श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३ रा

तमेकदा देवर्षि वसुदेवो गृहागतम् ।

अर्चितं सुखमासीनमभिवाद्येदमब्रवीत् ॥३॥

धन्य धन्य तो नारदु । ज्यासी सर्वीं सर्वत्र गोविंदु ।

सर्वदा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदु सदोदित ॥३७॥

जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ।

ज्याचेनि संगें तत्त्वतां । नित्यमुक्तता जडजीवां ॥३८॥

तो नारदु एके वेळां । स्वानंदाचिया स्वलीळा ।

आला वसुदेवाचिया राउळा । तेणें देखोनि डोळां हरिखला ॥३९॥

केलें साष्टांग नमन । बैसों घातलें वरासन ।

ब्रह्मसद्भावें पूजन । श्रद्धासंपूर्ण मांडिलें ॥४०॥

नारद तोचि नारायण । येणें विश्वासेंकरुनि जाण ।

हेमपात्रीं चरणक्षाळण । मधुपर्कविधिपूर्ण पूजा केली ॥४१॥;

पूजा करोनि सावधानीं । वसुदेव बैसोनी सुखासनीं ।

हृदयीं अत्यंत सुखवोनी । काय आल्हादोनी बोलत ॥४२॥