श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३२ वा

नारद उवाच-

एवं ते निमिना पृष्टा वसुदेव महत्तमाः ।

प्रतिपूज्याब्रुवन्प्रीत्या ससदस्यर्त्विजं नृपम् ॥३२॥

जो जगाची स्थिति गति जाणता । जो हरिहरांचा पढियंता ।

जो निजात्मज्ञानें पुरता । तो झाला बोलता नारदु ॥७६॥

नारद म्हणे वसुदेवा । विदेहें प्रश्न केला बरवा ।

तेणें परमानंदु तेव्हां । त्या महानुभावां उलथला ॥७७॥

संतोषोनि नवही मूर्ती । धन्य धन्य विदेहा म्हणती ।

ऋत्विजही सादर परमार्थी । सदस्य श्रवणार्थी अतितत्पर ॥७८॥

ऐसें देऊनि अनुमोदन । बोलते जाहले नवही जण ।

तेचि कथेचें निजलक्षण । नव प्रश्न विदेहाचे ॥७९॥

भागवतधर्म,भगवद्भक्त । माया कैसी असे नांदत ।

तिचा तरणोपाव येथ । केवीं पावत अज्ञानी ॥२८०॥

येथ कैसें असे परब्रह्म । कासया नांव म्हणिजे कर्म ।

अवतारचरित्रसंख्या परम । अभक्तां अधमगति कैशी ॥८१॥

कोणे युगीं कैसा धर्म । सांगावा जी उत्तमोत्तम ।

ऐसे नव प्रश्न परम । जनक सवर्म पुसेल ॥८२॥

ऐसे विदेहाचे प्रश्न । अनुक्रमें नवही जण ।

उत्तर देती आपण । तयांत प्रथम प्रश्न कवि सांगे ॥८३॥;