श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १९ वा

संस्तुन्वतोऽब्धिपतितान् श्रमणानृषींश्च शक्रं च वृत्रवधतस्तमसि प्रविष्टम् ।

देवस्त्रियोऽसुरगृहे पिहिता अनाथा जघ्नेऽसुरेन्द्रमभयाय सतां नृसिंहे ॥१९॥

मार्कंडेयो एके वेळीं । बुडतां अकाळप्रळयजळीं ।

तेणें स्मरतां वनमाळी । तारी तत्काळीं 'वटपत्रशायी' ॥२२०॥

शाळिग्राम पूजितां ऋषीश्वरीं । नळ वानरु ते अवसरीं ।

देवपूजा टाकी सागरीं । चेष्टा वानरी स्वभावें ॥२१॥

तें देखोनि ऋषीश्वरीं । 'शिळा न बुडोत तुझ्या करीं' ।

ऐसा शाप ते अवसरीं । क्षोभेंकरीं दिधला ॥२२॥

तैं शाळिग्राम सागरोदरीं । तरतां देखिले ऋषीश्वरीं ।

काढावया रिघतां भीतरीं । लहरीकरीं निर्बुजले ॥२३॥

ते काळीं ऋषीश्वरीं । 'आर्तिहरण' स्तविला हरि ।

तेथ अवतरोनि श्रीहरि । ऋषीतें तारी पूजेसहित ॥२४॥

वृत्र वधिला वज्रघातें । ते ब्रह्महत्या इंद्रातें ।

तेणें दोषें तो अंधतमातें । जाण पां निश्चितें बुडत होता ॥२५॥

तेथ अवतरोनि श्रीअनंतें । चतुर्धा वांटूनि ते हत्येतें ।

शुध्द केलें इंद्रातें । कृपावंतें कृपाळुवें ॥२६॥

जिणोनियां अमरपुरें । हिरोनि देवांचीं अंतौरें ।

तीं कोंडोनियां समग्रें । मुरें महा असुरें एकंदर केलें ॥२७॥

तो मुरमर्दन श्रीहरि । यालागीं नांवें 'मुरारि' ।

देवस्त्रिया काढोनि बाहेरी । देवांच्या करीं अर्पिता झाला ॥२८॥

जो असुरांमाजीं चूडामणी । जो द्वेषियांमाजीं अग्रगणी ।

तो हरिनाम ऐकतां कानीं । अतिक्षोभें मनीं प्रज्वळों लागे ॥२९॥

जो पूर्ण क्रोधाचा उदधि । जो अविवेकाचा महानिधि ।

जो हरि स्मरे त्या पुत्रातें बाधी । गर्वमदीं उन्मत्त ॥२३०॥

तो हिरण्यकशिपु नखधारीं । स्वयें निवटी 'नरकेसरी' ।

जो निजभक्तांचा कैवारी । अभयकारी साधूंचा ॥३१॥