श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २८ वा

विदेह उवाच-मन्ये भगवतः साक्षात्पार्षदान्वो मधुद्विषः ।

विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्ति हि ॥२८॥

सार्वभौम चक्रवर्ती । देहीं असोनि विदेहस्थिती ।

तो जनकु आर्पभांप्रती । अतिप्रीतीं विनवितु ॥१६॥

त्यांच्या भेटीसवें उलथलें सुख । विदेहासी देहेंवीण हरिख ।

तेणें हरिखेंकरुनियां देख । प्रीतिपूर्वक विनवितु ॥१७॥

तुमचें सामर्थ्य पाहतां येथ । तुम्ही ईश्वररुप समस्त ।

देहभावें तरी भगवद्भक्त । जैसे पार्षद हरीचे ॥१८॥

देवो आपुला आपण भक्तु । ऐसा जो कां उपनिषदर्थु ।

तो साच करुनि वेदार्थु । निजपरमार्थु अनुभवा ॥१९॥

’शिव होऊनि शिवु यजिजे’ । हें लक्षण तुम्हांसीच साजे ।

येरीं हे बोलचि बोलिजे । परी बोलते वोजें अर्थ न लभे ॥२२०॥

विष्णूनें सृष्टीं जें जें स्त्रजणें । तें तें तुम्हीं पवित्र करणें ।

मही विचरायाचीं कारनें । कृपाळूपणें दीनोद्धारा ॥२१॥

तुम्ही विचरा विश्वकणवा । परी भेटी होय प्राप्ति तेव्हां ।

आजि लाधलों तुमची सेवा । उद्भट दैवाथिलों मी ॥२२॥

आजि माझें धन्य दैव । आजि माझें धन्य वैभव ।

आजि धन्य मी सर्वीं सर्व । हे चरण अपूर्व पावलों ॥२३॥