श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४५ वा

नाचरेद्यस्तु वेदोक्तं स्वयमज्ञोऽजितेन्द्रियः ।

विकर्मणा ह्यधर्मेण मृत्योर्मृत्युमुपैति सः ॥४५॥

आम्ही जितेंद्रिय म्हणवीत । म्हणोनि नाचरे जो वेदोक्त ।

त्यासी नातुडे गा परमार्थ । अति‍अनर्थ अंगीं वाजे ॥७८०॥

जरी शास्त्रज्ञ ज्ञाता झाला । आणि वेदोक्ता विमुख ठेला ।

तरी तो जाणपणेंचि नागवला । जाण बुडाला दुःखार्णवीं ॥७८१॥

नाचरे जो वेदोक्त कर्म । त्यक्तकर्में मानी निष्कर्म ।

त्यासी थोर पडला भ्रम । नाडला परम अभिमानें ॥७८२॥

जरी विषयो निग्रहिला । आणि वेदोक्ता जो दुरावला ।

तो निजघाता प्रवर्तला । स्वयें बुडाला नरकार्णवीं ॥७८३॥

वेद निजमूळ परमार्था । तें वेदोक्त नाचरतां ।

जें जें करणें नृपनाथा । तें तें तत्त्वतां अधःपाती ॥७८४॥

डोळे देखणें तत्त्वतां । ते काढोनि पाहों जातां ।

न देखे आपुली डोळसता । मा इतर पदार्था कोण देखे ॥७८५॥

तैसा नाचरोनि वेदार्थु । जो जो मानिला परमार्थु ।

तेणें आंवतूनियां अनर्थु । जाण निश्चितु आणिला घरा ॥७८६॥

तेणें आचार अनर्थपाटें । वाहावले जन्ममरणवाटे ।

तेथ नानायोनिगर्भसंकटें । सोसितां न सुटे कल्पांतीं ॥७८७॥

तेथें जन्मजन्मों जन्म न टके । मरमरों मरण न चुके ।

जैं वेदविहित चुके । तैं अतिदुःखें दुःखभोगु ॥७८८॥

’विकर्मणा ह्यधर्मेण’ । हें मूळींचें पदनिरूपण ।

तेणें विकर्मामाजीं अधर्म पूर्ण । परी अकर्म तें जाण अधर्म नव्हे ॥७८९॥

ज्यासी लावितां न लागे कर्म । या नांव मुख्य निष्कर्म ।

निष्कर्मलक्षण हाचि धर्म । येणेंचि परम मुक्त साधु ॥७९०॥

ज्यासी शुद्ध आकळे अकर्म । तो तत्काळ होय निष्कर्म ।

अकर्माचें कळल्या वर्म । मुक्तता परम पायां लागे ॥७९१॥