श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १५ वा

 

प्रष्टु विलज्जती साक्षात्प्रब्रूतामोधदर्शनाः ।

प्रसोष्यन्ती पुत्रकामा किंस्वित्सजनयिष्यति ॥१५॥

स्वयें येऊन तुम्हांप्रती । तिचेनि न बोलवे निश्चितीं ।

यालागीं आम्हांहातीं । सेवेसि विनंती करविली ॥५७॥

तुम्ही सत्यदर्शी साचार । अमोघवीर्य तुमचें उत्तर ।

शिरीं वंदिती हरिहर । ज्ञानें उदार तुम्ही सर्व ॥५८॥

यालागीं हे गर्भवती । सादरें असे पुसती ।

पुत्रकाम असे वांछिती । काय निश्चितीं प्रसवेल ॥५९॥;

ऐसे कपटाचेनि वालभें । विनीत कर जोडूनि उभे ।

तैशींच फलें भावगर्भें । छळणलोभें पावती ॥३६०॥

कर्म जाणोनियां कुडें । नारदु नाचे ऋषींपुढें ।

मुनि म्हणे यादवांचें गाढें । निधन रोकडें वोढवलें ॥६१॥

मुंगिये निघालिया पांख । तिसी मरण ये अचूक ।

तेवीं ब्राह्मणछळणें देख । आवश्यक कुळनाश ॥६२॥

शापीत आलिया द्विजजन । त्यांसि सद्भावें करावें नमन ।

मारुं आलिया ब्राह्मण । मस्तक आपण वोढवावें ॥६३॥

त्या ब्राह्मणांसि छळण । तें जाणावें विषभक्षण ।

विषें निमे भक्षित्याचा प्राण । कुळनिर्दळण द्विजछळणें ॥६४॥

अविद्य सुविद्य न म्हणतां जाण । धरातळीं ब्रह्म ब्राह्मण ।

त्याचें करुं जातां छळण । कुळनिर्दळण आवश्यक ॥६५॥;