श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५ वा

एवं व्यवसितो राजन्सत्यसंकल्प ईश्वरः ।

शापव्याजेन विप्राणां संजह्ने स्वकुलं विभुः ॥५॥

यापरी आपुलें कुळ । नासूं आदरिलें तत्काळ ।

हाचि विचारु अढळ । केला समूळ कुळक्षयार्थ ॥३५॥

हेंचि कार्य होय कैसें । तें विचारिजे जगदीशें ।

ब्रह्मशापचेनि मिसें । कुळ अनायासें नासेल ॥३६॥

इतकें हें जैं सिद्धी जाय । तैं सरलें अवतारकृत कार्य ।

मग स्वधामा यदुवर्य । जावों पाहे स्वलीला ॥३७॥

लीलाविग्रही सुंदरपूर्ण । गुणकर्मक्रिया अतिपावन ।

जगदुद्धारी श्रीकृष्ण । ब्रह्मपरिपूर्ण पूर्णावतार ॥३८॥