श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३१ व ३२ वा

स्मरन्तः स्मारयन्तश्च मिथोऽघौघहरं हरिम् ।

भक्त्या सञ्जातया भक्त्या बिभ्रत्युत्पुलकां तनुम् ॥३१॥

क्वचिद्रुदन्त्यच्युतचिन्तया क्वचिद्हसन्ति नन्दन्ति वदन्त्यलौकिकाः ।

नृत्यन्ति गायन्त्यनुशीलयन्त्यजं, भवन्ति तूष्णीं परमेत्य निर्वृताः ॥३२॥

हरिकथेची महिमा कैसी । आदरें पुसत्या-सांगत्यासी ।

होती पुण्याचिया राशी । पाप वोखदासी मिळेना ॥५८७॥

ज्याचिया नामस्मरणकरीं । सकळ पातकातें हरि हरी ।

तो स्वयें प्रगटला अंतरीं । पातकां उरी उरे कैंची ॥५८८॥

साधनरूपभक्तीच्या युक्तीं । पूर्ण सप्रेम उपजे भक्ती ।

ते भक्तीची निजस्थिती । ऐक चक्रवर्ती सज्ञाना ॥५८९॥

सद्भावें निजभजनकरीं । हृदयीं प्रगटतां श्रीहरी ।

तंव देहींचीं चिन्हें बाहेरी । क्षणामाझारीं पालटती ॥५९०॥

परस्परें निजसंवादु । करितां जाहला स्वरूपावबोधु ।

नेत्रीं जळ अंगीं स्वेदु । प्राणस्पंदु पांगुळे ॥५९१॥

चित्तचैतन्यां होतां भेटी । हर्षें बाष्प दाटे कंठीं ।

पुलकांकित रोमांच उठी । उन्मीलित दृष्टी पुंजाळे ॥५९२॥

करितां अच्युतचिंतन । सप्रेम गहिंवरे मन ।

अट्टहासें करी रुदन । अनिवार स्फुंदन ऊर्ध्वश्वासें ॥५९३॥

त्या रुदनासवेंचि हर्ष प्रगटे । त्या हर्षाचेनि नेटेंपाटें ।

हांसों लागे कडकडाटें । सुखोद्भटें गदगदौनी ॥५९४॥

मीपणाचेनि अनुरोधें । गिळिलों होतों मोहमदें ।

तो सुटलों गुरुकृपावबोधें । तेणें परमानंदें डुल्लत ॥५९५॥

मी-माझेनि भवभानें । मज मी चुकलों मीपणें ।

मज मी भेटलों सद्गुरुवचनें । आनंदें तेणें उल्हासें ॥५९६॥

कैसें सद्गुरुवचन अलोलिक । म्यांचि माझें भोगिजे निजसुख ।

येणें आश्चर्यें देख । स्वानंदोन्मुख उल्हासे ॥५९७॥

संसारबागुलाचें । भय लागलें नेणों कैंचें ।

तें गुरुवाक्यें दवडिलें साचें । म्हणोनि नाचे निर्लज्ज ॥५९८॥

जेवीं मा‍उली देखोनि डोळां । बालक नाचे नानाकळा ।

तेवीं गुरुवाक्याचा सोहळा । देखोनि स्वलीळा निजभक्त नाचे ॥५९९॥

तेणें निजनृत्यविनोदें । फावलेनि निजबोधें ।

नानापरीचीं भगवत्पदें । सुखानुवादें स्वयें गातु ॥६००॥

तेणें कीर्तनकीर्तिगजरें । त्रैलोक्य सुखें सुभरे ।

परमानंदुही हुंबरे । सुखोद्गारें तुष्टोनी ॥६०१॥

तेंही सांडोनियां गाणें । गर्जों लागे अतिसत्राणें ।

दुजें नाहीं नाहीं म्हणे । गाणें ऐकणें म्यां माझें ॥६०२॥

मीचि गाता मीचि श्रोता । माझें गाणें मीचि तत्त्वतां ।

जगीं मीचि एकुलता । द्वैताची कथा असोनि नाहीं ॥६०३॥

सद्भावें भगवत्परिचर्या । करितां पारुषे कर्मक्रिया ।

अहं-सोऽहं निरसोनियां । वृत्तिही लया जाय तेथें ॥६०४॥

एवं सप्रेम भक्तिसंभ्रमु । तेणें निरसे साधनश्रमु ।

फिटे निःशेष भवभ्रमु । वाचांसी उपरमु इंद्रियां होय ॥६०५॥

जेथें एक ना दुसरें । सन्मुख ना पाठिमोरें ।

जेथ सुखही निजसुखामाजीं विरे । तें स्वरूप निर्धारें निजशिष्य होती ॥६०६॥

जेवीं बाळाचे लळे पाळणें । हे व्यालीचि वेदना जाणे ।

कां शिष्यांसी पूर्ण बोध करणें । तेथींल कळवळणें सद्गुरु जाणे ॥६०७॥

बाळका लेवविल्या लेणें । जेवीं माऊली निवों जाणे ।

कां शिष्यसुखें सुखावणें । हें सद्गुरु जाणे परिपूर्णबोधें ॥६०८॥

इंद्रियें नेणती ज्याचें घर । जें मना वचना अगोचर ।

बुद्धीसि न कळे ज्याची मेर । ऐसी निर्विकार निजवस्तु ॥६०९॥

दृष्टीं दाविजे साक्षात । हातीं दे‍इजे पदार्थ ।

तैसा नव्हे गा परमार्थ । तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्यां ॥६१०॥

शिष्यासी करावया प्रबोध । बोधिता सद्गुरु अगाध ।

यालागीं शिष्यसुखें स्वानंद । भोगी परमानंद गुरुरावो ॥६११॥

शिष्यासी आकळे परब्रह्म । तंव तंव निरसे त्याचा भ्रम ।

तेणें सद्गुरुसी परम । सुखसंभ्रम उल्हासे ॥६१२॥

सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी ।

शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था ॥६१३॥

ऐसी शिष्यकृपेची कळकळ । ज्या सद्गुरुमाजीं प्रबळ ।

तेणें भागवतधर्म हे सकळ । शिकावे अविकळ अनन्यश्रद्धा ॥६१४॥