श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १ ला

राजोवाच-परस्य विष्णोरीशस्य मायिनामपि मोहिनीम् ।

मायां वेदितुमिच्छामो भगवन्तो ब्रुवन्तु नः ॥१॥

तृतीयाध्यायीं निरुपण । राजा करील चारी प्रश्न ।

’माया’ आणि तिचें ’तरण ’ । ’ब्रह्म’ तें कोण, ’कर्म’ तें कैसें ॥१८॥

तेथें प्रथम मायेचा प्रश्न । रायें पुशिला आपण ।

तेचि अर्थीचें निरुपण । मायेचें लक्षण राजा बोले ॥१९॥

सुरांमाजीं श्रेष्ठ हृषीकेशी । ब्रह्मादि शिवु वंदिती ज्यासी ।

त्या श्रीविष्णूची माया कैसी । जे मायिकांसी व्यामोही ॥२०॥

कैशी मायिकां माया मोही येथें । ब्रह्मा शिवु मानिती चित्तें ।

आम्ही पूर्ण मायेचे नियंते । शेखीं माया तयांतें निजमोहें मोही ॥२१॥

ब्रह्मा मोहिला शिवाचे लग्नीं । वीर्य द्रवे पार्वती देखोनी ।

महादेवो महाज्ञानी । देखतांचि मोहिनी निजवीर्य द्रवलें ॥२२॥

जे सज्ञाना छळी लवलाह्या । जीतें श्रुति म्हणती ’अजया’ ।

ते हरीची दुर्धर माया । विवंचूनियां मज सांगा ॥२३॥

म्हणाल दुर्धर मायेची बाधकता । ते बाधूं न शके अनन्य भक्तां ।

तुवांही भजावें भगवंता । मिथ्या मायेची कथा कां पुसशी ॥२४॥

तेचि अर्थीचें निरुपण । राजा साक्षेपेंसीं आपण ।

मुनींचें ऐकावया गुह्य ज्ञान । विदग्ध प्रश्न आदरें पुसतु ॥२५॥