श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ८ वा

धातूपप्लव आसन्ने व्यक्तं द्रव्यगुणात्मकम् ।

अनादिनिधनः कालो ह्यव्यक्तायापकर्षति ॥८॥

सूर्योदयेंसीं दिवसस्थिती । लोटल्या अवश्य पावे राती ।

तेवीं झालिया उत्पत्तिस्थिती । प्रळयाची प्राप्ती अवश्य पावे ॥१५०॥

एवं पावल्या प्रळयवेळु । खवळे अनादिनिधन काळु ।

तो महाभूतेंसीं भूगोळु । नाशार्थ प्रबळु प्रताप मांडी ॥५१॥

तेथ जें जें स्थूळाकारें व्यक्त । तें तें करुं लागे अव्यक्त ।

जेवीं पेरिलें पिकोनि शेत । स्वये वाळत उष्णकाळीं ॥५२॥

तृणादि नाना बीजें क्षितीं । स्वभावें वार्षिये विरुढती ।

तेचि शारदीये नानाव्यक्ती । सफळितें होती सुपुष्ट ॥५३॥

तेचि ग्रीष्माच्या अंतीं । फळमूळ मोडोनि व्यक्ती ।

बीजें लीन होती क्षितीं । तैशी काळगती संसारा ॥५४॥

जेवीं वसंताचे ऐलीकडी । वृक्षांसी होय पानझडी ।

तेवीं ब्रह्मादिकांची परवडी । काळ झोडी निजसत्ता ॥५५॥

जेवीं कां वाळलिया शेत । कृषीवळु मळूं लागे समस्त ।

तेवीं व्यक्ताचें अव्यक्त । काळ त्वरित करुं लागे ॥५६॥

तेच अव्यक्त करिती स्थिती । राया सांगेन तुजप्रती ।

काळाची क्षोभक शक्ती । प्रळयाचे प्राप्तीपूर्वीं पावे ॥५७॥