श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६ वा

धर्मस्य दक्षदुहितर्यजनिष्ट मूर्त्यां नारायणो नरऋषिप्रवरः प्रशान्तः ।

नैष्कर्म्यलक्षणमुवाच चचार कर्म योऽद्यापि चास्त ऋषिवर्यनिषेविताङ्‌घ्रिः ॥६॥

जो अजन्मा नित्य त्रिभुवनीं । जो न जन्मोनि जन्मला योनीं ।

तेणें धर्माची धर्मपत्‍नी । केली जननी दक्षकन्या 'मूर्ती' ॥६७॥

ते मूर्तिमातेच्या उदरीं । नर-नारायण अवतारी ।

एकचि दोंरूपेंकरीं । धर्माच्या घरीं अवतरले ॥६८॥

तेणें नारदादिकांसी जाण । निरूपिलें नैष्कर्म्यलक्षण ।

स्वयें आचरला आपण । तें कथन ऐक राया ॥६९॥

'नारायण' म्हणसी कोणे देशीं । तो बदरिकाश्रमीं आश्रमवासी ।

नारद सनकादिक ऋषि । अद्यापि त्यापासीं सेवेसी असती ॥७०॥

त्यासी स्वस्वरूपाचें लक्ष । सहजीं असे प्रत्यक्ष ।

ते स्वरूपनिष्ठेचा पक्ष । अलक्ष्याचें लक्ष्य प्रबोधी स्वयें ॥७१॥

तया स्वरूपाचा निजबोध । स्वयें पावावया विशद ।

अद्यापवरी ऋषिवृंद । नित्य संवाद करिताति त्यासीं ॥७२॥

जें स्वरूप लक्षेना जनीं । तें विशद करूनि दे वचनीं ।

तेंचि अनुग्रहेंकरूनी । अनुभवा आणी तत्काळ ॥७३॥

ज्ञाते बहुसाल ऋषीश्वर । त्यांमाजीं नारायण‍अवतार ।

तेथ वर्तलें जें चरित्र । अतिविचित्र ऐक राया ॥७४॥