श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ८ वा

विज्ञाय शक्रकृतमक्रममादिदेवः प्राह प्रहस्य गतविस्मय एजमानान् ।

मा भैष्ट भो मदन मारुत देववध्वो गृह्णीत नो बलिमशून्यमिमं कुरुध्वम् ॥८॥

इंद्रें केला अपराध । तरी नारायणासी न येचि क्रोध ।

बापु निजशांति अगाध । न मनी विरुद्ध कामादिकांचे ॥९३॥

न येचि कामादिकांवरी कोप । इंद्रासही नेदीच शाप ।

नारायणाच्या ठायीं अल्प । कदा विकल्प नुपजेचि ॥९४॥

अपकार्‍यावरी जो कोपला । तो तत्काळ कोपें नागविला ।

अपकार्‍या जेणें उपकार केला । तोचि दादुला परमार्थी ॥९५॥

अपकार्‍यां उपकार करिती । त्याचे नांव गा परम शांति ।

ते शांतीची निजस्थिति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥९६॥

परमार्थाची मुख्यत्वें स्थिति । पाहिजे गा परम शांति ।

ते शांतीची उत्कट गति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥९७॥

भयभीत कामादिक । अप्सरागण साशंक ।

त्यातें अभयदानें सुख । देऊनियां देख नारायण बोले ॥९८॥

अहो कामवसंतादिक स्वामी । कृपा करूनि आलेति तुम्ही ।

तुमचेनि पदाभिगमीं । आश्रमभूमी पुनीत झाली ॥९९॥

तुमचें झालिया आगमन । अवश्य करावें आम्हीं पूजन ।

हेंचि आमुचें अनुष्ठान । कांहीं बळिदान अंगीकारा माझें ॥१००॥

अवो अप्सरा देवकांता । तुम्ही भेवों नका सर्वथा ।

येथ आलिया समस्तां । पूज्य सर्वथा तुम्ही मज ॥१॥

आश्रमा आलिया अतिथि । जे कोणी पूजा न करिती ।

त्यांची शून्य पुण्यसंपत्ति । आश्रमस्थिति शून्य होये ॥२॥

तुम्हीं नांगीकारितां पूजन । कांहीं न घेतां बळिदान ।

गेल्या हा आश्रम होईल शून्य । यालागीं कृपा करून पूजा घ्यावी ॥३॥

आश्रमा आलिया अतिथी । तो पूज्य सर्वांस सर्वार्थीं ।

अतिथि आश्रमीं जे पूजिती । ते आश्रमकीर्ति शिव वानी ॥४॥

व्याही रुसलिया पायां पडती । तेवीं विमुख जातां अतिथि ।

जे वंदोनियां सुखी करिती । ते सुख पावती स्वानंदें ॥५॥

व्याही रुसलिया कन्या न धाडी । अतिथि रुसलिया पुण्यकोडी ।

पूर्वापार जे कां जोडी । तेही रोकडी क्षयो पावे ॥६॥

वैकुंठीं ज्याची निजस्थिति । तो त्या आश्रमा ये नित्य वस्ती ।

जे आश्रमीं अतिथि । पूजिती प्रीतीं ब्रह्मात्मभावें ॥७॥

ऐसें बोलिला तयांप्रती । परी माझी हे अगाध शांति ।

हेही नारायणाचे चित्तीं । गर्वस्थिति असेना ॥८॥

ऐक राया अतिअपूर्व । असोनि निजशांतिअनुभव ।

ज्याच्या ठायीं नाहीं गर्व । तोचि देवाधिदेव निश्चयेंसीं ॥९॥

जो नित्य नाचवी सुरनरांसी । ज्या भेणें तप सांडिजे तापसीं ।

त्या अभय देवोनि कामक्रोधांसी । आपणापासीं राहविलीं ॥११०॥