श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५१ वा

पाद्यादीनुपकल्प्याऽथ सन्निधाप्य समाहितः ।

हृदादिभिः कृतन्यासो मूलमन्त्रेण चार्चयेत् ॥५१॥

सकळ पूजासंभार । निकट ठेवूनि उपचार ।

मग मूर्तीसी न्यासप्रकार । उक्तशास्त्र करावा ॥८२६॥

जैसेचि न्यास आपणास । तैसेचि करावे मूर्तीस ।

हा आगमोक्त गुरुसौरस । मूळमंत्रें न्यास मूर्तीसी ॥८२७॥

आगमोक्त करितां न्यास । अंगप्रत्यंगीं विन्यास ।

तेणें कर्ता होय हृषीकेश । हा अर्थसौरस दृढ करावा ॥८२८॥

दृढ करोनि अनुसंधान । मूळमंत्रें मूर्तिपूजन ।

हृदयीं आणि प्रतिमेसी जाण । पूजाविधान दोहीं ठायीं ॥८२९॥