श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३ रा

भूमारराजपृतना यदुर्भिर्निरस्य गुप्तैः स्वबाहुभिरचिन्तयदप्रमेयः ।

मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं यद्यादवं कुलमहो ह्याविषह्यमास्ते ॥३॥

ऐसे पक्षपाती राजे अपार । अमित सेना धराभार ।

मारविले अधर्मकर । मिषांतर कलहाचें ॥१९॥

पृथ्वीचे अधर्मसेनासंभार । शोधशोधूनि राजे मारिले अपार ।

तर्‍ही उतरला धराभार । हें शारंगधर न मानीचि ॥२२०॥;

यादव करुन अतुर्बळ । नाना दुष्ट दमिले सकळ ।

परी यादव झाले अतिप्रबळ । हें न मनीच केवळ श्रीकृष्ण ॥२१॥

नव्हतां यादवांचें निदान । नुतरे धराभार संपूर्ण ।

ऐसें मानिता झाला श्रीकृष्ण । कुलनिर्दळण तो चिंती ॥२२॥

अग्नि कर्पूर खाऊनि वाढे । कापुरांतीं अग्निही उडे ।

तैसें यादवांचें अतिगाढें । आलें रोकडें निदान ॥२३॥

केळी फळे तंव वाढे वाढी । फळपाकें माळी झाड तोडी ।

तैशी यादव कुळाची शीग गाढी । चढे रोकडी मरणार्थ ॥२४॥

फळ षरिपाकें परिमळी । तें घेऊन जाय माळी ।

तैशीं स्वकुळफळें वनमाळी । न्यावया तत्काळीं स्वयें इच्छी ॥२५॥

अनंतबाहुप्रतापें । यादव वाढले श्रीकृष्णकृपें ।

तोचि निधनाचेनि संकल्पें । काळरुपें क्षोभला ॥२६॥

अतुर्बळ अतिप्रबळ । वाढलें जें यादवकुळ ।

ते वीर देखोनि सकळ । असह्य केवळ श्रीकृष्णासी ॥२७॥