श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २४ वा

शौचं तपस्तितिक्षां च मौनं स्वाध्यायमार्जवम् ।

ब्रह्मचर्यमहिंसां च समत्वं द्वन्द्वसंज्ञयोः ॥२४॥

मुख्य साधावया परमार्थ । अवश्य पाहिजे गा ’शुचिता’ ।

शुचित्वावांचोनि तत्त्वता । न लाभे हाता निजस्वार्थु ॥३८०॥

यालागीं गा नृपनाथा । शुद्ध शौचाची आइक कथा ।

आंतर मळ न क्षाळितां । न लाभे हाता बाह्यशुद्धी ॥८१॥

मन मळिण वासनामळें । तें न करितां सोंवळें ।

बाह्य पवित्रता अहंबळें । तें जाण आंधळें न्याहाळी जैसें ॥८२॥

मन मळिण वासनामळें । तें प्रक्षाळूनि सोंविळें ।

करावें गा भावबळें । गुरुवाक्यमेळें निजनिष्ठा ॥८३॥

सोनें जेवीं पुटीं पडे । मळ तुटे वाणीं चढे ।

तेवीं गुरुसेवा जडत्व मोडे । चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट ॥८४॥

आरशासी सहाणीं तोडिजे । तेणें स्वमुखा शुद्धत्व जोडिजे ।

तेवीं चित्तशुद्धी उघडिजे । सहजीं सहजें निजशुद्धी ॥८५॥

लोहें परिसु झांकिजे । तंव लोहात्वा मुकिजे ।

तेवीं अंतरशुद्धीनें कीजे । महा निर्बुजे स्थूळबुद्धि ॥८६॥

सूर्यासन्मुख सूर्यकांत । जाहलिया शुद्धत्वें होय दीप्त ।

ते प्रभा बाह्य प्रकाशत । अग्निहोत्रार्थ महायागा ॥८७॥

तेवीं गुरुवाक्यें अंतरशुद्धता । सबाह्य आली शुचिता ।

हे न करिती जे पवित्रता । ते जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥८८॥

अल्प जळ शौचाप्रती । तेणें हात करकटले ठाती ।

शेवटीं गिरबिडे बृहती । तेवीं विकल्पी होती अपवित्र ॥८९॥

भरलें काळकूट जीवीं । वरी टवटव अतिबरवी ।

तें इंद्रावण कोणीही न सेवी । अंतरस्वभावीं अतिमळिण ॥३९०॥

तीर्थी धुतला रजकराजु । तो काय होईल शुद्ध द्विजु ।

नटें घेतला राजध्वजु । तो नव्हे पूज्यु बाह्यक्रियावशें ॥९१॥

सुंदरी सुकुमार साजिरी । वोठीं कुष्ठता तिळभरी ।

जाहलिया तीतें कोणी न वरी । वरीवरी बरी दिसतांही ॥९२॥

नागवी माथां मोत्यांची जाळी । शिंबरी सुपाणीदाणा ल्याली ।

तेवीं बाह्य पवित्रता दाविली । ते ते केली निजभंडिमा ॥९३॥

दहें माखला वायसु । तो काय होईल राजहंसु ।

दहीं म्हणोनि मथितां कापुसु । तृप्ती नव्हे उपहासु जगीं प्रगटे ॥९४॥

तेवीं अंतरीं विकल्पु असतां । बाह्य जे जे पवित्रता ।

ते ते क्रिया नृपनाथा । जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥९५॥

अंतर क्षाळिलें गुरुप्रतीतीं । बाह्य क्षाळिलें शास्त्रयुक्तीं ।

ऐसें शुचित्व निजनिश्चितीं । अद्वैत स्थिती तेथें नांदे ॥९६॥

अंतरीं शुचित्व पूर्ण वसे । तें बाह्यकर्मी स्वयें प्रकाशे ।

तें शुचित्वचि अनायासें । परमार्थदशे प्रकाशी ॥९७॥

ईश्वरभावाचें निजवर्म । ज्याचे पोटीं रिघालें सप्रेम ।

त्याचें कर्मचि होय ब्रह्म । त्या देहभ्रम बाधीना ॥९८॥

या नाम ’शुचिष्मता’ । सत्य जाण गा नृपनाथा ।;

तपाचीही स्थिती आतां । ऐक तत्त्वतां सांगेन ॥९९॥

शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्ध-भोगानुरुप ।

हृदयीं वाहणें कृष्णस्वरुप । तो शुद्ध साक्षेप तपाचा ॥४००॥

जेवीं धूरसूनि दिठी । शूर रणामाजीं उठी ।

तेवीं ईश्वर धरोनि पोटीं । वर्ते तो सृष्टीं तपिया शुद्ध ॥१॥

हेंचि तपाचें निजस्वरुप । याचि नांव शुद्ध ’तप’ ।

यावरतें न चढे रुप । व्यर्थ वाग्जल्प कां करावे ॥२॥;

द्वंद्वसहिष्णुता मुमुक्षा । या नांव म्हणिजे ’तितिक्षा’ ।

तेही आणावया लक्षा । नृपाध्यक्षा अवधारीं ॥३॥

सुखदुःख उभय भोग । दोंमाजीं अखंड आपुलें अंग ।

जेवीं चित्रींची वाघीण आणि वाघ । दोहींमाजीं साङग निजत्वें भिंती ॥४॥

जेवीं दावाग्री कां उन्हाळे । आकाश जैसें न पोळे ।

असोनि त्यांचेनि मेळें । त्यांवेगळें अलिप्त ॥५॥

शीतळ जळ कां हींव पडे । पृथ्वी निजक्षमा न कांकुडे ।

तेवीं निजस्वरुपसुरवाडें । द्वंद्वा नातुडे निजसाधु ॥६॥

शरीर जरी हिंवें कांपे । तेणें देह कांपे साधु न कांपे ।

शरीर अतिउष्णें तापे । परी साधु न तापे देहतापामाजीं ॥७॥

सुख देखोनि दिठी । ज्या गोडिया घाली मिठी ।

दुःखही त्याचि आवडी घोंटी । ’द्वंद्वसहिष्णुता’ मोथी या नांव राया ॥८॥

गोफणगुंडा सन्मुख । लागतां अवश्य उठे दुःख ।

तोच सुवर्णाचा जाहलिया देख । दुःख लोपोनि सुख अनिवार वाढे ॥९॥

सुखदुःखप्रकाशक । निजवस्तु असे एक ।

त्या एकात्मता देख । द्वंद्वें साधक सुखें साहती ॥४१०॥

तेवीं द्वंद्वाचें जाणपण । जाणवीत असे जें ज्ञान ।

तें जाणितल्या आपण । द्वंद्वें संपूर्ण निर्द्वंद्वें होती ॥११॥

रसउसीं कठिणपण । त्यामाजीं गोडी अखंड पूर्ण ।

तेवीं द्वंद्वामाजीं वस्तु चिद्धन । अखंडदंडायमान स्वयें देखे ॥१२॥

ऐशी हे अखंडता । जंव न ये साधकाचे हाता ।

तंव द्वंद्वाची सहनता । नव्हे नृपनाथ निश्चयेंसीं ॥१३॥

या नांव ’द्वंद्वसहन’ । निजनिश्चयें जाण पूर्ण ।;

आतां मौनाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥१४॥

वाग्वादु करावा जनीं । तैं दृढ व्हावें देहाभिमानी ।

सांडविला तो सद्गुरुंनीं । निःशेष धोउनी शब्देंसीं ॥१५॥

सद्गुरुवचन पडतां कानीं । स्तुति निंदा गिळोनि दोन्ही ।

बोल बोलणें निरसुनी । हृदयभुवनीं परिपक्वलें ॥१६॥

तेव्हां ज्याचे बोलावे अवगुण । तेथें दिसे हृदयस्थ आपण ।

यालागीं बोलतां पैशुन्य । पडे मौन गुरुवाक्यें ॥१७॥

गुण देखोनियां स्तवन । करितां पडे दृढ मौन ।

मीचि स्तव्य स्तविता स्तवन । मज म्यां वानितां पूर्ण मूर्खत्व माझें ॥१८॥

निजात्मा निःशेष नसे । ऐसा रिता ठाव न दिसे ।

तेथें जें जें कांहीं दिसे । तें आत्मप्रकाशें सदोदित ॥१९॥

ऐशी सद्गुरुंनीं दाखविली युक्ती । ती विश्वासें स्थिरावली चित्तीं ।

यालागीं निंदा आणि स्तुती । वाचेप्रती बोलेना ॥४२०॥

संवाद करावा निजस्वार्थी । तंव सद्गुरुच्या वचनोक्तीं ।

खुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती । त्यावरी स्थिती चढेना ॥२१॥

एवं स्तुति निंदा वाग्वाद । करितां खुंटला संवाद ।

महामौनें अतिशुद्ध । परमानंद सधकां ॥२२॥;

ऐसें साधावया दृढ मौन । सद्गुरु शिकवी वेदाध्ययन ।

उपनिषदर्थ विवंचून । पढवी संपूर्ण अर्थावबोधें ॥२३॥

अथवा अतिशयें दृढ मौन । श्रीरामकृष्णनामस्मरण ।

अखंड नामें गर्जतां पूर्ण । वेदार्थ जाण तिष्ठती पुढें ॥२४॥

नित्य रामनाम गर्जे वाणी । त्या तीर्थें येती लोटांगणीं ।

सुरवर लागती चरणीं । यम पायवणी स्वयें वंदी ॥२५॥

रामनामाचें जें स्मरण । या नांव गा ’महामौ’ ।

वेदें नाम स्तविलें पूर्ण । शुद्ध अध्ययन हरिनाम ॥२६॥

वेदु अथवा नामस्मरण । या नांव गा ’स्वाध्यायो’ जाण ।;

आतां आर्जवाचें लक्षण । ऐकें संपूर्ण महाराजा ॥२७॥

आतां आर्जव तें ऐसें । सर्वां जीवां जीवन जैसें ।

कां तंतु जैसा निजविलासें । अविरोधें असे पटामाजीं ॥२८॥

साखरेचें इंद्रावण । केलिया न वचे गोडपण ।

तैसें विषमांही जीवां जाण । आर्जवें पूर्ण रंजवी स्वभावें ॥२९॥

वक्र चंद्राची चंद्रिका । परी अमृत वक्र नव्हे देखा ।

तैसें देखोनि विषमां लोकां । मनोवृत्ति देखा पालटेना ॥४३०॥

निपराद न देखे कोणासी । जिवलग सोयरा सर्वांशीं ।

वोळखी जीवमात्रांशीं । जैशी तैशी जुनाट ॥३१॥

न्यहा संतप्ता आधार देत । वरूनि घणघाय घेत ।

सांडस घायातळीं सूत । तें आघवेंचि आप्त लोहत्वें लोहा ॥३२॥

यापरी जयासी आप्त सर्व । ऐसा जो कां निजस्वभाव ।

तया नांव गा आर्जव । अति‍अपूर्व गुरुदीक्षा ॥३३॥;

असुर सुर नर ऋषीश्वर । मदनें केले निजकिंकर ।

कंदर्पाचा मार थोर । अतिदुर्धर अनंगु ॥३४॥

अंतरीं कामाचें दृढ ठाणें । वरीवरी दांत चावूनि साहणें ।

त्याचें मनचि निष्काम न म्हणे । चाळवणें लौकिकु ॥३५॥

तैसी नव्हे सद्गुरुची युक्ती । कामाची पालटे कामनावृत्ती ।

अभंग ब्रह्मचर्यस्थिती । शिष्यांप्रती उपदेशी ॥३६॥

कंदर्पराणिवे स्त्रीपुरुष । तेथें गुरुदीक्षा अलोलिक ।

मिथ्या स्त्रीपुरुष मायिक । विषयसुख भ्रम मात्र ॥३७॥

’आनंदाचें उपस्थ एकायतन’ । हें काय मिथ्या वचन ।

ते अर्थीं पूण वेदज्ञ । वेदविवंचन दाविती ऐसें ॥३८॥

पुसतां साखरेची गोडी कैशी । तो स्वादु न ये सांगावयासी ।

तेथें चाखों देत्ती अणुमात्रेंशीं । तेचि गोडपण राशीं जाणती जाण ॥३९॥

तेवीं परमानंदसुखप्रप्ती । उपस्थद्वारा नर चाखिती ।

आनंद एकायतनस्थिती । बोलिली उपस्थीं या हेतु वेदें ॥४४०॥

त्या उपस्थसुखाची नित्यस्थिती संभोगेंवीण जे वाढविती ।

तेथ मिथ्या स्त्रीपुरुषव्यक्ती । सहजें होती सज्ञान ॥४१॥

चाखिली गोडी तेचि साखर । परमानंद मैथुनमात्र ।

मानूनियां मैथुनपर । जाहले पामर विषयांध ॥४२॥

उपस्थीं परमानंदगोडी । यालागीं स्त्रीकामाची अतिवोढी ।

सदा सोसिजे महामूढीं । ताडातोडी जीविताच्या ॥४३॥

साखरेचें केलें नारियेळ । तेथ त्वचा गर्भ साखरचि केवळ ।

तेवीं विषयद्वारा सुखकल्लोळ । उठती सकळ परमानंदें ॥४४॥

नाना पक्वान्नपरवडी । गुळाच्या गोडीनें ते चवी गाढी ।

तेवीं विषयाची जे जे आवडी । ते ते गोडी निजानंदें ॥४५॥

हे नेणोनि मूळींची निजगोडी । सोशिती विषयांच्या अतिवोढी ।

बाप सद्गुरुकृपा गाढी । विषयांची आवडी एकत्वा आणी ॥४६॥

यालागीं विषयांची आस्था । न चढे सच्छिष्याचे माथां ।

स्त्रीभोगाची आसक्तता । मिथ्या तत्त्वतां गुरुवाक्यनिष्ठा ॥४७॥

हा आत्मा हे आत्मी पाहीं । ऐसें मिथुन मुळीं नाहीं ।

तें निजमूळ पाडितां ठायीं । ब्रह्मचर्य पाहीं अभंग ॥४९॥

या नांव गा निज नैष्ठिक्य । ’ब्रह्मचर्य’ अतिसुटंक ।

सद्गुरुंनीं बोधिलें निष्टंक । अलोलिक अभंग ॥४९॥;

आतां अहिंसेची स्थिती । ऐकें राया चक्रवर्ती ।

भंव‍ई उचलणें नाहीं भूतीं । स्वप्न-सुषुप्ती-जागतां ॥४५०॥

पावो आदळतां देख । झणीं पृथ्वी पावेल दुःख ।

या काकुलती आवश्यक । पा‍उलें अलोलिक हळुवार ठेवी ॥५१॥

आकाश दचकेल देख । यलागीं नेदी सैरा हांक ।

वाचा परिपक्व पीयूख । वचनें परम सुख सर्वांसी देतु ॥५२॥

त्याचा शब्दु जैं गगनीं भरे । तेणें शब्दानंदचमत्कारें ।

गगनचि निजसुखें भरे । येणें सुखोद्गारें वचनोक्ती ॥५३॥

जळामाजीं घालितां उडी । झणीं उदक दडपे बुडीं ।

तरंगन्यायें देणें बुडी । जीवनाची दुथडी न हेलावतां ॥५४॥

त्यासी जळीं होतां निमग्न । जळाचा तापु शमे संपूर्ण ।

यापरी करी स्नान । जीवना जीवन निववितु ॥५५॥

झणीं दुःख पावेल वारा । म्हणौनि श्वासु न घाली सैरा ।

नेमूनि प्राणसंचारा । निजशरीरा वागवी ॥५६॥

निजदेहा करावया घातु । सर्वथा जेवीं नुचले जातु ।

तेवीं भूतांवरी निघातु । ज्याच्या पोटांतु उपजेना ॥५७॥

अत्यंत न्याहारें पाहतां । वचकु पडेल प्राण्यांच्या चित्ता ।

यालागीं बाह्यदृष्टीं क्रूरता । न पाहे भूतां भूतभावें ॥५८॥

रोम रगडतील संपूर्ण । यालागीं न करी अंगमर्दन ।

एवं स्वदेहाचें देहपण । भूतहिंसाभेण अहंत्वा नाणी ॥५९॥

भूतां देतां दुःखलेशु । भूतीं दुखवेल भूतेशु ।

ऐसा ज्याचा दृढ विश्वासु । तेथ रहिवासु अहिंसेचा ॥४६०॥

कायिक-वाचिक-मानसिक । भूतां उपजे त्रिविध दुःख ।

तें जेथें निमालें निःशेख । अहिंसा देख ते ठायीं ॥६१॥

या नांव गा शुद्ध ’अहिंसा’ । सत्य जाण नृपवरेशा ।;

आतां द्वंद्वसाम्याची दशा । आ‍इक क्षितीशा सांगेन ॥६२॥;

सुख दुःख अदृष्टाधीन । तें अदृष्ट देहाचे माथां पूर्ण ।

ऐसें जाणोनि आपण । निर्द्वंद्व संपूर्ण सद्‍गुरुवाक्यें ॥६३॥

अदृष्टें देह सुखदुःख भोगी । मूर्ख तेथ रागी विरागी ।

शिष्यु लागों नेदी निजांगीं । गुरुवाक्यरंगीं रंगला । ६४॥

देहींचेनि सुखें सुखावतां । सवेंचि दुःख चढे माथां ।

हें गुरूनें जाणोनि तत्त्वतां । देह‍अहंता सांडविली ॥६५॥

निरभिमान्याच्या अंगीं । दुःख नुरेचि दुःखनियोगीं ।

सुख नुरेचि सुखसंभोगीं । तो उभयभागीं अलिप्त ॥६६॥

छाया उष्णामाजीं तापली । ते छाया छायेंचि निवाली ।

तेवीं सुखदुःखें मिथ्या जाहलीं । स्थिति सुखावली यथानुलाभें ॥६॥

अदृष्टें देहीं वर्ततां देख । बाधूं न शके सुखासुख ।

हें गुरुगम्य अलोलिक । शिष्य विश्वासिक पावती ॥६८॥

विश्वसेंवीण सर्वथा । गुरुगम्य न ये हाता ।

गुरुगम्येंवीण तत्त्वतां । द्वंद्वसमता कदा न घडे ॥६९॥

देहीं दृढता जंव मीपण । तंव तंव द्वंद्वबाधा दारुण ।

जे गुरुवाक्यें निरभिमान । त्यांसी द्वंद्वें जाण अतिमिथ्या ॥४७०॥

स्वप्नींचें दरिद्र-समर्थता । जेवीं दोनी मिथ्या जागृता ।

तेवीं द्वंद्वबाधेची वार्ता । न बाधे गुरुभक्तां अपरोक्षबोधें ॥७१॥

लेंकुरांच्या खेळापाशीं । पारणें तैशी एकादशी ।

द्वंद्वाची दशा तैशी । गुरुवाक्यासरिसी समूळ उडे ॥७२॥

जेवीं चंदनाचिया द्रुतीं । आरीबोरी चंदन होती ।

तेवीं गुरुवाक्यप्रतीती । सकळ द्वंद्वें येती निजसाम्या ॥७३॥

चंदनासभोंवतीं झाडें । तींही कोरडीं लांकडें ।

देवद्विजांचे मस्तकीं चढे । भाग्य एवढें सत्संगीं ॥७४॥

सद्गुरु तोचि सत्संगती । तत्संगें शिष्य पालटती ।

स्वयें ब्रह्मरूप होती । तेव्हां द्वंदें येतीं निर्द्वंद्वा ॥७५॥

एवं गुरुवाक्यीं विश्वासतां । द्वंद्वसाम्य चढे हाता ।

तें गुरुवाक्यही तत्त्वतां । ऐक आतां सांगेन ॥७६॥