श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३८ वा

नात्मा जजान न मरिष्यति नैधतेऽसौ, न क्षीयते सवनविद्व्यभिचारिणां हि ।

सर्वत्र शश्वदनपाय्युपलब्धिमात्रं, प्राणो यथेन्द्रियबलेन विकल्पितं सत् ॥३८॥

ब्रह्मासी नाहीं माता पिता । यालागीं न घडे जन्मकथा ।

आत्मा एकदेशी होता । तरी जन्मा येता जनजीजठरा ॥७०९॥

आत्म्यावेगळा कांहीं । तिळभरी ठावो रिता नाहीं ।

यापरी पूर्णत्वें पाहीं । ’जन्म’ ते ठायीं स्पर्शेना ॥७१०॥

जन्मापूर्वीं बाळाचें नास्तिक्य । जन्मापाठीं मानिती आस्तिक्य ।

या अस्तिनास्तीची भाख । आत्म्यासी देख असेना ॥७११॥

आतां आहे पूर्वीं नाहीं । ऐसें ’आस्तिक्य’ आत्म्याचे ठायीं ।

कदाकाळीं न रिघे कांहीं । तो नित्य पाहीं निरंतर ॥७१२॥

देहीं जन्मल्या बाळकासी । वाढी दिसे दिवसदिवसीं ।

तो बाळजन्म नाहीं आत्म्यासी । यालागीं ’वृद्धि’ त्यासी घडेना ॥७१३॥

ज्यासी वृद्धि नाहीं तत्त्वतां । त्यासी न ये ’विपरिणमता’।

बाल्य तारुण्य वृद्धावस्था । आत्म्यासी सर्वथा असेना ॥७१४॥

जो मी बाळत्वें होतों धाकुटा । तोचि मी तारुण्यें जाहलों मोठा ।

तो मी वृद्ध जाहलों कटकटा । ऐसा त्रिकाळद्रष्टा परमात्मा ॥७१५॥

द्रष्टा साक्षी जो अवस्थातीत । तो कदा नव्हे अवस्थाभूत ।

देहीं असोनि अवस्थारहित । जाण तो निश्चित परमात्मा ॥७१६॥

निरवस्थ आत्मा अविकारी पूर्ण । त्यासी कदा न ये ’क्षीणपण’ ।

ज्यासी जन्मचि नाहीं जाण । त्यासी ’मरण’ असेना ॥७१७॥

जो अविकारी निरवस्थ पूर्ण । ज्यासी नाहीं जन्ममरण ।

ऐसा तूं आत्मा म्हणशील कोण । तरी जाण सर्वज्ञ ज्ञानस्वरूप ॥७१८॥

म्हणसी ज्ञानही क्षणिक असे । घटज्ञानें पटज्ञान निरसे ।

तेथ इंद्रियार्थवृत्तिचि नासे । ज्ञान जैसें तैसें अविनाशी ॥७१९॥

तेचि अर्थींचा पूर्ण दृष्टांत । जेवीं प्राण देहातें वाढवीत ।

तों देहोचि होय अवस्थाभूत । प्राण निरवस्थ जैसा तैसा ॥७२०॥

प्राणु देहातें चाळितां । त्यासी न बाधी देहावस्था ।

आत्मा प्राणातें चेतविता । त्यासी देहावस्था असेना ॥७२१॥

येणेंचि प्राणदृष्टांतें साधूनि घ्यावें परब्रह्मातें ।

देहेंद्रियावेगळें आत्म्यातें । पुढील श्लोकार्थें प्रबोधी ॥७२२॥