श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


आरंभ

 

॥श्रीः॥

॥ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न॥

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥

ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभवभावना ।

न देखोनि मीतूंपणा । नमन श्रीचरणा सद्गुरुराया ॥१॥

नमन श्रीएकदंता। एकपणें तूंचि आतां ।

एकीं दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ॥२॥

तुजमाजीं वासु चराचरा । म्हणौनि बोलिजे लंबोदरा ।

यालागीं सकळांचा सोयरा । साचोकारा तूं होसी ॥३॥

तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा होय संसारु ।

यालागीं ’विघ्नहरु’ । नामादरु तुज साजे ॥४॥

हरुष तें वदन गणराजा । चार्‍ही पुरुषार्थ त्याची चार्‍ही भुजा ।

प्रकाशिया प्रकाशी वोजा । तो झळकत तुझा निजदंतु ॥५॥

पूर्वउत्तरमीमांसा दोनी । लागलिया श्रवणस्थानीं ।

निःशब्दादि वाचा वदनीं । कर जोडूनि उभिया ॥६॥

एकेचि काळीं सकळ सृष्टी । आपुलेपणें देखत उठी ।

तेचि तुझी देखणी दृष्टी । सुखसंतुष्टी विनायका ॥७॥

सुखाचें पेललें दोंद । नामीं आवर्तला आनंद ।

बोधाचा मिरवे नागबंद । दिसे सन्निध साजिरा ॥८॥

शुद्ध सत्त्वाचा शुक्लांबर । कासे कसिला मनोहर ।

सुवर्णवर्ण अलंकार । तुझेनि साचार शोभती ॥९॥

प्रकृतिपुरुष चरण दोनी । तळीं घालिसी वोजावुनी ।

तयांवरी सहजासनीं । पूर्णपणीं मिरवसी ॥१०॥

तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधितां विघ्न न पडे दृष्टी ।

तोडिसी संसारफांसोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशु ॥११॥

भावें भक्त जो आवडे । त्याचें उगविसी भवसांकडें ।

वोढूनि काढिसी आपणाकडे । निजनिवाडें अंकुशें ॥१२॥

साच निरपेक्ष जो निःशेख । त्याचें तूंचि वाढविसी सुख ।

देऊनि हरिखाचे मोदक । निवविसी देख निजहस्तें ॥१३॥

सूक्ष्माहूनि सूक्ष्म सान । त्यामाजीं तुझें अधिष्ठान ।

यालागीं मूषकवाहन । नामाभिधान तुज साचे ॥१४॥

पाहता नरु ना कुंजरु । व्यक्ताव्यक्तासी परु ।

ऐसा जाणोनि निर्विकारु । नमनादरु ग्रंथार्थी ॥१५॥

ऐशिया जी गणनाथा । मीपणें कैंचा नमिता ।

अकर्ताचि जाहला कर्ता । ग्रंथकथाविस्तारा ॥१६॥;

आतां नमूं सरस्वती । जे सारासारविवेकमूर्ती ।

चेतनारुपें इंद्रियवृत्ती । जे चाळिती सर्वदा ॥१७॥

जे वाचेची वाचक । जे बुद्धीची द्योतक ।

जे प्रकाशा प्रकाशक । स्वयें देख स्वप्रभ ॥१८॥

ते शिवांगीं शक्ति उठी । जैसी डोळ्यांमाजीं दिठी ।

किंवा सुरसत्वें दावी पुष्टी । फळपणें पोटीं फळाच्या ॥१९॥

जैसा साखरेअंगीं स्वादु । कीं सुमनामाजीं मकरंदु ।

तैसा शिवशक्तिसंबंधु । अनादिसिद्धु अतर्क्य ॥२०॥

ते अनिर्वाच्य निजगोडी । चहूं वाचांमाजीं वाडी ।

म्हणोनि वागीश्वरी रोकडी । ग्रंथार्थी चोखडी चवी दावी ॥२१॥

सारासार निवडिती जनीं । त्या हंसावरी हंसवाहिनी ।

बैसली सहजासनीं । अगम्यपणीं अगोचरु ॥२२॥

ते परमहंसीं आरुढ । तिसी विवेकहंस जाणती दृढ ।

जवळी असतां न देखती मूढ । अभाग्य दृढ अतिमंद ॥२३॥

तिचें निर्धारितां रुप । अरुपाचें विश्वरुप ।

ते आपुलेपणें अमूप । कथा अनुरुप बोलवी ॥२४॥

हा बोलु भला झाला । म्हणोनि बोलेंचि स्तविला ।

तैसा स्तुतिभावो उपजला । बोलीं बोला गौरवी ॥२५॥

ते वाग्विलास परमेश्वरी । सर्वांगदेखणी सुंदरी ।

राहोनि सबाह्यअभ्यंतरीं । ग्रंथार्थकुसरी वदवी स्वयें ॥२६॥

ते सदा संतुष्ट सहज । म्हणोनि निरुपणा चढलें भोज ।

परी वक्तेपणाचा फुंज । मीपणें मज येवोंच नेदी ॥२७॥

वाग्देवतेची स्तुती । वाचाचि जाहली वदती ।

तेथें द्वैताचिये संपत्ती । उमस चित्तीं उमसेना ॥२८॥

तिणें बोल बोलणें मोडिलें । समूळ मौनातें तोडिलें ।

त्यावरि निरुपण घडिलें । न बोलणें बोलें बोलवी ॥२९॥

तिसी सेवकपणें दुसरा । होऊनि निघे नमस्कारा ।

तंव मीपणेंसीं परा । निजनिर्धारा पारुषे ॥३०॥

जेथें मीपणाचा अभावो । तेथें तूंपणा कैंचा ठावो ।

याहीवरी करी निर्वाहो । अगम्य भावो निरुपणीं ॥३१॥

जैशा सागरावरी सागरीं । चालती लहरींचिया लहरी ।

तैसे शब्द स्वरुपाकारीं । स्वरुपावरी शोभती ॥३२॥

जैशा साखरेचिया कणिका । गोडिये भिन्न नव्हती देखा ।

तैसें निरुपण ये रसाळसुखा । ब्रह्मरसें देखा रसवृत्ति ॥३३॥

तेथें मीपणेंशीं सरस्वती । बैसविलें एका ताटें रसवृत्ती ।

तेणें अभिन्नशेष देऊनि तृप्ती । ते हे उद्गार येती कथेचे ॥३४॥;

आतां वंदूं ते सज्जन । जे कां आनंदचिद्धन ।

वर्षताती स्वानंदजीवन । संतप्त जन निववावया ॥३५॥

ते चैतन्याचे अळंकार । कीं ब्रह्मविद्येचे श्रृंगार ।

कीं ईश्वराचें मनोहर । निजमंदिर निवासा ॥३६॥

ते अधिष्ठाना अधिवासु । कीं सुखासही सोल्हासु ।

विश्रांतीसी विश्वासु । निजरहिवासु करावया ॥३७॥

कीं ते भूतदयार्णव । कीं माहेरा आली कणव ।

ना ते निर्गुणाचे अवेव । निजगौरव स्वानंदा ॥३८॥

ना ते डोळ्यांतील दृष्टी । कीं तिचीही देखणी पुष्टी ।

कीं संतुष्टीसी तुष्टी । चरणांगुष्ठीं जयांचे ॥३९॥

ते पाहती जयांकडे । त्यांचें उगवे भवसांकडें ।

परब्रह्म डोळियांपुढें । निजनिवाडें उल्हासे ॥४०॥

तेथें साधनचतुष्टयसायास । न पाहती शास्त्रचातुर्यविलास ।

एक धरिला पुरे विश्वास । स्वयें प्रकाश ते करिती ॥४१॥

ते जगामाजीं सदा असती । जीवमात्रातें दिसती ।

परी विकल्पेंचि ठकिजती । नाहीं म्हणती नास्तिक्यें ॥४२॥

मातियेचा द्रोण केला । तो कौळिका भावो फळला ।

म्हणौनि विश्वासेंवीण नाडला । जगु ठकला विकल्पें ॥४३॥

एकाएकीं विश्वासतां । तरी वाणी नाहीं निजसत्ता ।

त्यांचे चरणीं भावार्थता । ठेवितां माथा विश्वासें ॥४४॥

ते नमस्कारितां आवश्यक । करुन ठाकती एक ।

परि एकपणें सेवक । त्यांचाचि देख स्वयें होआवें ॥४५॥

त्यांचिया सेवेचिये गोडी । ब्रह्मसुखाची उपमा थोडी ।

जे भजती अनन्य आवडीं । ते जाणती गाढी निजचवी ॥४६॥

ते प्रकृतीसी पर । प्रकृतिरुपीं ते अविकार ।

आकार-विकार-व्यवहार । त्यांचेनि साचार बाधीना ॥४७॥

ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती ।

आपुलिये सहजस्थिती । स्वयें वर्तती सर्वदा ॥४८॥

ते ज्ञातेपणा न मिरविती । पिसेपण न दाविती ।

स्वरुपफुंजुविस्मृती । गिळूनि वर्तती निजांगें ॥४९॥

प्रेमा अंगींचि जिराला । विस्मयो येवोंचि विसरला ।

प्रपंचपरमार्थु एकु जाहला । हाही ठेला विभागु ॥५०॥

स्मरण विस्मरणेंशीं गेलें । देह देहींच हारपलें ।

आंतुबाहेरपण गेलें । गेलें ठेलें स्मरेना ॥५१॥

स्वप्नजागृती जागतां गेली । सुपुष्ति साक्षित्वेंसीं बुडाली ।

उन्मनीही वेडावली । तुर्या ठेली तटस्थ ॥५२॥

दृश्य द्रष्टेनशीं गेलें । दर्शन एकलेपणें निमालें ।

तें निमणेंपणही विरालें । विरवितें नेलें विरणेनिशीं ॥५३॥

ज्ञान अज्ञानातें घेऊनि गेलें । तंव ज्ञातेपणही बुडालें ।

विज्ञान अंगीं घडलें । परी नवें जडलें हें न मनी ॥५४॥

यापरी जे निजसज्जन । तिहीं व्हावें सावधान ।

द्यावें मज अवधान । हें विज्ञापन बाळत्वें ॥५५॥

सूर्य सदा प्रकाशघन । अग्नि सदा देदीप्यमान ।

तैसे संत सदा सावधान । द्यावें अवधान हें बालत्व माझें ॥५६॥;

तंव संतसज्जनीं एक वेळां । थोर करुनियां सोहळा ।

आज्ञापिलें वेळोवेळां । ग्रंथ करविला प्राकृत ॥५७॥

एकांतीं आणि लोकांतीं । थोर साक्षेप केला संतीं ।

तरी सांगा जी मजप्रती । कोण ग्रंथीं प्रवर्तों ॥५८॥

पुराणीं श्रेष्ठ भागवत । त्याहीमाजी उद्धवगीत ।

तुवां प्रवर्तावें तेथ । वक्ता भगवंत तुज साह्य ॥५९॥

आम्हांसी पाहिजे ज्ञानकथा । वरी तुजसारिखा रसाळ वक्ता ।

तरी स्तुति सांडूनि आतां । निरुपण तत्त्वतां चालवीं ॥६०॥

तुज संतस्तवनीं उत्सावो । हा तंव कळला भावो ।

तरी कथेचा लवलाहो । निजनिर्वाहो उपपादीं ॥६१॥

या संतांचे कृपावचनें । एकाएकीं आनंदलों मनें ।

तेणें वाक्यपसायदानें । स्वानंदघनें उल्हासे ॥६२॥

जैसा मेघांचेनि गर्जनें । मयूर उपमों पाहे गगनें ।

नाना नवेनि जीवनें । जेवीं चातक मनें उल्हासे ॥६३॥

कां देखोनि चंद्रकर । डोलों लागे चकोर ।

तैसें संतवदनींचें उत्तर । आलें थोर सुखावित ॥६४॥

थोर सुखाचा केलों स्वामी । तुमचें पुरतें कराल तुम्ही ।

तरी वायांचि कां मीपणें मी । मनोधर्मी वळंगेजों ॥६५॥

परी समर्थांची आज्ञा । दासां न करवे अवज्ञा ।

तरी सांगितली जे संज्ञा । ते करीन आज्ञा स्वामींची ॥६६॥

परी तुम्हीं एक करावें । अखंड अवधान मज द्यावें ।

तेणें दिठिवेनि आघवें । पावेल स्वभावें निजसिद्धी ॥६७॥

अगा तुझिया मनामाजीं मन । शब्दीं ठेविलेंसे अनुसंधान ।

यालागीं निजनिरुपण । चालवीं जाण सवेगें ॥६८॥;

आतां वंदूं कुळदेवता । जे एकाएकी एकनाथा ।

ते एकीवांचून सर्वथा । आणिक कथा करुं नेदी ॥६९॥

एक रुप दाविलें मनीं । तंव एकचि दिसे जनीं वनीं ।

एकचि कानीं वदनीं । एकपणीं ’एकवीरा’ ॥७०॥

ते शिवशक्तिरुपें दोनी । नेऊन मिरवे एकपणीं ।

एकपणें जाली गुर्विणी । प्रसवे एकपणीं एकवीरा ॥७१॥

ते एकरुपें एकवीरा । प्रसवली बोध-फरशधरा ।

जयाचा कां दरारा । महावीरां अभिमानियां ॥७२॥

तेणें उपजोनि निवटिली माया । आज्ञा पाळूनि सुख दे पितया ।

म्हणोनि तो जाहला विजया । लवलाह्यां दिग्मंडळीं ॥७३॥

जो वासनासहस्त्रबाहो । छेदिला सहस्त्रार्जुन-अहंभावो ।

स्वराज्य करुनियां पहा हो । अर्पी स्वयमेवो स्वजातियां ॥७४॥

तेणें मारुनि माता जीवविली । तेचि कुळदेवता आम्हां जाहली ।

परी स्वनांवें ख्याति केली । एकात्मताबोली एकनाथा ॥७५॥

ते जैंपासोनि निवटिली । तैंपासोनि प्रकृति पालटली ।

रागत्यागें शांत झाली । निजामाउली जगदंबा ॥७६॥

तया वोसंगा घेऊन । थोर दिधलें आश्वासन ।

विषमसंकटीं समाधान । स्वनामस्मरण केलिया ॥७७॥

ते जय जय जगदंबा । ’उदो’ म्हणे ग्रंथारंभा ।

मतीमाजी स्वयंभा । योगगर्भा प्रगटली ॥७८॥;

आतां वंदूं जनार्दनु । जो भवगजपंचाननु ।

जनीं विजनीं समानु । सदा संपूर्णु समत्वें ॥७९॥

ज्याचेनि कृपापांगें । देहीं न देखती देहांगें ।

संसार टवाळ वेगें । केलें वाउगें भवस्वप्न ॥८०॥

जयाचेनि कृपाकटाक्षें । अलक्ष्य लक्ष्येंवीण लक्षे ।

साक्षी विसरली साक्षें । निजपक्षें गुरुत्वें ॥८१॥

तेणें जीवेंवीण जीवविलें । मृत्यूवीण मरणचि मारिलें ।

दृष्टि घेऊनि दाखविलें । देखणें केलें सर्वांग ॥८२॥

देहीं देह विदेह केलें । शेखीं विदेहपण तेंही नेलें ।

नेलेपणही हारपलें । उरीं उरलें उर्वरित ॥८३॥

अभावो भावेंशीं गेला । संदेह निःसंदेहेंशीं निमाला ।

विस्मयो विस्मयीं बुडाला । वेडावला स्वानंदु ॥८४॥

तेथ आवडीं होय भक्तु । तंव देवोचि भक्तपणाआंतु ।

मग भज्यभजनांचा अंतु । दावी उप्रांतु स्वलीला ॥८५॥

नमन नमनेंशीं नेलें । नमितें नेणों काय जाहलें ।

नम्यचि अंगीं घडलें । घडलें मोडलें मोडूनि ॥८६॥

दृश्य द्रष्टा जाण । दोहींस एकचि मरण ।

दर्शनही जाहलें क्षीण । देखणेपण गिळूनि ॥८७॥

आतां देवोचि आघवा । तेथें भक्तु न ये भक्तभावा ।

तंव देवोही मुकला देवा । देवस्वभावा विसरोनि ॥८८॥

देवो देवपणें दाटला । भक्तु भक्तपणें आटला ।

दोहींचाही अंतु आला । अभेद जाहला अनंतु ॥८९॥

अत्यागु त्यागेंशीं विराला । अभोगु भोगेंशीं उडाला ।

अयोगु योगेंशीं बुडाला । योग्यतेचा गेला अहंभावो ॥९०॥

ऐशियाहीवरी अधिक सोसू । सायुज्यामाजीं होतसे दासू ।

तेथील सुखाचा सौरसु । अति अविनाशु अगोचरु ॥९१॥

शिवें शिवूचि यजिजे । हें ऐशिये अवस्थेसि साजे ।

एर्‍हवीं बोलचि बोलिजे । परि न पविजे निजभजन ॥९२॥

ये अभिन्न सुखसेवेआंतु । नारद आनंदें नाचत गातु ।

शुकसनकादिक समस्तु । जाले निजभक्तु येणेंचि सुखें ॥९३॥

सागरीं भरे भरतें । तें भरतें भरे तरियांतें ।

तैसें देवेंचि देवपणें येथें । केलें मातें निजभक्त ॥९४॥

सागर सरिता जीवन एक । परी मिळणीं भजन दिसे अधिक ।

तैसें एकपणेंचि देख । भजनसुख उल्हासे ॥९५॥

वाम सव्य दोनी भाग । परी दों नामीं एकचि अंग ।

तैसा देवभक्तविभाग । देवपणीं साङग आभासे ॥९६॥

तेवीं आपुलेपणाचेनि मानें । भक्त केलों जनार्दनें ।

परी कायावाचामनें । वर्तविजे तेणें सर्वार्थीं ॥९७॥

तो मुखाचें जाला निजमुख । दृष्टीतें प्रकटे सन्मुख ।

तोचि विवेकेंकरुन देख । करवी लेख ग्रंथार्थी ॥९८॥

परी नवल त्याचें लाघव । अभंगीं घातलें माझें नांव ।

शेखीं नांवाचा निजभाव । उरावया ठाव नुरवीच ॥९९॥;

या वचनार्था संतोषला । म्हणे भला रे भला भला ।

निजभाविकु तूंचि संचला । प्रगट केला गुह्यार्थु ॥१००॥

हे स्तुति कीं निरुपण । ग्रंथपीठ कीं ब्रह्मज्ञान ।

साहित्य कीं समाधान । संज्ञाही जाण कळेना ॥१॥

तुझा बोलुचि एकएकु । सोलींव विवेकाचा विवेकु ।

तो संतोषासी संतोखु । आत्यंतिकु उपजवी ॥२॥

तुझेनि मुखें जें जें निघे । तें संतहृदयीं साचचि लागे ।

मुमुक्षुसारंगांचीं पालिंगें । रुंजी निजांगें करितील ॥३॥

ग्रंथारंभु पडला चोख । मुक्त मुमुक्षु इतर लोक ।

श्रवणमात्रेंचि देख । निजात्मसुख पावती ॥४॥;

येणें वचनामृततुषारें । ग्रंथभूमिका विवेकांकुरें ।

अंकुरली एकसरें । फळभारें सफलित ॥५॥

कीं निर्जीवा जीवु आला । ना तरी सिद्धा सिद्धिलाभु जाला ।

कीं निजवैभवें आपुला । प्रियो मीनला पतिव्रते ॥६॥

तैसेनि हरुषानंदें । जी जी म्हणितलें स्वानंदें ।

तुमचेनि पादप्रसादें । करीन विनोदें ग्रंथार्थू ॥७॥

श्रीरामप्रतापदृष्टीं । शिळा तरती सागरापोटीं ।

कीं वसिष्ठवचनासाठीं । तपे शाटी रविमंडळीं ॥८॥

कीं याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता । शुष्ककाष्ठांस पल्लवता ।

कीं धर्में श्वानु सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ॥९॥

तैसे माझेनि नांवें । ग्रंथ होती सुहावे ।

आज्ञाप्रतापगौरवें । गुरुवैभवें सार्थकु ॥११०॥

घटित एका आणि एकादशें । राशि-नक्षत्र एकचि असे ।

त्या एकामाजीं जैं पूर्ण दिसे । तैं दशदशांशें चढे अधिक ॥११॥

मागां पुढां एक एक कीजे । त्या नांव एकादशु म्हणिजे ।

तरी एका एकपणचि सहजें । आलें निजवोजें ग्रंथार्थें ॥१२॥

तेथें देखणेंचि करुनि देखणें । अवघेंचि निर्धारुनि मनें ।

त्यावरी एकाजनार्दनें । टीका करणें सार्थक ॥१३॥

पाहोनि दशमाचा प्रांतु । एकादशाच्या उदयाआंतु ।

एकादशावरी जगन्नाथु । ग्रंथार्थु आरंभी ॥१४॥

म्हणौनि एकादशाची टीका । एकादशीस करी एका ।

ते एकपणाचिया सुखा । फळेल देखा एकत्वें ॥१५॥;

आतां वंदूं महाकवी । व्यास वाल्मीक भार्गवी ।

जयातें उशना कवी । पुराणगौरवीं बोलिजे ॥१६॥

तिहीं आपुलिये व्युत्पत्ती । वाढवावी माझी मती ।

हेचि करीतसें विनंती । ग्रंथ समाप्तीं न्यावया ॥१७॥

वंदूं आचार्य शंकरु । जो ग्रंथार्थविवेकचतुरु ।

सारुनि कर्मठतेचा विचारु । प्रबोधदिनकरु प्रकाशिला ॥१८॥

आतां वंदूं श्रीधर । जो भागवतव्याख्याता सधर ।

जयाची टीका पाहतां अपार । अर्थ साचार पैं असे ॥१९॥

इतरही टीकाकार । काव्यकर्ते विवेकचतुर ।

त्यांचे चरणीं नमस्कार । ग्रंथा सादर तिहीं होआवें ॥१२०॥;

वंदूं प्राकृत कवीश्वर । निवृत्तिप्रमुख ज्ञानेश्वर ।

नामदेव चांगदेव वटेश्वर । ज्यांचें भाग्य थोर गुरुकृपा ॥२१॥

जयांचे ग्रंथ पाहतां । ज्ञान होय प्राकृतां ।

तयांचे चरणीं माथा । निजात्मता निजभावें ॥२२॥

संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृतीं काय उणीवी ।

नवीं जुनीं म्हणावीं । कैसेनि केवीं सुवर्णसुमनें ॥२३॥

कपिलेचें म्हणावें क्षीर । मा इतरांचें तें काय नीर ।

वर्णस्वादें एकचि मधुर । दिसे साचार सारिखें ॥२४॥

जें पाविजे संस्कृत अर्थें । तेंचि लाभे प्राकृतें ।

तरी न मनावया येथें । विषमचि तें कायी ॥२५॥

कां निरंजनीं बसला रावो । तरी तोचि सेवकां पावन ठावो ।

तेथें सेवेसि न वचतां पाहा हो । दंडी रावो निजभृत्यां ॥२६॥

कां दुबळी आणि समर्थ । दोहींस रायें घातले हात ।

तरी दोघींसिही तेथ । सहजें होत समसाम्य ॥२७॥

देशभाषावैभवें । प्रपंच पदार्थी पालटलीं नांवें ।

परी रामकृष्णादिनामां नव्हे । भाषावैभवें पालटु ॥२८॥

संस्कृत वाणी देवें केली । तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली ।

असोतु या अभिमानभुली । वृथा बोलीं काय काज ॥२९॥

आतां संस्कृता किंवा प्राकृता । भाषा झाली जे हरिकथा ।

ते पावनचि तत्त्वता । सत्य सर्वथा मानली ॥१३०॥;

वंदूं ’भानुदास’ आतां । जो कां पितामहाचा पिता ।

ज्याचेनि वंश भगवंता । झाला सर्वथा प्रियकर ॥३१॥

जेणें बाळपणीं आकळिला भानु । स्वयें जाहला चिद्भानु ।

जिंतोनि मानाभिमानु । भगवत्पावनु स्वयें झाला ॥३२॥

जयाची पदबंधप्राप्ति । पाहों आली श्रीविठ्ठलमूर्ति ।

कानीं कुंडलें जगज्ज्योति । करितां रातीं देखिला ॥३३॥

तया भानुदासाचा ’चक्रपाणि’ । तयाचाही सुत सुलक्षणी ।

तया ’सूर्य’ नाम ठेवूनी । निजीं निज होऊनि भानुदास ठेला ॥३४॥

तया सूर्यप्रभाप्रतापकिरणीं । मातें प्रसवली रुक्मिणी ।

म्हणौनि रखुमाई जननी । आम्हांलागूनि साचचि ॥३५॥

हे ग्रंथारंभकाळा । वंदिली पूर्वजमाळा ।

धन्य निजभाग्याची लीळा । आलों वैष्णवकुळा जन्मोनि ॥३६॥

ते वैष्णवकुळीं कुळनायक । नारद प्रल्हाद सनकादिक ।

उद्धव अक्रूर श्रीशुक । वसिष्ठादिक निजभक्त ॥३७॥

ते वैष्णव सकळ । ग्रंथार्थी अवधानशीळ ।

म्हणौनि वैष्णवकुळमाळ । वंदिली सकळ ग्रंथार्थी ॥३८॥;

उपजलों ज्याचिया गोत्रा । नमन त्या विश्वामित्रा ।

जो कां प्रतिसृष्टीचा धात्रा । गायत्रीमंत्रा महत्त्व ॥३९॥

जो उपनिषद्विवेकी । तो वंदिला याज्ञवल्की ।

जो कविकर्तव्यातें पोखी । कृपापीयूखीं वर्षोनि ॥१४०॥

नमन भूतमात्रां अशेखां । तेणें विश्वंभरु जाहला सखा ।

म्हणौनि ग्रंथारंभु देखा । आला नेटका संमता ॥४१॥

आतां नमूं दत्तात्रेया । जो कां आचार्यांचा आचार्या ।

तेणें प्रवर्तविलें ग्रंथकार्या । अर्थवावया निजबोधु ॥४२॥

तो शब्दातें दावितु । अर्थु अर्थें प्रकाशितु ।

मग वक्तेपणाची मातु । स्वयें वदवितु यथार्थ ॥४३॥;

तो म्हणे श्रीभागवत । तें भगवंताचें हृदत ।

त्यासीचि होय प्राप्त । ज्याचें निरंतर चित्त भगवंतीं ॥४४॥

तें हें ज्ञान कल्पादी । ’चतुःश्लोक’ पदबंधीं ।

उपदेशिला सद्भुद्धी । निजात्मबोधीं विधाता ॥४५॥

नवल तयाचा सद्भावो । शब्दमात्रें झाला अनुभवो ।

बाप सद्गुरुकृपा पहा हो । केला निःसंदेहो परमेष्ठी ॥४६॥

तो चतुःश्लोकींचा बोधु । गुरुमार्गें आला शुद्धु ।

तेणें उपदेशिला नारदु । अतिप्रबुद्धु भावार्थी ॥४७॥

तेणें नारदु निवाला । अवघा अर्थमयचि झाला ।

पूर्ण परमानंदें धाला । नाचों लागला निजबोधें ॥४८॥

तो ब्रह्मवीणा वाहतु । ब्रह्मपदें गीतीं गातु ।

तेणें ब्रह्मानंदें नाचतु । विचरे डुल्लतु भूतळीं ॥४९॥

तो आला सरस्वतीतीरा । तंव देखिलें व्यासऋषीश्वरा ।

जो संशयाचिया पूरा । अतिदुर्धरामाजीं पडिला ॥१५०॥

वेदार्थ सकळ पुराण । व्यासें केलें निर्माण ।

परी तो न पवेचि आपण । निजसमाधान स्वहिताचें ॥५१॥

तो संशयसमुद्रांआंतु । पडोनि होता बुडतु ।

तेथें पावला ब्रह्मसुतु । ’नाभी’ म्हणतु कृपाळू ॥५२॥

तेणें एकांतीं नेऊनि देख । व्यासासि केलें एकमुख ।

मग दाविले चार्‍ही श्लोक । भवमोचक निर्दुष्ट ॥५३॥

ते सूर्यास्तें न दाखवुनी । गगनातेंही चोरुनी ।

कानातें परते सारुनी । ठेला उपदेशुनी निजबोधु ॥५४॥

तें नारदाचें वचन । करीत संशयाचें दहन ।

तंव व्यासासि समाधान । स्वसुखें पूर्ण हों सरलें ॥५५॥

मग श्रीव्यासें आपण । भागवत दशलक्षण ।

शुकासि उपदेशिलें जाण । निजबोधें पूर्ण सार्थक ॥५६॥

तेणें शुकही सुखावला । परमानंदें निवाला ।

मग समाधिस्थ राहिला । निश्चळ ठेला निजशांती ॥५७॥

तेथें स्वभावेंचि जाणा । समाधि आली समाधाना ।

मग परीक्षितीचिया ब्रह्मज्ञाना । अवचटें जाणा तो आला ॥५८॥;

पहावया परीक्षितीचा अधिकारु । तंव कलीसि केला तेणें मारु ।

तरी धर्माहूनि दिसे थोरु । अधिकारु पैं याचा ॥५९॥

कृष्णु असतां धर्म जियाला । पाठीं कलिभेणें तो पळाला ।

परी हा कलि निग्रहूनि ठेला । धर्माहूनि भला धैर्यें अधिक ॥१६०॥

अर्जुनवीर्यपरंपरा निर्व्यंग । सुभद्रा मातामहीचें गर्भलिंग ।

तो अधिकाररत्‍न उपलिंग । ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्भी झाला ॥६१॥

गर्भींच असतां ज्याच्या भेणें । स्पर्शूं न शके शस्त्र द्रौण्य ।

त्याचा अधिकार पूर्ण । सांगावया कोण समर्थ ॥६२॥

जेणें रक्षिलें गर्भाप्रती । तया परीक्षी सर्वांभूतीं ।

यालागीं नांवें परीक्षिती । अगाध स्थिति नांवाची ॥६३॥

तो अभिमन्यूचा परीक्षिती । उपजला पावन करीत क्षिती ।

ज्याचेनि भागवताची ख्याती । घातली त्रिजगतीं परमार्थपव्हे ॥६४॥

अंगीं वैराग्यविवेकु । ब्रह्मालागीं त्यक्तोदकु ।

तया देखोनि श्रीशुकु । आत्यंतिकु सुखावला ॥६५॥;

बाप कोपु ब्राह्मणाचा । शापें अधिकारु ब्रह्मज्ञानाचा ।

तयांच्या चरणीं कायावाचा । निजभावाचा नमस्कारु ॥६६॥

ब्रह्माहूनि ब्राह्मण थोरु । हें मीच काय फार करुं ।

परी हृदयीं अद्यापि श्रीधरु । चरणालंकारु मिरवितु ॥६७॥

म्हणोनि ब्रह्माचा देवो ब्राह्मणु । हा सत्यसत्य माझा पणु ।

यालागीं वेदरुपें नारायणु । उदरा येऊनु वाढला ॥६८॥

म्हणोनि ब्राह्मण भूदेव । हे ब्रह्मींचे निजावेव ।

येथें न भजती ते मंददैव । अति निदैंव अभाग्य ॥६९॥

ब्राह्मणप्रतापाचा नवलावो । तिहीं आज्ञाधारकु केला देवो ।

प्रतिमाप्रतिष्ठेसि पहा हो प्रकटे आविर्भावो मंत्रमायें ॥१७०॥;

तंव संत म्हणती काय पहावें । जें स्तवनीं रचिसी भावें ।

तेथें प्रमेय काढिसी नित्य नवें । साहित्यलाघवें साचार ॥७१॥

गणेशु आणि सरस्वती । बैसविलीं ब्रह्मपंक्ती ।

तैशीच संतस्तवनीं स्तुती । ऐक्यवृत्ती वदलासी ॥७२॥

पाठीं कुल आणि कुलदैवता । स्तवनीं वदलासि जे कथा ।

ते ऐकतांचि चित्त चिंता । विसरे सर्वथा श्रवणेंचि ॥७३॥

जो सद्भावो संतचरणीं । तोचि भावो ब्राह्मणीं ।

सुखी केले गुरु स्तवनीं । धन्य वाणी पैं तुझी ॥७४॥

तरी तुझेनि मुखें श्रीजनार्दन । स्वयें वदताहे आपण ।

हे बोलतांचि खूण । कळली संपूर्ण आम्हांसी ॥७५॥

चढत प्रमेयाचें भरतें । तें नावेक आवरोनि चित्तें ।

पुढील कथानिरुपणातें । करीं निश्चितें आरोहण ॥७६॥

विसरलों होतों हा भावो । परी भला दिधला आठवो ।

याचिलागीं सद्भावो । तुमचे चरणीं पहा हो ठेविला ॥७७॥

उणें देखाल जें जें जेथें । तें तें करावें पुरतें ।

सज्जनांमाजीं सरतें । करावें मातें ग्रंथार्थसिद्धी ॥७८॥

ते म्हणती भला रे भला नेटका । बरवी ही आया आली ग्रंथपीठिका ।

आतां संस्कृतावरी टीका । कविपोषका वदें वहिला ॥७९॥;

याचि बोलावरी माझा भावो । ठेवूनि पावलों पायांचा ठावो ।

तरी आज्ञेसारिखा प्रस्तावो । करीन पाहा हो कथेचा ॥१८०॥

तरी नैमिषारण्याआंतु । शौनकादिकांप्रति मातु ।

सूत असे सांगतु । गतकथार्थु अन्वयो ॥८१॥

मागें दहावे स्कंधीं जाण । कथा जाली नव-लक्षण ।

आतां मोक्षाचें उपलक्षण । सांगे श्रीकृष्ण एकादशीं ॥८२॥

जो चिदाकाशींचा पूर्णचंद्र । जो योगज्ञाननरेंद्र ।

तो बोलता झाला शुक योगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ॥८३॥

तंव परीक्षिती म्हणे स्वामी । याचिलागीं त्यक्तोदक मी ।

तेचि कृपा केली तुम्हीं । तरी धन्य आम्ही निजभाग्यें ॥८४॥

अगा हे साचार मोक्षकथा । ज्यांसि मोक्षाची अवस्था ।

तिहीं पाव देऊनि मनाचे माथां । रिघावें सर्वथा श्रवणादरीं ॥८५॥

भीतरी नेऊनियां कान । कानीं द्यावें निजमन ।

अवधाना करुनि सावधान । कथानुसंधान धरावें ॥८६॥;

बहुतीं अवतारीं अवतरला देवो । परी या अवतारींचा नवलावो ।

देवां न कळे अभिप्रावो । अग्मय पहा हो हरिलीला ॥८७॥

उपजतांचि मायेवेगळा । वाढिन्नला स्वयें स्वलीळा ।

बाळपणीं मुक्तीचा सोहळा । पूतनादि सकळां निजांगें अर्पी ॥८८॥

मायेसि दाविलें विश्वरुप । गोवळां दाविलें वैकुंठदीप ।

परी गोवळेपणाचें रुप । नेदीच अल्प पालटों ॥८९॥

बाळ बळियांतें मारी । अचाट कृत्यें जगादेखतां करी ।

परी बाळपणाबाहेरी । तिळभरी नव्हेचि ॥१९०॥

ब्रह्म आणि चोरी करी । देवो आणि व्यभिचारी ।

पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी । हेही परी दाखविली ॥९१॥

अधर्में वाढविला धर्म । अकर्में तारिलें कर्म ।

अनेमें नेमिला नेम । अति निःसीम निर्दुष्ट ॥९२॥

तेणें संगेंचि सोडिला संगु । भोगें वाढविला योगु ।

त्यागेंवीण केला त्यागु । अति अव्यंगु निर्दोष ॥९३॥

कर्मठां होआवया बोधु । कर्मजाडयाचे तोडिले भेदु ।

भोगामाजीं मोक्षपदु । दाविलें विशदु प्रकट करुनि ॥९४॥

भक्ति भुक्ति मुक्ति । तिन्ही केलीं एके पंक्ती ।

काय वानूं याची ख्याति । खाऊनि माति विश्वरुप दावी ॥९५॥

त्याचिया परमचरित्रा । तुज सांगेन परमपवित्रा ।

परी निजबोधाचा खरा । या अवतारीं पुरा पवाडा केला ॥९६॥;

एकादशाच्या तात्पर्यार्थीं । संक्षेपें विस्तरे मुक्ति ।

बोललीसे आद्यंतीं । परमात्मस्थिति निजबोधें ॥९७॥

तेथें नारदें वसुदेवाप्रती । संवादूनि निमि-जायंती ।

सांगितली कथासंगती । ’संक्षेपस्थिति’ या नाम ॥९८॥

तेचि उद्धवाची परमप्रीति । नाना दृष्टांतें उपपत्ति ।

स्वमुखें बोलिला श्रीपति । ते कथा निश्चितीं ’सविस्तर’ ॥९९॥

दशमीं ’निरोध’ लक्षण । मागां केलें निरुपण ।

जेथें धराभार अधर्मजन । निर्दळी श्रीकृष्ण नानायुक्ति ॥२००॥

ज्यांचेनि अधर्मभारें क्षिति । सदा आक्रंदत होती ।

जिच्या साह्यालागीं श्रीपति । पूर्णब्रह्मस्थिति अवतरला ॥१॥;

दुष्ट दैत्य आणि दानव । धराभार राजे सर्व ।

वधिता झाला श्रीकृष्णदेव । तो गतकथाभाव शुक सांगे ॥२॥