श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३६ वा

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्धयात्मना वाऽनुसृतः स्वभावात् ।

करोति यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥३६॥

हेतुक अथवा अहेतुक । वैदिक लौकिक स्वाभाविक ।

भगवंतीं अर्पे सकळिक । या नांव देख ’भागवतधर्म’ ॥४७॥

उदकीं तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ ।
तैसें भक्ताचें कर्म सकळ । अर्पे तत्काळ भगवंतीं ॥४८॥

ये श्लोकींचें व्याख्यान । पहिलें मानसिक अर्पण ।

पाठीं इंद्रियें बुद्धि अभिमान । कायिक जाण श्लोकान्वयें ॥४९॥

भागवतधर्माची निजस्थिती । मन बुद्धि चित्त अहंकृती ।

आदिकरुनि इंद्रियवृत्ती । भगवंतीं अर्पिती तें ऐक ॥३५०॥

बाधूं न शके स्वधर्मकर्म । ऐक राया त्याचें वर्म ।

मनीं प्रगटला पुरुषोत्तम । अतिनिःसीम निजबोधें ॥५१॥

म्हणोनि संकल्पविकल्प । अवघे जाहले भगवद्रूप ।

यालागीं भक्त नित्य निष्पाप । सत्यसंकल्प हरिदास ॥५२॥

जेवीं बुद्धिबळांचा खेळ । राजा प्रधान गजदळ ।

अवघे काष्ठचि केवळ । तेवीं संकल्प सकळ भगवद्रूप ॥५३॥

जो जो संकल्प कामी कामु । तो तो होय आत्मारामु ।

तेथ भजनाचा संभ्रमु । अतिनिःसीमु स्वयें वाढे ॥५४॥

जागृति सुषुप्ती स्वपन । तिहीं अवस्थां होय भजन ।

तेथ अखंड अनुसंधान । निजबोधें पूर्ण ठसावलें अंगीं ॥५५॥

मना होतां समाधान । समाधानें अधिक भजन ।

पूर्ण बाणलें अनुसंधान । ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजे ॥५६॥

तुर्या साक्षी उन्मनी । याही लाविल्या भगद्भजनीं ।

जंववरी अवस्थापणीं । आपआपणीं मुकल्या नाहीं ॥५७॥

ऐसा भावनेवीण उपजे भावो । तो तो तत्काळ होय देवो ।

मग अर्पणाचा नवलावो । न अर्पितां पहा हो स्वयें होय ॥५८॥

स्वरुपें मिथ्या केलें स्वप्न । जागृती सोलूनि काढिलें ज्ञान ।

निवडोनि सुषुप्तिसुखसमाधान । तिहींतें पूर्ण एकत्र केलें ॥५९॥

तये स्वरुपीं सगळें मन । स्वयेंचि करी निजात्मार्पण ।

तेथींचें सुखसमाधान । भक्त सज्ञान जाणती स्वयें ॥३६०॥

यापरी मानसिक जाण । सहज स्वरुपीं होय अर्पण ।

आतां इंद्रियांचें समर्पण । होय तें लक्षण ऐक राया ॥६१॥

दीपु लाविजे गृहाभीतरीं । तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं ।

तेवीं मनीं प्रगटला श्रीहरी । तोचि इंद्रियांतरीं भजनानंदु ॥६२॥;

तोचि इंद्रियव्यापार । सांगिजती सविस्तर ।

स्वाभाविक इंद्रियव्यवहार । भजनतत्पर परब्रह्मीं ॥६३॥

जंव दृष्टि देखे दृश्यातें । तंव देवोचि दिसे तेथें ।

यापरी दृश्यदर्शनातें । अर्पी भजनसत्ते दृष्टीचा विषयो ॥६४॥

दृश्य द्रष्टा आणि दृष्टी । देखतां तिन्ही एकवटी ।

सहजें ब्रह्मार्पण ते दृष्टी । भक्त जगजेठी यापरी अर्पी ॥६५॥

दृश्य प्रकाशी दृश्यपणें । तेंचि दृष्टीमाजीं होय देखणें ।

ऐसेनि अभिन्नपणें । दर्शनार्पणें भजती भक्त ॥६६॥

हे एकपणीं तीनही भाग । तिन्हीमाजीं एक अंग ।

ऐसें जें देखणें चांग । त्याचि अर्पणें साङग सहजें अर्पी ॥६७॥

नाना पदार्थ प्रांजळे । नीच नवे देखती डोळे ।

परी अर्पणाचे सोहळे । निजात्ममेळें अर्पिती स्वयें ॥६८॥

यापरी दृष्टीचें दर्शन । भक्त करिती ब्रह्मार्पण ।;

आतां श्रवणाचें अर्पण । अर्पी तें लक्षण ऐक राया ॥६९॥

जो बोलातें बोलविता । तोचि श्रवणीं झाला श्रोता ।

तोचि अर्थावबोधु जाणता । तेथें ब्रह्मार्पणता सहजेंचि ॥३७०॥

शब्दु शब्दत्वें जंव उठी । तंव शब्दविता प्रगटे पाठींपोटीं ।

तेणें अकृत्रिम भजन उठी । ब्रह्मार्पणमिठी श्रवणीं पडे ॥७१॥

शब्दबोलासवें अर्थवाढी । तंव शब्दविता घे शब्दार्थगोडी ।

तेणें हरिभजनीं आवडी । स्वयें उठी गाढी श्रवणार्पणेंसीं ॥७२॥

शब्द जंव कानीं पडे । तंव शब्दार्थें भजन वाढे ।

बोलवित्याच्या अंगा घडे । अर्पण उघडें करितांचि ॥७३॥

बोलासी जो बोलविता । त्यासीं दृढ केली एकात्मता ।

तें भजन चढे श्रवणाच्या हाता । ब्रह्मार्पणता निजयोगें ॥७४॥

सद्गुरुवचन पडतां कानीं । मनाचें मनपण विरे मनीं ।

तेंचि श्रवण ब्रह्मार्पणीं । भगवद्भजनीं सार्थकता ॥७५॥

श्रवणेंचि यापरी श्रवण । करितां उठिलें ब्रह्मार्पण ।

हेतुरहित भगवद्भजन । स्वभावें जाण स्वयें होत ॥७६॥;

भजनें तुष्टला जगन्निवास । होय वासाचा निजवास ।

मग घ्राणद्वारा परेश । भोगी सुवास ब्रह्मार्पणेंसीं ॥७७॥

जो सुमना सुमनपण जोडी । तो घ्राणाचेंही घ्राण होय आवडी ।

मग नाना सुवासपरवडी । ब्रह्मार्पणप्रौढीं निजभोग अर्पी ॥७८॥

वासाचा अवकाश होय आपण । घ्राणीं ग्राहकपणें जाण ।

तो भोगुचि स्वयें संपूर्ण । कृष्णार्पण सहज होतु ॥७९॥;

रसना रस सेवूं जाये । तंव रसस्वादु देवचि होये ।

मग रसनेमाजीं येऊनि राहे । ब्रह्मार्पणें पाहे रसभोगवृत्ती ॥३८०॥

जे जे रसना सेवी गोडी । ते ते हरिरुपें धडफुडी ।

स्वादा येऊनि रोकडी । ब्रह्मार्पणपरवडी निजभोग अर्पी ॥८१॥

रस-रसना-रसस्वादु । त्रिविधभेदें निजअभेदु ।

रससेवनीं परमानंदु । स्वानंदकंदु वोसंडे ॥८२॥

कटु मधुर नाना रस । रसना सेवी सावकाश ।

परी तो अवघा ब्रह्मरस । स्वादीं सुरस परमानंदु ॥८३॥

यापरी रसीं रसना । भोगें रतली कृष्णार्पणा ।;

आतां स्पर्शविषयरचना । अर्पे ब्रह्मार्पणा तें ऐक राया ॥८४॥

स्पर्श घेइजे निजदेहीं । तंव देहींच प्रगटे विदेही ।

मग स्पर्शी जें जें कांहीं । तो तो भोगु पाहीं ब्रह्मार्पणें उठी ॥८५॥

स्पर्शास्पर्शें जें स्पर्शिजे । तंव स्पर्शावया नाडळे दुजें ।

तेणें एकपणाचेनि व्याजें । कृष्णार्पणवोजें भजन प्रगटे ॥८६॥

तेथ जो जो घेईजे पदार्थु । तो तो पदार्थु होय समर्थु ।

तेणेंचि भजनें परमार्थु । निजस्वार्थु निजभक्तां ॥८७॥;

द्यावया कांहीं देवा जाये । तंव देतां भजन कैसें होये ।

देतें घेतें दान स्वयें । देवोचि होये निजांगें ॥८८॥;

जेउतें जेउतें चालवी पाये । तो तो मार्गु देवोचि होये ।

मग पाउलापाउलीं पाहे । निजभजन होये ब्रह्मार्पणेंशीं ॥८९॥

चरणा चरणा निजगती । तोचि निजांगें क्षितीची क्षिती ।

चालतां तैशिया युक्ती । सहज ब्रह्मस्थिति निजकर्में अर्पी ॥३९०॥;

बोल बोलवितिया वदनीं भेटी । बोलणें लाजे त्याचिया दृष्टी ।

ते लाज गिळून बोलणें उठी । निजभजनपुष्टी ब्रह्मार्पणेंसीं ॥९१॥

शब्द मावळे निःशब्दीं । निःशब्दचि बोलिजे शब्दीं ।

तोचि अर्पणाचा विधी । जाण त्रिशुद्धी समर्पितेनिशीं ॥९२॥

बोलु बोलविता बोलाआंतु । तो बोलु अर्पणेंसींच येतु ।

ऐसा शब्देंचि भजनार्थु । प्रकटे परमार्थु ब्रह्मार्पणेंसीं ॥९३॥;

ऐसा मनें-कर्में-वचनें । जो दृढावला भगवद्भजनें ।

तेंचि भजन अभिमानें । निजनिर्वाणें दृढ धरी ॥९४॥

तरंग समुद्राआंतौता । म्हणे माझेनि मेघु तत्त्वतां ।

जगातें निवविता जीवविता । तृषा हरिता चातकांची ॥९५॥

माझेनि सस्यें पिकती । माझेनि सरिता उसळती ।

मागुती मजमाजीं मिळती । समरसती सिंधुत्वें ॥९६॥

तेवीं मुळींचें पूर्णपण । पावोनि भजे अभिमान ।

त्याचे भजनाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥९७॥

म्हणे मी सकललोककर्ता । कर्म करोनि अकर्ता ।

मी सर्वभोगभोक्ता । नित्य अभोक्ता मी एकु ॥९८॥

सकळ लोकीं माझी सत्ता । सकळीं सकळांचा नियंता ।

सकळां सकळत्वें मी प्रकाशिता । होय मी शास्ता सकळिकांचा ॥९९॥

सकळां भूतीं मी एकु । मीचि व्याप्य व्यापकु ।

जनिता जनयिता जनकु । न होनि अनेकु जगद्रूप मी ॥४००॥

मी देवांचा आदिदेवो । देवीं देवपणा माझाचि भावो ।

व्ययामाजीं मी अज अव्ययो । अक्षरीं अक्षरभावो माझेनि अंगें ॥१॥

ईश्वरीं जे जे सत्ता । ते ते माझी समर्थ्यता ।

भगवंतीं भगवंतता । जाण तत्त्वतां माझेनि ॥२॥

मी आपरुपीं आपु । मी प्रकृतिपुरुषांचा बापु ।

सृष्टिरचनेचा संकल्पु । निर्विकल्प पैं माझा ॥३॥

मी आदीची अनादि आदी । मी समाधीची निजसमाधी ।

निजशुद्धीसी माझेनि शुद्धी । यापरी त्रिशुद्धी अभिमानार्पण ॥४॥

मी अजन्मा न जन्मोनि जन्में । मी अकर्मा न करोनि करीं कर्में ।

माझेनि योगें पुरुषोत्तमें । पाविजे महिमे उत्तमत्वाचे ॥५॥

सच्छब्दें माझें अंग । चिच्छब्दें मीचि चांग ।

न होनियां तिन्ही भाग । आनंद निर्व्यंग तोचि मी ॥६॥

माझेनि सूर्यदृष्टी डोळस । मजमाजीं चिदाकाशाचा अवकाश ।

माझेनि अंगें जगन्निवास । सावकाश नांदतु ॥७॥

अजा अजपणें मी अज । निःशेष निर्बीजां मी बीज ।

माझेनि निजांगें निज । निजभोज स्वयें नाचे ॥८॥

अधिष्ठाना मजमाजीं अधिवासु । मी जगदीशाचा पूर्ण ईशु ।

मी परम पुरुषाचाही पुरुषु । परेशा परेशु मीच स्वयें ॥९॥

असंत माझेनि संत होये । अचित्‌ माझेनि चिदत्व लाहे ।

निजानंदासीही पाहें । आनंदु निर्वाहे माझेनि ॥४१०॥

मी सकळ सिद्धींची निजसिद्धी । मी सर्वांगदेखणी बुद्धीची बुद्धी ।

मोक्ष म्हणणें तोही उपाधी । जाण त्रिशुद्धी माझेनि ॥११॥

मी साचार निजधर्म । मजमाजीं ब्रह्म विसरे कर्म ।

ब्रह्मसमाधीचें परब्रह्म । निजनिःसीम मीच मी ॥१२॥

हरि-हर-ब्रह्मा निजनिर्धारीं । हेही माझे अंशांशधारी ।

मी दशावतारांचा अवतारी । माझी निजथोरी मीही नेणें ॥१३॥

ऐसिया नाना विवंचना । अभिमानें भजे भगवद्भजना ।

’ब्रह्माहमस्मि’ दृढ भावना । आपण आपणा पूर्णत्वें अर्पी ॥१४॥

जीव घालूनि पूर्णत्वाआंतु । जें जें अभिमान कल्पितु ।

तें तें साचचि स्वयें होतु । तेंही पूर्णत्व अर्पितु निजपूर्णत्वीं ॥१५॥

’ब्रह्महमस्मि’ नुसधें वचन । ये अहंते नाम भगवद्भजन ।

मा हा तंव तद्रूप होऊन । भजे अभिमान ब्रह्मार्पणेंसीं ॥१६॥;

सांडूनि देहबुद्धीचा केरु । भजनें उठिला अहंकारु ।

तो अपरोक्ष निजसाक्षात्कारु । पावूनि पूर्ण निर्धारुअ पूर्णत्वें वते ॥१७॥

म्हणौनि मनना मीचि मनन । स्मरणा मीचि नित्य स्मरण ।

चित्तासी मी निजचिंतन । चिंत्यधर्मेंवीण सर्वदा ॥१८॥

ज्याची सहसा प्राप्ति नव्हे । तें निजचित्तेंचि चिंतावें ।

तंव अप्राप्तीची प्राप्ति पावे । चित्त निजानुभवें सहज भजतां ॥१९॥

तेव्हां निश्चितें जें जें चिंती चित्त । तें तें स्वयेंचि होय समस्त ।

या प्रतीतीं चित्त भजत । ब्रह्मार्पणयुक्त निजबोधें ॥४२०॥

नाथिलें चिंती ते ’अतिचिंता’ । आथिलें चिंती ते ’निश्चिंतता’ ।

आथी नाथी सांडिली चिंता । सहजें न भजतां भजन होये ॥२१॥

चित्त चिंत्य आणि चिंतन । यापरी तिहींस जाहलें समाधान ।

तें समाधानही कृष्णार्पण । सहजीं संपूर्ण स्वयें होये ॥२२॥;

ऐसिया भगवद्भजनविधीं । भजनशील झाली बुद्धी ।

तैं सकळ कर्मी समाधी । जाण त्रिशुद्धी स्वयें झाली ॥२३॥

कर्माचरणीं समाधी । एक म्हणती न घडे कधीं ।

ते पावले नाहीं निजात्मबोधीं । जाण त्रिशुद्धी विदेहा ॥२४॥

ताटस्थ्या नांव समाधी । म्हणे त्याची ठकली बुद्धी ।

ते समाधी नव्हे त्रिशुद्धी । जाणावी नुसधी मूर्च्छा आली ॥२५॥

ताटस्थ्यापासूनि उठिला । तैं तो समाधीस मुकला ।

तेव्हां एकदेशी भावो आला । मंदही या बोला न मानिती सत्य ॥२६॥

समाधी आणि एकदेशी । बोलतां बोलणें ये लाजेसी ।

सत्य मानी ते शब्दपिशी । शुद्ध स्वरुपासी अनोळख ॥२७॥

येथें प्राचीन अतिसमर्थ । तें मूर्च्छा आणोनि करी तटस्थ ।

वांचूनि चालते बोलते समाधिस्थ । जाण पां निश्चित वसिष्ठादिक ॥२८॥

पाहें पां देवर्षि नारदु । विनोदें न मोडे समाधिबोधु ।

याज्ञवल्क्याचा समाधिसंबंधु । ऋषिप्रसिद्धु परीक्षा केली ॥२९॥

स्वरुप देखोनि मूर्च्छित जाहला । तो आपणियां आपण तरला ।

स्वयें तरुनि जन उद्धरिला । तो बोधु प्रकाशिला शुकवामदेवीं ॥४३०॥

यालागीं समाधि आणि व्युत्थान । या दोनी अवस्थांसहित जाण ।

बुद्धी होये ब्रह्मार्पण । अखंडत्वें पूर्ण परमसमाधि ॥३१॥

अर्जुना देऊनि निजसमाधी । सवेंचि घातला महायुद्धीं ।

परी तो कृष्ण कृपानिधी । ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पर्शों ॥३२॥

सकळ कर्मी समाधी । हे सद्गुरुचि बोधी बुद्धी ।

तरी युद्धींही त्रिशुद्धी । निजसमाधी न मोडे ॥३३॥

बुद्धीं आकळलें परब्रह्म । तैं अहैतुक चाले कर्म।

हेंचि बुद्धीचें अर्पण परम । इतर तो भ्रम अनुमानज्ञान ॥३४॥

स्वरुपीं दृष्टी निरवधी । अनवच्छिन्न समानबुद्धी ।

कर्माकर्मी अज्ञान न बाधी । ’परमसमाधी’ तिये नांव ॥३५॥

निःशेष गेलिया देहबुद्धी । स्वरुपपणें फुंज न बाधी ।

कर्माकर्मी अज्ञान न बाधी । ते ’परमसमाधी’ निर्दुष्ट ॥३६॥

ते स्वरुपीं निरवधी । भजनशीळ झाली बुद्धी ।

ते सकळ कर्मी समाधी । निजार्पणविधी स्वयें जाहली ॥३७॥

जेथें शमली मनाची आधी । ते जाणावी ’परमसमाधी’ ।

समाधी घेणें ते देहबुद्धी । काष्ठ तें त्रिशुद्धी मूर्च्छितप्राय ॥३८॥;

मनासी ठाउकें नसे । इंद्रियीं व्यापारु तरी दिसे ।

कर्म निपजे जें ऐसें । तें जाणिजे आपैसें ’कायिक’ ॥३९॥

श्वासोच्छवासांचे परिचार । कां निमेषोन्मेषांचे व्यापार ।

तेही नारायणपर । केले साचार निजस्वभावें ॥४४०॥

तरी देहगेहवर्णाश्रमें । स्वभागा आलीं जीं जीं कर्में ।

तीं तीं आचरोनि निजधर्में । पूर्वानुक्रमें अनहंकृती ॥४१॥

साकरेचें कारलें प्रौढ । तें देठू-कांटेनशीं सर्वही गोड ।

तेवीं इंद्रियकर्मगूढ । स्वादिष्ठ सदृढ ब्रह्मार्पणें ब्रह्मीं ॥४२॥

कर्मकलापु आघवा । आचरोनि आणी गौरवा ।

परी कर्तेपणाचिया गांवा । अहंभावा स्पर्शेना ॥४३॥

मजपासून झालें सत्कर्म । माझा आचार अति उत्तम ।

म्यां निरसिलें मरणजन्म । हा स्वभावें देहधर्म उठोंचि नेणे ॥४४॥

देहसंगें तरी वर्तणें । परी देहधर्म धरुं नेणे ।

देहस्वभाव लक्षणें । ब्रह्मार्पणें विचरती ॥४५॥

देहधर्माचा नुठे फांटा । ज्ञानगर्वाचा न चढेचि ताठा ।

यालागीं सहज भजनामाजिवटा । झाला तो पैंठा अनहंकृती ॥४६॥

त्यापासूनि जें जें निपजे । तें तें देवो म्हणे माझें खाजें ।

यालागीं ब्रह्मार्पणवोजें । त्याचे स्वभाव सहजें नार्पितां अर्पिती ॥४७॥

परिसाचे कसवटीवर्‍हें । जें जें लागे तें तें साडेपंधरें ।

तेवीं निपजे जें जें शरीरें । तें तें खरें परब्रह्म ॥४८॥

त्याचा खेळु तेंचि महापूजन । त्याची बडबड तेंचि प्रिय स्तवन ।

त्याचे स्वभावीं स्वानंदपूर्ण । श्रीनारायण सुखावे ॥४९॥

तो जेउती वास पाहे । आवडीं देवो तेउता राहे ।

मग पाहे अथवा न पाहे । तरि देवोचि स्वयें स्वभावें दिसे ॥४५०॥

तयासी चालतां मार्गें । तो मार्गु होइजे श्रीरंगें ।

तो देवाचिया दोंदावरी वेगें । चाले सर्वांगें डुल्लत ॥५१॥

जें जें कर्म स्वाभाविक । तें तें ब्रह्मार्पण अहेतुक ।

या नांव भजन निर्दोख । ’भागवतधर्म’ देख या नांव ॥५२॥

स्वाभाविक जें वर्तन । तें सहजें होय ब्रह्मार्पण ।

या नांव शुद्ध आराधन । भागवतधर्म पूर्ण जाण राया ॥५३॥

यापरी भगवद्भजनपथा । भय नाहीं गा सर्वथा ।

’अभय’ पुशिलें नृपनाथा । तें जाण तत्त्वतां भजनें होय ॥५४॥

येथें भयाचें कारण । राया तूं म्हणशील कोण ।

तेंही सांगों सावधान । ऐक श्रवणसौभाग्यनिधी ॥५५॥;