श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५५ वा

विसृजति हृदयं न यस्य साक्षाद्धरिरवशाभिहितोऽप्यघौघनाशः ।

प्रणयरशनया धृताङिघ्रपद्मः स भवति भागवतप्रधान उक्तः ॥५५॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायंतसंवादे एकाकारटीकायां द्वितीयोऽध्यायः ॥२॥

अवचटें तोंडा आल्या ’हरी’ । सकळ पातकें संहारी ।

तें हरिनाम निरंतरीं । जे निजगजरीं गर्जती ॥७३॥

ऐसें ज्यांचे जिव्हेवरी । नाम नाचे निरंतरीं ।

ते धन्य धन्य संसारीं । स्वानंदें हरि गर्जतु ॥७४॥

सप्रेम सद्भावें संपूर्ण । नित्य करितां नामस्मरण ।

वृत्ति पालटती आपण । तेंही लक्षण ऐक राया ॥७५॥

नामसरिसाच हरी । रिघे हृदयामाझारीं ।

तेणें धाकें अभ्यंतरीं । हों लागे पुरी हृदयशुद्धी ॥७६॥

तेव्हां प्रपंच सांडोनि ’वासना’ । जडोनि ठाके जनार्दना ।

’अहं’ कारु सांडोनि अहंपणा । ’सोहं’ सदनामाजीं रिघे ॥७७॥

’चित्त’ विसरोनि चित्ता । जडोनि ठाके भगवंता ।

’मनाची’ मोडली मनोगतता । संकल्पविकल्पता करुं विसरे ॥७८॥

कृतनिश्चयेंसीं ’बुद्धी’ । होऊनि ठाके समाधी ।

ऐशी देखोनि हृदयशुद्धी । तेथोनि त्रिशुद्धी न रिघे हरी ॥७९॥

हरिनामप्रेमप्रीतीवरी । हृदयीं रिघाला जो हरी ।

तो निघों विसरे बाहेरी । भक्तप्रीतिकरीं कृपाळू ॥७८०॥

भक्तें प्रणयप्रीतीची दोरी । तेणें चरण धरोनि निर्धारीं ।

निजहृदयीं बांधिला हरी । तो कैशापरी निघेल ॥८१॥

भगवंत महा अतुर्बळी । अदट दैत्यांतें निर्दळी ।

तो कोंडिला हृदयकमळीं । हे गोष्टी समूळीं मिथ्या म्हणती ॥८२॥

जो शुष्क काष्ठ स्वयें कोरी । तो कोंवळ्या कमळामाझारीं ।

भ्रमर गुंतला प्रीतीवरी । केसर माझारीं कुचंबो नेदी ॥८३॥

तेवीं भक्ताचिया प्रेमप्रीतीं । हृदयीं कोंडिला श्रीपती ।

तेथ खुंटल्या सामर्थ्यशक्ती । भावार्थप्रती बळ न चले ॥८४॥

बाळ पालवीं घाली पिळा । तेणें बाप राहे थोकला ।

तरी काय तो निर्बळ जाहला । ना तो स्नेहें भुलला ढळेना ॥८५॥

तेवीं निजभक्त लळेवाड । त्याचें प्रेम अत्यंत गोड ।

निघावयाची विसरोनि चाड । हृदयीं सुरवाड हरि मानी ॥८६॥

ऐसें ज्याचें अंतःकरण । हरि न सांडी स्वयें आपण ।

तैसेचि हरीचे श्रीचरण । जो सांडीना पूर्ण प्रेमभावें ॥८७॥

हरीचे ठायीं प्रीति ज्या जैशी । हरीची प्रीति त्या तैसी ।

जे अनन्य हरीपाशीं । हरि त्यांसि अनन्य सदा ॥८८॥

ऐसे जे हरिचरणीं अनन्य । तेचि भक्तांमाजीं प्रधान ।

वैष्णवांत ते अग्रगण । राया ते जाण ’भाववतोत्तम’ ॥८९॥;

गौण करुनि चारी मुक्ती । जगीं श्रेष्ठ भगवद्भक्ती ।

त्या उत्तम भक्तांची स्थिती । संक्षेपें तुजप्रती बोलिलों राया ॥७९०॥

पूर्ण भक्तीचें निरुपण । सांगतां वेदां पडलें मौन ।

सहस्त्रमुखाची जिव्हा पूर्ण । थकोनि जाण थोंटावे ॥९१॥

ते भक्तीची एकांशता तुज म्यां सांगितली हे कथा ।

यावरी परिपूर्णता । राया स्वभावतां तूं जाणशी ॥९२॥

हरीसारिखा रसाळ वक्ता । सांगतां उत्तमभक्तकथा ।

तटस्थ पडिलें समस्तां । भक्तभावार्थता ऐकोनी ॥९३॥

तंव रावो रोमांचित जाहला । रोममूळीं स्वेद आला ।

श्रवणसुखें लांचावला । डोलों लागला स्वानंदें ॥९४॥

पूर्ण संतोषोनि मनीं । म्हणे भलें केलें मुनी ।

थोर निवालों निरुपणीं । श्रवणाची धणी तरी न पुरे ॥९५॥

ऐकोनि हरीचें वचन । राजा म्हणे हे अवघे जण ।

अपरोक्षज्ञानें ज्ञानसंपन्न । वक्ते पूर्ण अवघेही ॥९६॥

भिन्न भिन्न करोनि प्रश्न । आकर्णूं अवघ्यांचें वचन ।

ऐशिया श्रद्धा राजा पूर्ण । अनुपम प्रश्न पैं करील ॥९७॥

रायासी कथेची पूर्ण चाड । पुढां प्रश्न करील गोड ।

जे ऐकतांचि पुरे कोड । श्रोते वाड सुखावती ॥९८॥

त्या प्रश्नाचें गुह्य ज्ञान । श्रवणीं पाववीन संपूर्ण ।

वदनीं वक्ता श्रीजनार्दन । यथार्थ पूर्ण अर्थवी ॥९९॥

पांवा नाना मधुर ध्वनी गाजे । परी तो वाजवित्याचेनि वाजे ।

तेवीं एका जनार्दनीं साजे । ग्रंथार्थवोजें कवि कर्ता ॥८००॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायंतसंवादे एकाकारटीकायां द्वितीयोऽध्यायः ॥२॥

॥ ॐ तत्सत् - श्रीकृष्ण प्रसन्न ॥