श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १९ वा

नित्यार्तिदेन वित्तेन दुर्लभेनात्ममृत्युना ।

गृहापत्याप्तपशुभिः का प्रीतिः साधितैश्चलैः ॥१९॥

रातिदिवसु निजनिकटें । मरणेंसीं घेतां झटें ।

कवडीची प्राप्ती न भेटे । प्राणांतकष्टें द्रव्य जोडे ॥४५॥

एवं कष्टें जोडलें धन । तें महादुःखाचें जन्मस्थान ।

अर्थ अनर्थाचें अधिष्ठान । निजात्ममरण निजमूळ ॥४६॥

द्रव्य नसतां उपायें शिणवी । जाहलिया संरक्षणीं आधी लावी ।

रात्रिदिवस हृद्रोग जीवीं । अविश्वासें नांदवी धनलोभु ॥४७॥

मायबापांशीं चोरी करवी । स्त्रीपुत्रांसीं कलहो लावी ।

सुहृदांतें दूरी दुरावी । हे द्रव्याची पदवी स्वाभाविक ॥४८॥

द्रव्यापाशीं आधिव्याधी । द्रव्यापाशीं दुष्ट बुद्धी ।

द्रव्यापाशीं सलोभ क्रोधी । असत्य निरवधी द्रव्यापाशीं ॥४९॥

द्रव्यापाशीं अतिविकल्प । द्रव्यापाशीं वसे पाप ।

द्रव्यापाशीं अतिसंताप । पूर्ण दुःखरुप तें द्रव्य ॥२५०॥

हें दानें त्यागितां फळ गोमटें । लोभियां नरका ने हटेंतटें ।

द्रव्याऐसें गा वोखटें । आन न भेटे तिहीं लोकीं ॥५१॥

नळिया चणियांचे आशा । वानरें मुठीं धरणें तोचि फांसा ।

तेवीं द्रव्यदाराभिलाषा । नरदेहदशा अधःपातीं ॥५२॥

द्रव्य सहसा न मिळे पाहीं । मिळे तरी अनीति अपायीं ।

यालागीं द्रव्याच्या ठायीं । सुख नाहीं त्रिशुद्धी ॥५३॥

धन वेंचोनि फाडोवाडें । घर करिती वाडेंकोडें ।

तें अध्रुवत्वें सवेंचि पडे । थितें द्रव्य बुडे आयुष्येंसीं ॥५४॥

करुनि आयुष्याचा मातेरा । मुद्दलसिंचनें जोडिलें पुत्रा ।

त्या पुत्राच्या मरणद्वारा । दुःखदुर्धरामाजीं बुडती ॥५५॥

प्रपंचींचे सुहृद समस्त । जंव स्वार्थ तंव होती आप्त ।

स्वार्थविरोधें ते अनाप्त । होऊनि घात सुहृदां करिती ॥५६॥

करोनियां अतिहव्यासु । मेळविती नाना पशु ।

त्यांचा सवेंचि होय नाशु । तेणें दुःखें त्रासु गृहस्थांसी ॥५७॥

निजदेहोचि नश्वर येथ । त्यासि प्रपंच नव्हे गा शाश्वत ।

अवघें जगचि काळग्रस्त । इहलोकीं समस्त ठकिले विषयीं ॥५८॥

मनुष्यदेहो कर्मभूमीं प्राप्त । तो लोक म्हणती ’कर्मजित’ ।

हा जैसा नश्वर येथ । तैसाच निश्चित नश्वर स्वर्गु ॥५९॥;