श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५४ वा

भगवत उरुविक्रमाङिघ्रशाखानखमणिचन्द्रिकया निरस्ततापे ।

हृदि कथमुपसीदतां पुनः स प्रभवति चन्द्र इवोदितेऽर्कतापः ॥५४॥

थोर हरिचरणाचा पराक्रम । पदें त्रैलोक्य आवरी त्रिविक्रम ।

ब्रह्मांड भेदोनि पदद्रुम । वाढला परमसामर्थ्यें ॥६३॥

ते पदद्रुमींचिया दशशाखा । त्याचि दशधा दशांगुलिका ।

अग्रीं अग्रफळचंद्रिका । नखमणि देखा लखलखित ॥६४॥

ते नखचंद्रिकेचे चंद्रकांत । चरणचंद्रामृतें नित्य स्त्रवत ।

भक्तचकोर ते सेवित । स्वानंदें तृप्त सर्वदा ॥६५॥

त्यांसी कामादि त्रिविधतापप्राप्ती । सर्वथा बाधूं न शके पुढती ।

जेवीं सूर्याची संतप्त दीप्ती । चंद्रबिंबाआंतौती कदा न रिघे ॥६६॥

जे हरिचरणचंद्र-चकोर । स्वप्नींही संसारताप न ये त्यांसमोर ।

ऐसा चरणमहिमा अपार । हरि मुनीश्वर हर्षें वर्णी ॥६७॥

’देहे वै स हरेः प्रियः’ । येणें श्लोकें गा विदेह्या ।

दाविली भक्तिलिंगक्रिया । जाण तूं राया सुनिश्चित ॥६८॥

’न यस्य स्वः पर इति’ । येणें त्याची धर्मस्थिती ।

राया सांगितली तुजप्रती । यथानिगुतीं यथार्थ ॥६९॥

’यादृश’ म्हणिजे कैसे असती । भगवद्भजनें स्वानंदतृप्ति ।

त्रिविध तापांची निवृत्ती । करोनि असती हरिभक्त ॥७७०॥

आतां त्यांची बोलती परी । नामें गर्जती निरंतरीं ।

तेचि ते संक्षेपाकारीं । उपसंहारीं हरि सांगे ॥७१॥

सकळ लक्षणांची सारस्थिती । प्रेमळाची परमप्रीती ।

उल्लंघूं न शके श्रीपती । तेही श्लोकार्थी हरि सांगे ॥७२॥;