श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३७ वा

भयं द्वीतीयाभिनिवेशतः स्यादीशादपेतस्य विपर्ययोऽस्मृतिः ।

तन्माययाऽतो बुध आभजेत्तं भक्त्यैकयेशं गुरुदेवतात्मा ॥३७॥

आत्मा पूर्णत्वें सर्वत्र एक । तेथ जो म्हणे मी वेगळा देख ।

तेंचि अज्ञान भयजनक । दुःखदायक अतिद्वंद्वें ॥५६॥

भयाचें मूळ दृढ अज्ञान । त्याचें निवर्तक मुख्य ज्ञान ।

तेथ कां लागलें भगवद्भजन । ऐसा ज्ञानाभिमान पंडितां ॥५७॥

ऐक राया येचि अर्थी । ज्ञानासी कारण मुख्य भक्ती ।

हा कृतनिश्चयो आमुच्या मतीं । तेही उपपत्ती अवधारीं ॥५८॥

अज्ञानाचें मूळ माया । जे ब्रह्मादिकां न ये आया ।

गुणमयी लागली प्राणियां । जाण ते राया अति दुस्तर ॥५९॥

त्या मायेचें मुख्य लक्षण । स्वस्वरुपाचें आवरण ।

द्वैतांचें जें स्फुरे स्फुरण । ’मूळमाया’ जाण तिचें नांव ॥४६०॥

ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । ते स्वरुपीं स्फुरे जें मीपण ।

तेंचि मायेचें जन्मस्थान । निश्चयें जाण नृपनाथा ॥६१॥

ते मायेच्या निजपोटीं । भयशोकदुःखांचिया कोटी ।

ब्रह्माशिवादींचे लागे पाठी । इतरांची गोठी ते कोण ॥६२॥;

ते महामायेची निवृत्ती । करावया दाटुगी भगवद्भक्ती ।

स्वयें श्रीकृष्ण येचि अर्थी । बोलिला अर्जुनाप्रती गीतेमाजीं ॥६३॥

(भगवद्गीताश्लोकार्ध) - "मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥" (अ.७, श्लो. १४)

माया म्हणिजे भगवच्छक्ती । भगवद्भजनें तिची निवृत्ती ।

आन उपाय तेथें न चलती । भक्त सुखें तरती हरिमाया ॥६४॥

हरीची माया हरिभजनें । हरिभक्तीं सुखेंचि तरणें ।

हें निजगुह्य अर्जुनाचेनि कारणें । स्वयें श्रीकृष्णें सांगितलें ॥६५॥

मायेची हेचि निजपुष्टी । स्वरुपीं विमुख करी दृष्टी ।

द्वैतभावें अत्यंत लाठी । भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा ॥६६॥

भयाचें जनक द्वैतभान । द्वैतजनक माया जाण ।

मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । हें संत सज्ञान बोलती ॥६७॥

ऐसें श्रेष्ठ जें ब्रह्मज्ञान । तें भक्तीचें पोसणें जाण ।

न करितां भगवद्भजन । ब्रह्मज्ञान कदा नुपजे ॥६८॥

जरी जाहले वेदशास्त्रसंपन्न । तिहीं न करितां भगवद्भजन ।

मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । तयांसीही जाण कदा नुपजे ॥६९॥

शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । दाटुगी होय लौकिक स्थिती ।

मायानिवर्तक ज्ञानप्राप्ती । न करितां हरिभक्ती कदा नुपजे ॥४७०॥

हरिगुणांची रसाळ कहाणी । ते ब्रह्मज्ञानाची निजजननी ।

हरिनामाचेनि गर्जनीं । जीव घेऊनि माया पळे ॥७१॥

माया पळतां पळों न लाहे । हरिनामधाकें विरोनि जाये ।

यालागीं हरिमाया पाहें। बाधूं न लाहे हरिभक्तां ॥७२॥

नामाची परम दुर्धर गती । माया साहों न शके निजशक्ती ।

हरिभक्त माया सुखें तरती । यालागीं श्रीपती बोलिला स्वयें ॥७३॥;

सायुज्यादि चारी मुक्ती । अंकीं वाढवी भगवद्भक्ती ।

ते न करितां अनन्यगती । शास्त्रज्ञां मुक्ती न घडे कदा ॥७४॥

हरिभजनीं जे विमुख । त्यांसी सदा द्वैत सन्मुख ।

महाभयेंसीं दुःखदायक । प्रपंचु देख दृढ वाढे ॥७५॥

जेवीं एकाएकीं दिग्भ्रमु पडे । तो पूर्व म्हणे पश्चिमेकडे ।

तैसी वस्तुविमुखें वाढे । अतिगाढें मिथ्या द्वैत ॥७६॥

द्वैताचिये भेदाविहिरे । सुटती संकल्पविकल्पांचे झरे ।

तेथ जन्ममरणांचेनि पूरें । बुडे एकसरें ब्रह्मांडगोळ ॥७७॥

जन्ममरणांचिया वोढी । नाना दुःखांचिया कोडी ।

अभक्त सोशिती सांकडीं । हरिभक्तांतें वोढी स्वप्नींही न लगे ॥७८॥;

भक्तीचें अगाध महिमान । तेथें रिघेना भवबंधन ।

तें करावया भगवद्भजन । सद्गुरुचरण सेवावे ॥७९॥

निजशिष्याची मरणचिंता । स्वयें निवारी जो वस्तुतां ।

तोचि सद्गुरु तत्त्वतां । येर ते गुरुता मंत्रतंत्रोपदेशें ॥४८०॥

मंत्रतंत्र उपदेशिते । घरोघरीं गुरु आहेत आइते ।

जो शिष्यासी मेळवी सद्वस्तूतें । सद्गुरु त्यातें श्रीकृष्ण मानी ॥८१॥

गुरु देवो गुरु माता पिता । गुरु आत्मा ईश्वर वस्तुतां ।

गुरु परमात्मा सर्वथा । गुरु तत्त्वतां परब्रह्म ॥८२॥

गुरुचे उपमेसमान । पाहतां जगीं न दिसे आन ।

अगाध गुरुचें महिमान । तो भाग्येंवीण भेटेना ॥८३॥

निष्काम पुण्याचिया कोडी । अगाध वैराग्य जोडे जोडी ।

नित्यानित्यविवेकआवडी । तैं पाविजे रोकडी सद्गुरुकृपा ॥८४॥

सद्गुरुकृपा हातीं चढे । तेथें भक्तीचें भांडार उघडे ।

तेव्हां कळिकाळ पळे पुढें । कायसें बापुडें भवभय ॥८५॥

गुरुतें म्हणों मातापिता । ते एकजन्मीं सर्वथा ।

हा सनातन तत्त्वतां । जाण पां वस्तुता मायबापु ॥८६॥

अधोद्वारें उपजविता । ते लौकिकीं मातापिता ।

अधोद्वारा आतळों नेदिता । तो सद्गुरु पिता सत्यत्वें शिष्यां ॥८७॥

गुरुतें म्हणों कुळदेवता । तिची कुळकर्मीच पूज्यता ।

हा सर्व कामीं अकर्ता । पूज्य सर्वथा सर्वार्थी ॥८८॥

गुरु म्हणों देवासमान । तंव देवांसी याचेनि देवपण ।

मग त्या सद्गुरुसमान । देवही जाण तुकेना ॥८९॥

गुरु ब्रह्म दोनी समान । हेही उपमा किंचित न्यून ।

गुरुवाक्यें ब्रह्मा ब्रह्मपण । तें सद्गुरुसमान अद्वयत्वें ॥४९०॥

यालागीं अगाध गुरुगरिमा । उपमा नाहीं निरुपणा ।

ब्रह्मीं ब्रह्मत्व-प्रमाण-प्रमा । हे वाक्यमहिमा गुरुची ॥९१॥

ब्रह्म सर्वांचें प्रकाशक । सद्गुरु तयाचाही प्रकाशक ।

एवं गुरुहूनि अधिक । नाहीं आणिक पूज्यत्वें ॥९२॥

यालागीं गुरुतें मनुष्यबुद्धीं । पाहों नये गा त्रिशुद्धी ।

ऐशिये भावार्थबुद्धी । सहजें चित्तशुद्धी सच्छिष्यां ॥९३॥

ज्यांचा गुरुचरणीं निःसीम भावो । त्यांचा मनोरथ पुरवी देवो ।

गुरुआज्ञा देवो पाळी पहा हो । गुरुवाक्यें स्वयमेवो जड मूढ तारी ॥९४॥

ब्रह्मभावें जे गुरुसेवक । देवो त्यांचा आज्ञाधारक ।

त्यांसी नित्य पुरवी निजात्मसुख । हे गुरुमर्यादा देख नुल्लंघी देवो ॥९५॥

देवो गुरुआज्ञा स्वयें मानी । तंव गुरु देवासी पूज्यत्व आणी ।

एवं उभयतां अभिन्न्पणीं । भावार्थियांलागोनी तारक ॥९६॥

सद्भावो नाहीं अभ्यंतरीं । बाह्य भक्ति भावेंचि करी ।

ते भावानुसारें संसारीं । नानापरी स्वयें ठकती ॥९७॥

ठकले ते मनुष्यगती । ठकले ते निजस्वार्थी ।

ठकले ते ब्रह्मप्राप्ती । दंभें हरिभक्ती कदा नुपजे ॥९८॥

येथ भावेंवीण तत्त्वतां । परमार्थु न ये हाता ।

सकळ साधनांचे माथां । जाण तत्त्वतां सद्भावो ॥९९॥

कोरडिये खांबीं धरितां सद्भावो । तेथेंचि प्रगटे देवाधिदेवो ।

मा सद्गुरु तंव तो पहा वो । स्वयें स्वयमेवो परब्रह्म ॥५००॥

यालागीं गुरुभजनापरता । भजावया मार्गु नाहीं आयता ।

ज्ञान-भक्ति जे तत्त्वतां । ते जाण सर्वथा सद्गुरुभक्ति ॥१॥

गुरुहूनि श्रेष्ठ ब्रह्म । म्हणतां गुरुत्वा आला कनिष्ठ धर्म ।

ऐसा भाव धरितां विषम । ब्रह्मसाम्य शिष्यां नुपजे ॥२॥

आम्हां सद्गुरु तोचि परब्रह्म । ऐसा नित्य निजभाव सप्रेम ।

हेचि गुरुसेवा उत्तमोत्तम । शिष्य परब्रह्म स्वयें होये ॥३॥

ऐशिये गुरुसेवेआंत । प्रल्हाद झाला द्वंद्वातीत ।

नारद स्वानंदें गात नाचत । ब्रह्मसाम्यें विचरत सुरासुरस्थानें ॥४॥

ऐसीचि गुरुसेवा करितां । चुकली अंबरीषाची गर्भव्यथा ।

ते गर्भ जाहला देवोचि साहता । भक्तां भवव्यथा बाधों नेदी ॥५॥

ऐशिया अभिन्न भावना । सुबुद्धी भजती गुरुचरणां ।

ते पढियंते जनार्दना । त्यांसी भवभावना शिवों नेदी ॥६॥

गुरु ब्रह्म दोनी एक । शिष्यही असे तदात्मक ।

जे भेदें मानिती वेगळिक । तेही मायिक कवि सांगे ॥७॥