श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५५ वा

एवमग्न्यर्कतोयादावतिथौ हृदये च यः ।

यजतीश्वरमात्मानमचिरान्मुच्यते हि सः ॥५५॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे तृतीयोऽध्यायः ॥३॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

हे पूजा नव्हे एकदेशी । बहुत स्थानें ये पूजेसी ।

त्यांत शीघ्रतर जें प्राप्तीसी । तें मी तुजपासीं सांगेन राया ॥८४७॥

येणेंचि विधानें यथाकाळीं । साङग पूजा कीजे ’जळीं’।

अथवा ’सूर्यमंडळीं’। पूजा सोज्ज्वळी हरिध्यानें कीजे ॥८४८॥

’अग्नीच्या’ ठायीं होय दीप्ति । पूजा कीजे कमळापति ।

अवघ्यापरीस शीघ्रप्राप्ति । पूजावा ’अतिथि’ भगवद्भावें ॥८४९॥

आलिया वैश्वदेवाचे अंतीं । तो भलता हो भलते याती ।

त्यासी जे भगवद्भावें पूजिती । त्यांचे घरा पूर्ण प्राप्ति वोरसोनि ये ॥८५०॥

पूर्वीं अनोळखु निश्चितीं । आलिया वैश्वदेवाचे अंतीं ।

त्यातें ब्रह्मभावें जे पूजिती । त्यांसी भुक्तिमुक्ती आंदणी ॥८५१॥

त्या वैश्वदेवाचे अंतीं जाण । निजभाग्यें आलिया शुद्ध ब्राह्मण ।

तया श्रद्धेनें पूजितां आपण । ते घरीं नारायण स्वानंदें वसे ॥८५२॥

राया वैश्वदेवाचे अंतीं । अतिथीसवें ये भुक्तिमुक्ति ।

विमुख जाहल्या त्या लाभा नाडती । पूजकां सुखप्राप्ति परमानंदें ॥८५३॥

अतिथीच्या ठायीं मूर्तिध्यान। सर्वथा करणें न लगे जाण ।

तो स्वरूपें स्वयें नारायण । पूजितां संपूर्ण सर्वार्थसिद्धि ॥८५४॥

एवं अतिथीसी जें अर्पे । तें भगवंतमुखीं समर्पे ।

यालागीं अतिसाक्षेपें । अतिथि ब्रह्मरूपें पूजिजे सदा ॥८५५॥

जें जें बोलिलें पूजास्थान । तेथें निजश्रद्धाचि प्रमाण ।

श्रद्धेवेगळें राया जाण । प्राप्ति संपूर्ण कदा न लभे ॥८५६॥

निजश्रद्धेचें ’हृदय’ स्थान । ते हृदयीं विध्युक्त पूजन ।

करितां श्रद्धेनें आपण । प्राप्ति संपूर्ण उद्बोधे स्वयें ॥८५७॥

येर्‍हवीं तरी आपुल्या देहीं । चाळक ईश्वरु आहे हृदयीं ।

श्रद्धेनें भजतां त्याचे ठायीं । निजप्राप्ति पाहीं सहजें लाभे ॥८५८॥

जें जें आपण सेविजे । तें तें भगवन्मुखीं भाविजे ।

येणें निजभजनें पाविजे । जाण सहजें परमात्मा ॥८५९॥

सांडोनि देहींची अहंता । सकळ भोग ईश्वर भोक्ता ।

ऐसी दृढ भावना भावितां । पाविजे परमार्था अपरोक्षसिद्धी ॥८६०॥

देह जड मूढ अचेतन । सकळ भोगभोक्ता ईश्वर पूर्ण ।

तेथ वाढवूनि देहाभिमान । भोगिती अज्ञान अनेक दुःखें ॥८६१॥

ते सांडूनि देह‍अहंता । हृदयस्था शरण जातां ।

पाविजे पूर्ण परमार्था । जाण तत्त्वतां नृपवर्या ॥८६२॥

निःशेष सांडिजे मीपण । याचि नांव हृदयस्था शरण ।

तूं सहजें परब्रह्म परिपूर्ण । मिथ्या देहाभिमान धरूं नको ॥८६३॥

राया येणेंचि कर्में जाण । तुटे कर्माचें कर्मबंधन ।

पाविजे पूर्ण समाधान । तें हें मुख्य लक्षण नृपनाथा ॥८६४॥

आगमोक्त निजभजन । कर्मयोगाचें मुख्य लक्षण ।

ऐकतां राजा समधान । परमानंदें पूर्ण निवाला ॥८६५॥

जंव जंव रायाचें पुरे कोड । तंव तंव कथा लागे गोड ।

अतिशयें श्रवणाची चाड । विशेषें वाड थोरावली ॥८६६॥

राजा निवालेनि परमानंदें । सुखावलेनि निजबोधें ।

लांचावलेनि स्वानंदें । पुढां प्रश्न विनोदें पुसेल ॥८६७॥

उगें राहतां आपण । उठून जाती मुनिगण ।

यालागीं प्रश्नावरी प्रश्न । विचित्रविंदान पुसतु ॥८६८॥

स्वानंदें लोधली चित्तवृत्ती । इंद्रियें वेधलीं सुखस्थितीं ।

राजा निवाला निश्चितीं । तरी प्रश्नोक्ती पुसत ॥८६९॥

पुसेल हरीचे अवतार । ते कथा सुंदर मनोहर ।

निरूपण अतिअरुवार । निजजिव्हार निववील ॥८७०॥

त्या प्रश्नाचें प्रत्युत्तर । कथाकौतुक सनागर ।

एका जनार्दनाचा किंकर । उपानहधर संतांचा ॥८७१॥

संत सज्जन कृपास्थिती । श्रीजनार्दन वरदमूर्ती ।

पुढील कथेची व्युत्पत्ती । सांगेन यथार्थी अर्थुनी ॥८७२॥

श्रीभागवताचे राशीवरी । एकाजनार्दन केला मापारी ।

तो निजबोधाचे कुडवावारीं । भरील वखारी श्रवणाच्या ॥८७३॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायंतसंवादे मायाकर्मब्रह्मनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥