श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३९ वा

श्रृण्वन् सुभद्राणि रथाङगपाणेर्जन्मानि कर्माणि च यानि लोके ।

गीतानि नामानि तदर्थकानि गायन्विलज्जो विचरेदसङगः ॥३९॥

तरावया भाळेभोळे जन । मुख्य चित्तशुद्धीच कारण ।

जन्मकर्म हरीचे गुण । करावे श्रवण अत्यादरें ॥२५॥

चुकल्या पुत्राची शुद्धिवार्ता । जेणें सादरें ऐके माता ।

तेणें सादरें हरिकथा । सार्थकता परिसावी ॥२६॥

हरीचीं जन्मकर्में अनंत गुण । म्हणाल त्यांचें नव्हेल श्रवण ।

लोकप्रसिद्ध जें जें पुराण । तें श्रद्धा संपूर्ण ऐकावें ॥२७॥

बहु देव बोलिले पुराणीं । तेही लागती ज्याचे चरणीं ।

तो समर्थ चक्रपाणी । जो वेदपुराणीं वंदिजे ॥२८॥

त्याचीं जीं जीं जन्में अतिअद्भुत । जीं जीं कर्में परमार्थयुक्त ।

स्वमुखें बोलिला भगवंत । तीं तीं ज्ञानार्थ परिसावीं ॥२९॥

जें जें केलें पुराणश्रवण । तें तें व्यर्थ होय मननेंविण ।

यालागीं श्रवण-मनन । सावधान करावें ॥५३०॥

मोलें घेतली जे गाये । दुभतें खातां विषय होये ।

तेचि दान देतां लवलाहें । दुभती होये परमामृतें ॥३१॥

तेवीं केलें जें श्रवण । तें मननें परम पावन ।

तेंचि उपेक्षितां जान । परिपाकीं पूर्ण वांझ होय ॥३२॥

हरिनाम पडतां श्रवणीं । एकां गळोनि जाये वदनीं ।

एकां ये कानींचें ते कानीं । जाय निघोनि हरिनाम ॥३३॥

हरिनाम पडतां श्रवणीं । ज्याचे रिघे अंतःकरणीं ।

सकळ पापा होवोनि धुणी । हरिचरणीं तो विनटे ॥३४॥

यापरी श्रवणीं श्रद्धा । मननयुक्त करितां सदा ।

तैं विकल्प बाधीना कदा । वृत्ति शुद्धा स्वयें होये ॥३५॥

ऐसें मननयुक्त श्रवण । करितां वोसंडे हर्ष पूर्ण ।;

तेणें हर्षें हरिकीर्तन । करी आपण स्वानंदें ॥३६॥

हरिचरित्रें अगाध । ज्ञानमुद्रा-पदबंध ।

कीर्तनीं गातां विशद । परमानंद वोसंडे ॥३७॥

वानिती अजन्मयाचीं जन्में । वानिती अकर्मियाचीं कर्में ।

स्मरती अनामियाचीं नामें । अतिसप्रेमें डुल्लत ॥३८॥

साधावया निजकाज । सांडूनि लौकिकाची लाज ।

कीर्तनीं नाचती भोज । अतिनिर्लज्ज निःशंक ॥३९॥

कीर्तनें निर्दळिले दोष । जप तप ठेले निरास ।

यमलोक पाडिला वोस । तीर्थाची आस निरास जाहली ॥५४०॥

यमनियमां पडती उपवास । मरों टेंकले योगाभ्यास ।

कीर्तनगजरें हृषीकेश । निर्दाळी दोष नाममात्रे ॥४१॥

कीर्तनाचा घडघडाट । आनंदु कोंदला उद्भट ।

हरुषें डोले वैकुंठपीठ । तेणें सुखें नीलकंठ तांडवनाचें नाचतु ॥४२॥

यापरी हरिकीर्तन । देत परम समाधान ।

हा भक्ति-राजमार्ग पूर्ण । ये मार्गी स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥४३॥

चक्र घेऊनि भक्तांचे ठायीं । म्हणे तुझें कार्य कायी ।

मज जगीं वैरीचि नाहीं । भक्तद्वेषी पाहीं निजशस्त्रें नाशी ॥४४॥

चक्रें अभिमानाचा करी चेंदा । मोहममता छेदी गद ।

शंहें उद्बोधी निजबोधा । निजकमळें सदा निजभक्त पूजी ॥४५॥

जेथें चक्रपाणी रक्षिता । तेथें न रिघे भवभयाची कथा वार्ता ।

यापरी कीर्तिवंता । हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥४६॥;

ज्यांसी न करवे कथाश्रवण । अथवा न टके हरिकीर्तन ।

तिंहीं करावें नामस्मरण । ’राम-कृष्ण-गोविंद’ ॥४७॥

’अच्युत’ नामाची निजख्याती । चेवल्या कल्पांतीं हों नेदी च्युती ।

त्या नामातें जे नित्य स्मरती । ते जाण निश्चितीं अच्युतावतार ॥४८॥

रामकृष्णादि नामश्रेणी । अखंड गर्जे ज्यांची वाणी ।

त्यांसी तीर्थें येती लोटांगणीं । सुरवर चरणीं लागती स्वयें ॥४९॥

बाप नामाचें निजतेज । यम वंदी चरणरज ।

नामापाशीं अधोक्षज । चतुर्भुज स्वयें तिष्ठे ॥५५०॥

नामाचेनि पडिपाडें । कायिसें भवभय बापुडें ।

कळिकाळाचें तोंड कोणीकडे । नामापुढें रिघावया ॥५१॥

जेवढी नामाची शक्ती । तेवढें पाप नाहीं त्रिजगतीं ।

नामापाशीं चारी मुक्ती । जाण निश्चितीं विदेहा ॥५२॥

ऐक राया सावधान । नामापरतें सुगम साधन ।

सर्वथा नाहीं नाहीं आन । निश्चय जाण नेमस्त ॥५३॥

जन्म-नाम-कर्में श्रीधर । श्रवणें उद्धरती पामर ।

यालागीं हरिलीला सुभद्र । शास्त्रज्ञ नर वर्णिती ॥५४॥

ऐसा बाणल्या भक्तियोग । न धरी जाणपणाचा फूग ।

त्यजूनि अहंममतापांग । विचरती निःसंग हरिकीर्तनें ॥५५॥

करितां श्रवण स्मरण कीर्ति । तेणें वाढे सप्रेम भक्ति ।

भक्त विसरे देहस्फूर्ति । ऐक तेही स्थिति सांगेन राया ॥५६॥;