श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४ था

नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत्कथंचिन्मत्यंश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् ।

अन्तःकलिं यदुकुलस्य विधाय वेणुस्तम्बस्य वह्निमिव शान्तमुपैमि धाम ॥४॥

मज गेलिया निजधामा । हेचि प्रवर्तती अधर्मा ।

श्रियोन्नत अतिगर्व महिमा। मुख्य अकर्मा निजहेतु ॥२८॥

हे मद्बळें अतिप्रबळ । अतिरथी झाले सकळ ।

यांसि अप्रतिमल्ल दिग्मंडळ । यांतें दमिता केवळ मी एकु ॥२९॥

हे नाटोपती इंद्रादि देवां । दैत्य-राक्षसां कां दानवां ।

शेखीं निर्दाळावया यादवां । मागुतें मज तेव्हां पडेल येणें ॥२३०॥

तरी आतांचि आपुले दिठी । कुळ बांधूं काळगांठीं ।

ऐसा विचार जगजेठी । निश्चयें पोटीं दृढ केला ॥३१॥

यदुवंश-वंशजाळी । वाढली श्रीकृष्णकृपाजळीं ।

तेथें अवकृपेची इंगळी । ऋषिशापमेळीं कपटें पडली ॥३२॥

ते मुळी पेटली श्रीकृष्णसंकल्पें । धडाडली ब्रह्मशापें ।

ते स्वजनविरोधरुपें । काळाग्निकोपें नाशील ॥३३॥

ऐसें यावकुळनिर्दळण । करुनियां स्वयें श्रीकृष्ण ।

निरसूनि निजधामा गमन । स्वलीला आपण करुं इच्छी ॥३४॥