चतुःश्लोकी भागवत

मराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.


नाथांचें अनहंकारी आत्मनिवेदन

नुरवूनि मीतूंपणाची वार्ता । वदविताहे ग्रंथकथा । तेथें मी कविकर्ता । हे कोणें अहंता धरावी ॥२१॥

मज नाहीं ग्रंथ अहंता । ह्नणोनि श्रोत्यांचें विनविता । ते विनवणीच तत्त्वतां । अंगीं अहंता आणूं पाहे ॥२२॥

तंव माझें जें कां मीपण । तें सदगुरु झाला आपण । तरी करितांही विनवण । माझें मीपण मज नलगे ॥२३॥

माझी क्रिया कर्म कर्तव्यता । सदगुरुचि झाला तत्त्वतां । आतां माझ्या मीपणाची अहंता । मजसी सर्वथा संबंध नाहीं ॥२४॥