)

न्यग्रोध वृक्ष निरखी बहुसाळ दृष्टी ।

न्यग्रोध-पर्ण शयनीं लघु-बाल दृष्टी ॥

पाहे तयास कर चार शिरीं मुकूटा

मौक्तिक-माळ रुळते सुकुमार कंठा ॥३॥

शीर्षी शशी वसतसे जणुं शुभ्र कोर ।

काया असेच अवघी नर-वेष-धार ॥

शुंडा तशीच वदनीं द्विज लांब एक ।

पाहे शिशूस विधि तो क्षण मात्र एक ॥४॥

(शार्दूलविक्रीडित)

शुंडाग्रें जल घे शिरावर तदा शिंपोनियां बाळ तें ।

देखोनी हसले शिशूस कळलें वृक्षातळीं येत तें ॥

त्यातें तें वदलें अती-तर-लघू हें नेणसी तूं बलें ।

गर्वानें चढला म्हणून तुजला विघ्नें बहू त्रासिलें ॥५॥

कैसी मी तपसा करुं म्हणुनियां चिंता तुला ही खरी ।

यासाठीं तुजला सुमंत्र कथितों सांगेन एकाक्षरी ॥

तो तूं मंत्र जपें पुरश्चर विधी संख्या दहा लक्ष ही ।

साक्षात् दर्शन देउनी बहुत ती सामर्थ्य देईन ही ॥६॥

(साकी)

ऐशा स्वप्ना पाहुन विधि तो जागृतसा झाला ।

साक्षात् दर्शन केव्हां होईल ऐसी चिंता त्याला ॥७॥

॥धृ०॥ सुन सुन भूपा हें । मंगलमूर्ति कहो हें ।

प्रातःकाळीं विधिनें तेव्हां स्नान-विधी केला ॥

एकाक्षर हा मंत्र जपाया आसन-विधि हा केला ॥८॥

इंद्रियदमना करुनी भूपा निरहारी तो राहे ।

देवांचीं हीं सहस्त्र वरुषें तीव्र तपा लाहे ॥९॥

अग्निज्वाला मुखामधूनी चतुराननिं त्या निघती ।

त्यापासून हीं भूतें भूपा पीडित तीं होतीं ॥१०॥

ऐसें तप हें पाहुन राया देव गजानन आले ।

दिव्यस्वरुपी दर्शन देऊन चिंतातुरिच केलें ॥११॥

ऐशा रुपा पाहुन तेव्हां तप हें गडबडलें ।

तैसे नयनही झांकुन सारें मन खिन्नच झालें ॥१२॥

प्रभुंनीं तेव्हां देखुन स्थितिला मुदित भाषणा केलें ।

ब्रह्मदेव हें ऐकुन त्याचें शांत चित्त मग झालें ॥१३॥

(गीति)

चतुराननास देउन, अभय वदे तो गणेश बहु प्रीती ।

स्वप्नामधेंच तुजला, दिधला मीं मंत्र हें स्मरे चित्तीं ॥१४॥

माझें रुप तुला तें, दिसतें आहे बहूतसें शांत ।

इच्छित माग म्हणे तूं, देतों तुजला क्षणांत हो प्राप्त ॥१५॥

(दिंडी)

सोमकांताला सांगती भृगूराज ।

प्रभूवाणी ती ऐकिली इष्टकाज ।

मुदित होउनियां ब्रह्मदेव देवा ।

चतुःशिरसीं प्रणति करी तेव्हां ॥१६॥

आणिक वेदांसि थांग नसे ज्याचा ।

असा परमात्मा भेटला मला साचा ।

म्हणुन माझा हा जन्म असे धन्य ।

मुदित झाले ती करा मला धन्य ॥१७॥

त्वदिय चरणांची भक्ति मला द्यावी ।

सकल विघ्नेंही त्वरित निवारावीं ।

सृष्टि निर्माया सामर्थ्य मला द्यावें ।

स्मरण करितां मीं दर्शनासि द्यावें ॥१८॥

(गीति)

चतुराननास वदले, प्रसाद अमुचा त्वदीय इच्छा त्या ।

होवोत पूर्ण बापा, विघ्नें हरती मला स्मरे जो त्या ॥१९॥

निःशंकपणें तूंही, सृष्टि करि तूर्ण पूर्ण निर्माण ।

एणेंपरि वरदानें चतुरानन कार्यसिद्धि करि पूर्ण ॥२०॥

गणपतिपुजन केलें, तो एकाकी सिद्धि बुद्धि या दोन्ही ।

कन्या जनीत झाल्या, अर्पियल्या त्या गणेश पूजोनी ॥२१॥

भक्तांच्या कल्याणा, मागे वर तो तयांस देऊनी ।

स्वीकारी कन्या त्या, गमन करी तो गणेश स्व-स्थानीं ॥२२॥