श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३३ वा

कविरुवाच -

मन्येऽकुतश्चिद्भयमच्युतस्य पादाम्बुजोपासनमत्र नित्यम् ।

उद्विग्नबुद्धेरसदात्मभावाद्विश्वात्मना यत्र निवर्तते भीः ॥३३॥

रायें पुशिलें ’आत्यंतिक क्षेम’ । तदर्थी कवि ज्ञाता परम ।

तो आत्यंतिक क्षेमाचें वर्म । भागवतधर्म प्रतिपादी ॥८४॥

ऐक राया नवलपरी । आपुला संकल्प आपणा वैरी ।

देहबुद्धी वाढवूनि शरीरीं । अतिदृढ करी भवभया ॥८५॥

जयापाशीं देहबुद्धी । त्यासी सुख नाहीं त्रिशुद्धी ।

ते बुडाले द्वंद्वसंधीं । आधिव्याधिमहार्णवीं ॥८६॥

जे देहबुद्धीपाशीं । सकळ दुःखांचिया राशी ।

महाभयाचीं भूतें चौंपाशीं । अहर्निशीं झोंबती ॥८७॥

देहबुद्धीचिया नरा । थोर चिंतेचा अडदरा ।

संकल्पविकल्पांचा मारा । ममताद्वारा अनिवार ॥८८॥

देहबुद्धीमाजीं सुख । अणुमात्र नाहीं देख ।

सुख मानिती ते महामूर्ख । दुःखजनक देहबुद्धी ॥८९॥

दीपाचे मिळणीपाशीं । केवळ दुःख पतंगासी ।

तरी आलिंगूं धांवे त्यासी । तेवीं विषयांसी देहबुद्धी ॥२९०॥

ऐशी असंत देहबुद्धी कुडी । वाढवी विषयांची गोडी ।

तेथें महाभयाची जोडी । जन्ममरणकोडी अनिवार ॥

एवढा अनिवार संताप । देहबुद्धीपाशीं महापाप ।

जाणोनि धरी जो अनुताप । विषयीं अल्प गुंतेना ॥९२॥

धरितां विषयांची गोडी । भोगाव्या जन्ममरणकोडी ।

येणें भयें विषय वोसंडी । इंद्रियांतें कोंडी अतिनेमें ॥९३॥

इंद्रियें कोंडितां न कोंडती । विषय सांडितां न सांडती ।

पुढतपुढती बाधूं येती । यालागीं हरिभक्ती द्योतिली वेदें ॥९४॥

इंद्रियें कोंडावीं न लगती । सहजें राहे विषयासक्ती ।

एवढें सामर्थ्य हरिभक्तीं । जाण निश्चितीं नृपवर्या ॥९५॥

योगी इंद्रियें कोंडिती । तीं भक्त लाविती भगवद्भक्तीं ।

योगी विषय जे त्यागिती । ते भक्त अर्पिती भगवंतीं ॥९६॥

योगी विषय त्यागिती । त्यागितां देह दुःखी होती ।

भक्त भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमुक्त ॥९७॥

हें नव्हे म्हणती विकल्पक । याचिलागीं येथें देख ।

’कायेन वाचा ’ हा श्लोक । अर्पणद्योतक बोलिजेला ॥९८॥

दारा सुत गृह प्राण । करावे भगवंतासी अर्पण ।

हे भागवतधर्म पूर्ण । मुख्यत्वें ’भजन’ या नांव ॥९९॥

अकराही इंद्रियवृत्ती । कैशा लावाव्या भगवद्भक्ती ।

ऐक राया तुजप्रती । संक्षेपस्थिती सांगेन ॥३००॥

’मनें’ करावें हरीचें ध्यान । ’श्रवणें’ करावें कीर्तिश्रवण ।

’जिव्हेनें’ करावें नामस्मरण । हरिकीर्तन अहर्निशीं ॥१॥

’करीं’ करावें हरिपूजन । ’चरणीं’ देवालयगमन ।

’घ्राणीं’ तुलसीआमोदग्रहण । जिंहीं हरिचरण पूजिले ॥२॥

नित्य निर्माल्य मिरवे शिरीं । चरणतीर्थें अभ्यंतरीं ।

हरिप्रसाद ज्याचे उदरीं । त्या देखोनि दुरी भवभय पळे ॥३॥

वाढतेनि सद्भावें जाण । चढतेनि प्रेमें पूर्ण ।

अखंड ज्यासी श्रीकृष्णभजन । त्यासी भवबंधन असेना ॥४॥

सकल भयांमाजीं थोर । भवभय अतिदुर्धर ।

तेंही हरिभक्तीसमोर । बापुडें किंकर केवीं राहे ॥५॥

करितां रामकृष्णस्मरण । उठोनि पळे जन्ममरण ।

तेथें भवभयाचें तोंड कोण । धैर्यपण धरावया ॥६॥

जेथें हरिचरणभजनप्रीती । तेथें भवभयाची निवृत्ती ।

परम निर्भय भगवद्भक्ती । आमुच्या मतीं निजनिश्चयो ॥७॥

कृतनिश्चयो आमुचा जाण । येथें साक्षी वेद-शास्त्र-पुराण ।

सर्वात्मा भगवद्भजन । निर्भयस्थान सर्वांसी ॥८॥;

असो वेद शास्त्र पुराण । स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण ।

मी सर्वथा भक्तिआधीन । भक्तिप्रधान भगवद्वाक्य ॥९॥

उभवूनियां चारी बाह्या । निजात्मप्राप्तीच्या उपाया ।

’भक्त्याहमेकया ग्राह्यः’ । बोलिला लवलाह्यां श्रीकृष्ण ॥३१०॥