श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५० वा

न कामकर्मबीजानां यस्य चेतसि सम्भवः ।

वासुदवैकनिलयः स व भागवतोत्तमः ॥५०॥

हृदयीं चिंतितां आत्माराम । तद्रूप जाहला हृदयींचा काम ।

त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम । देवदेवोत्तम तुष्टोनि प्रगटे ॥९३॥

तेथें ज्या ज्या वासना हृदयवासी । त्याही पकडल्या हरिसुखासी ।

एवं वासना जडल्या हरिरुपाशीं । हरि आश्रयो त्यांसी दृढ जाहला ॥९४॥

तेथ जो जो भक्तांसी कामु । तो तो होय आत्मारामु ।

वासनेचा निजसंभ्रमु । पुरुषोत्तमु स्वयें होये ॥९५॥

जगीं हरिभक्ति उत्तमोत्तम । भक्त कामेंचि करी निष्काम ।

चाळितां वासना-अनुक्रम । निर्वासन ब्रह्म प्रकाशे स्वयें ॥९६॥

ग्रासोग्रासीं रामस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण ।

भक्त भोगी मुक्तपण । या रीतीं जाण विदेहा ॥९७॥

ऐसा जो निष्कामनिष्ठ । तोचि भागवतांमाजीं श्रेष्ठ ।

त्यासीच प्रधानत्वपट । जाण तो वरिष्ठ उत्तमत्वें ॥९८॥

उत्तम भक्त कैसे विचरती । त्या भक्तांची विचरणस्थिती ।

ते सांगितली राया तुजप्रती । यथानिगुती तीं श्लोकीं ॥९९॥;

उत्तम भक्त कोणें लिंगेंसीं । आवडते जाहले भगवंतासी ।

तें लक्षण सांगावयासी । अतिउल्हासीं हरि बोले ॥७००॥