श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३० वा

परस्परानुकथनं पावनं भगवद्यशः ।

मिथो रतिर्मिथस्तुष्टिर्निवृत्तिर्मिथ आत्मनः ॥३०॥

तेथ करितां कथानुवादु । परस्परें निजात्मबोधु ।

करितां गुह्यज्ञानसंवादु । परमानंदु वोसंडे ॥५८३॥

एवं हरिकथेच्या आवडीं । परस्परें श्रद्धा गाढी ।

सुखसंवादपरवडी । निजसुखगोडी चाखिती ॥५८४॥

चाखतां निजसुखगोडी । हारपती दुःखकोडी ।

उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी । स्वानंदजोडी जोडावी ॥५८५॥

भावें करितां अभेदभजन । भक्त पावती स्वानंद पूर्ण ।

त्या स्वानंदाचें निजचिन्ह । ऐक सांगेन नृपनाथा ॥५८६॥