श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४८ वा

गृहीत्वापीन्द्रियैरर्थान्यो न द्वेष्टि न हृष्यति ।

विष्णोर्मायामिदं पश्यन् स वै भागवतोत्तमः ॥४८॥

इंद्रियें विषयांतें सेविती । परी सुखदुःख नुमटे चित्तीं ।

विषय मिथ्यात्वें देखती । ते जाण निश्चितीं उत्तम भक्त ॥५७॥

मृगजळीं जेणें केलें स्नान । तो नाहतां कोरडाचि जाण ।

तेवीं भोगीं ज्यांसी अभोक्तेपण । ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम ॥५८॥

’उत्तम भक्त विषय सेविती’ । हा बोलु रुढला प्राकृतांप्रती ।

त्यांसी विषयीं नाहीं विषयस्फूर्ती । त्यागिती भोगिती दोनी मिथ्या ॥५९॥

स्वप्नींचें केळें रायभोगें । जागा होऊनि खावों मागे ।

तेणें हातु माखे ना तोंडीं लागे । तेवीं विषयसंगें हरिभक्त ॥६६०॥

येथवरी मिथ्या विषयभान । तरी सेवावया त्यांसी काय कारण ।

येथ प्रारब्ध बळी पूर्ण । तें अवश्य जाण भोगवी ॥६१॥

परी मी एक विषयभोक्ता । ही स्वप्नींही त्यास नुमटे कथा ।

यालागीं उत्तम भागवतता । त्यासीच तत्त्वतां बाणली ॥६२॥

यापरी विषयासक्तीं । वर्तिजे उत्तम भक्तीं ।

याहूनि अगाध स्थिती । सांगेन तुजप्रती ते ऐक ॥६३॥;