श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५१ वा

न यस्य जन्मकर्मभ्यां न वर्णाश्रमजातिभिः ।

सज्जतेऽस्मिन्नहंभावो देहे व स हरेः प्रियः ॥५१॥

प्राकृतां देहीं देहाभिमान । तेणें गुरुकृपा करितां भजन ।

पालटे अभिमानाचें चिन्ह । अहं नारायणभावनायुक्त ॥७०१॥

’अहं देह’ हें समूळ मिथ्या । ’अहं नारायण’ हें सत्य तत्त्वतां ।

ऐशी भावना दृढ भावितां । ते भावनाआंतौता अभिमान विरे ॥२॥

अभिमान हरिचरणीं लीन । तेव्हां भक्त होय निरभिमान ।

तेंचि निरहंतेचें लक्षण । हरि संपूर्ण सांगत ॥३॥;

निरहंकाराचीं लक्षणें । तो जन्मोनि मी जन्मलों न म्हणे ।

सुवर्णाचें केलें शुनें । तरी सोनें श्वान हों नेणे तदाकारें असतां ॥४॥

तेवीं जन्मादि अहंभावो । उत्तम भक्तां नाहीं पहा हो ।

कर्मक्रियेचा निर्वाहो । ’अहंकर्ता’ स्वयमेवो मानीना ॥५॥

तो कर्म करी परी । न म्हणे ’मी कर्ता’ ।

जेवीं गगनीं असोनि सविता । अग्नि उपजवी सूर्यकांता ।

तेवीं करोनि अकर्ता निजात्मदृष्टीं ॥६॥

सूर्यें सूर्यकांतीं अग्निसंग । तेणें होतु याग कां दाघ ।

तें बाधूं न शके सूर्याचें अंग । तेवीं हा चांग करुनि अकर्ता ॥७॥

अचेतन लोह चुंबकें चळे । लोहकर्में चुंबक न मैळे ।

तेवीं हा चांग करुनि सकळें । अनहंकृतिबळें अकर्ता ॥८॥

देहींचिं कर्में अदृष्टें होती । मी कर्ता म्हणतां तीं बाधती ।

भक्तां सर्व कर्मीं अनहंकृती । परमात्मप्रतीती भजनयोगें ॥९॥

एव्म देहींचीं कर्में निपजतां । पूर्णप्रतीती भक्त अकर्ता ।

कर्माकर्माची अवस्था । नेघे तो माथां अनहंकृती ॥७१०॥

जरी जाहला उत्तम वर्ण । तरी तो न म्हणे ’मी ब्राह्मण’ ।

स्फटिक कुंकुमें दिसे रक्तवर्ण । ’मी लोहीवा पूर्ण’ स्फटिक न म्हणे ॥११॥

ज्यासी नाहीं देहाभिमान । तो हातीं न धरी देहाचा वर्ण ।

तैसाचि आश्रमाभिमान । भक्त सज्ञान न धरी कदा ॥१२॥

अंगीं बाणला संन्यासु । परी तो न म्हणे मी परमहंसु ।

जेवीं नटाअंगीं राजविलासु । तो राजउल्हासु नट न मानी ॥१३॥

तेवीं आश्रमादि अवस्था । भक्त न धरीच सर्वथा ।

तैशीच जातीचीही कथा । न घे माथां भक्तोत्तम ॥१४॥

जाति उंच नीच असंख्य । परी तो न म्हणे हे माझीचि एक ।

जेवीं गंगातीरीं गांव अनेक । परी गंगा माझा एक गांव न म्हणे ॥१५॥

तेवीं जन्म-कर्म-वर्णा-श्रम-जाती । पूर्ण भक्त हातीं न धरिती ।

चहूं देहांची अहंकृती । स्वप्नींही न धरिती हरिभक्त ॥१६॥

आशंका ॥ तरी काय वर्णाश्रम-जाती ।

भक्त निःशेष सांडिती । त्यांत असोनि नाहीं अहंकृती ।

ते हे उपपत्ति बोलिलों राया ॥१७॥

तो जेव्हां पावे जन्मप्राप्ती । तेव्हां त्यासवें नाहीं वर्णाश्रम-जाती ।

जन्मअभिमानें माथां घेती । हे कुळगोत-जाति पैं माझी ॥१८॥

ऐशा नाथिल्या अहंकृती । ब्रह्मादिक गुंतले ठाती ।

वाढवितां वर्णाश्रम जाती । सज्ञान गुंतती निजाभिमानें ॥१९॥

ऐशी अहंतेची अतिदुर्धर गती । ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती ।

सोडूं नेणे गा कल्पांतीं । सज्ञान ठकिजेती निजाभिमानें ॥७२०॥

येथें भक्तांच्या भाविक स्थितीं । अभिमान तुटे भगवद्भक्तीं ।

ते निरभिमान भक्तस्थिती । राया तुजप्रती दाविली स्वयें ॥२१॥;

समूळ देहाभिमान झडे । तो देहाचि देवासी आवडे ।

ते भक्त जाण वाडेकोडें । लळेवाडे हरीचे ॥२२॥

ते जें जें मागती कौतुकें । तें देवोचि होय तितुकें ।

त्यांचेनि परम संतोखें । देव सुखावला सुखें दोंदिल होये ॥२३॥

तो जिकडे जिकडे जाये । देव निजांगें तेउता ठाये ।

भक्त जेउती वास पाहे । देव ते ते होय पदार्थ ॥२४॥

त्यासी झणीं कोणाची दृष्टी लागे । यालागीं देवो त्या पुढें मागें ।

त्यासभोंवता सर्वांगें । भक्तीचेनि पांगें भुलला चाले ॥२५॥

निरभिमानाचेनि नांवें । देव निजांगें करी आघवें ।

जेवीं कां तान्हयाचेनि जीवें । जीवें भावें निजजननी ॥२६॥

एवं राखतां निजभक्तांसी । तरी देव धाके निजमानसीं ।

जरी हा मजसीं आला ऐक्यासी । तरी हे प्रीति कोणासीं मग करावी ॥२७॥

कोणासी पाहों कृपादृष्टीं । कोणापें सांगों निजगोष्टी ।

कोणासी खेवें देवों मिठी । ऐशी आवडी मोठी प्रेमाची ॥२८॥

या काकुळतीं श्रीअनंतु । ऐक्यभावें करी निजभक्तु ।

मग देवो भक्त दोहींआंतु । देवोचि नांदतु स्वानंदें ॥२९॥

एवं आपुली आपण भक्ती । करीतसे अनन्यप्रीतीं ।

हेंचि निरुपण वेदांतीं । ’अद्वैतभक्ति’ या नांव ॥७३०॥

त्यासी चहूं भुजीं आलिंगितां । हांव न बाणेचि भगवंता ।

मग रिघोनियां आंतौता । परमार्थता आलिंगी ॥३१॥

ऐसें खेंवाचें मीस करी । तेणें भक्त आणी आपणाभीतरीं ।

मग आपण त्याआंतबाहेरी । अतिप्रीतीवरी कोंदाटे ॥३२॥

नवल आवडीचा निर्वाहो । झणीं यासी लागे काळाचा घावो ।

यालागीं निजभक्तांचा देहो । देवाधिदेवो स्वयें होये ॥३३॥

ऐसा जो पढियंता परम । तो भागवतांमाजीं उत्तमोत्तम ।

यापरी भागवतधर्म । पुरुषोत्तम वश्य करी ॥३४॥

ऐशिया उत्तम भक्ता । भेदाचि समूळ नुरे वार्ता ।

हेचि अभेदभक्तकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥३५॥