श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४७ वा

य आशु हृदयग्रन्थिं निर्जिहीर्षुः परात्मानः ।

विधिनोपचरेद्देवं तन्त्रोक्तेन च केशवम् ॥४७॥

जेणें वासनेचें जाळ तुटे । अहंकारची गांठी सुटे ।

जीवीं परमात्मा स्वयें प्रगटे । तें तांत्रिक गोमटें ऐक रया ॥८०३॥

जया तांत्रिक महापूजा । संतोष होय गरुडध्वजा ।

तें तांत्रिक विधान वोजा । महाराजा अवधारीं ॥८०४॥

वैदिक मंत्र तांत्रिक तंत्र । हे मिश्रपूजा अतिपवित्र ।

शीघ्र निष्काम करी नर । तो पूजाप्रकार अति‍उत्तम ॥८०५॥

वैदिक अथवा तांत्रिक । गुरुमार्गें सिद्धिदायक ।

यालागीं गा आवश्यक । सद्गुरुसी देख शरण जावें ॥८०६॥