श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३५ वा

पिप्पलायन उवाच-स्थित्युद्भवप्रलयहेतुरहेतुरस्य, यत्स्वप्नजागरसुषुप्तिषु सद्बहिश्च ।

देहेन्द्रियासुहृदयानि चरन्ति येन, सञ्जीवितानि तदवेहि परं नरेन्द्र ॥३५॥

अगा ज्याचेनि उपजे उत्पत्ति । ज्याचेनि अंगें स्थितीसी स्थिति ।

ज्याचेनि प्रळया प्रळयशक्ति । ऐसा जो त्रिजगतीं मुख्य हेतु ॥६३०॥

यापरी जो जगाचा हेतु । स्वयें स्वसत्ता हेतुरहितु ।

सच्चिदानंदें सदोदितु । तो जाण निश्चितु नारायणु ॥६३१॥

जेवीं सायंप्रातर्मध्यान्ह । तिहीं काळीं अलिप्त गगन ।

तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयीं जाण । अलिप्त नारायण परमात्मा ॥६३२॥

उत्पत्तिस्थितिप्रळयान्त । म्हणसी कोण देखे येथ ।

तेचि अर्थींचा दृष्टांत । स्फुरदर्थ अवधारीं ॥६३३॥

जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । तिन्ही व्यापूनि समधीही परती ।

ज्याची साक्षित्वें स्फुरे स्फूर्ति । तो जाण निश्चितीं नारायण ॥६३४॥

जागृतीचें जाणपण । स्वप्नाचें मिथ्या भान ।

सुषुप्तीचा साक्षी पूर्ण । तो नारायाण निश्चित ॥६३५॥

एवं परमात्मा परंज्योति । आत्मा हृदयस्थ त्रिजगतीं ।

त्यातें ’नारायण’ म्हणती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥६३६॥

ऐसी सांगतां ब्रह्मस्फूर्ति । अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ति ।

सहजें ब्रह्म आतुडे हातीं । ऐक ते उपपत्ति सांगेन ॥६३७॥

तरी परमात्मा ब्रह्म पूर्ण । तुझे हृदयीं नांदे आपण ।

ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रियें जाण वर्तती ॥६३८॥

नयनें तेणें तेजें देखणें । रसना तेणें स्वादें चाखो जाणें ।

श्रवण तेणें अवधानें । शब्दज्ञानें प्रबोधती ॥६३९॥

तेणें अहंकारा अहंभाव । तेणेंचि मनासी मंतव्य ।

तेणेंचि चित्तसी चेतव्य । बुद्धीसि बोद्धव्य तेणें ब्रह्मावबोधें ॥६४०॥

तेणें जड देह सचेतन । तेणेंचि कळे मृदु कठीण ।

तेणेंचि चरणाच्या ठायीं गमन । करी कर ग्रहण त्याचिये सत्ता ॥६४१॥

त्याचेनि प्राण परिचरती । त्याचेनि निमिषोन्मेषस्फूर्ति ।

त्याच्या आनंदलेशस्थितीं । आनंद उपस्थीं भोगिती प्राणी ॥६४२॥

एवं चाळकु तो त्रिजगतीं । तो स्वानंदें नांदे हृदयस्थितीं ।

त्यातें ’नारायण’ म्हणती । तोचि निश्चितीं परमात्मा ॥६४३॥

ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रियें विचरतीं संपूर्ण ।

तो तूं म्हणसी त्यां‍आधिन । हें कल्पांतीं जाण कदा न घडे ॥६४४॥

तेथ जाणपणें जाणों जासी । तैं जाणावें तेंचि नेणसी ।

तेथ ज्ञातेपणें ज्ञानासी । स्वरूपापाशीं रिगू नाहीं ॥६४५॥

जाणीव आणि नेणीव । हे सोडूनि सर्व भाव ।

जैं उपजे सद्भाव । तैं ब्रह्म स्वयमेव पाविजे ॥६४६॥