श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १३ वा

ते देवानुचरा दृष्ट्वा स्त्रियः श्रीरिव रूपिणीः ।

गन्धेन मुमुहुस्तासां रूपौदार्यहतश्रियः ॥१३॥

या स्त्रिया देखोनि दिठीं । कामु मूर्च्छित पडिला सृष्टीं ।

वसंत घटघटां लाळ घोंटी । क्रोधाची दृष्टी तटस्थ ठेली ॥८२॥

भ्रमर विसरले झणत्कार । कोकिळा विसरल्या पंचम स्वर ।

प्राण विसरला संचार । देवानुचर भुलले ॥८३॥

देखोनि त्यांचिया स्वरुपासी । अप्सरा दिसती जैशा दासी ।

अत्यंत लज्जा झाली त्यांसी । काळिमेसी उतरल्या ॥८४॥

त्यांचे अंगींचा सुगंध वातु । तेणें भुलला वसंतु ।

मलयानिल झाला भ्रांतु । त्यांचा अंगवातु लागतां ॥८५॥

नारायणाची विद्या कैसी । जे भुलवूं आले आपणासी ।

भुली पाडिली तयांसी । योगमायेसी दावूनि ॥८६॥

सुंदरत्वें रंभा तिलोत्तमा । जिया मंदरमथनीं जिंतिलिया रमा ।

रमेहूनियां उत्तमा । उत्तमोत्तमा अतिरुपें ॥८७॥