श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २३ वा

एवंविधानि कर्माणि जन्मानि च जगत्पतेः ।

भूरीणि भूरियशसो वर्णितानि महाभुज ॥२३॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे चतुर्थोऽध्यायः ॥४॥

जयाचीं गा अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में ।

अनंत चरित्रें अनंत कर्में । अनंतोत्तमें हरिकीर्ती ॥८४॥

अगाध भगवंताचा महिमा । त्याच्या पार नाहीं जन्मकर्मा ।

त्याचा अनुष्टुप् हा महिमा । तुज म्यां नरोत्तमा निरूपिला येथें ॥८५॥

ऐशीं अवतारचरित्रनामें । परिसतां विचित्र कर्में ।

राजा अत्यंत सप्रेमें । मनोधर्में निवला ॥८६॥

जे जे अवतारीं देवो सगुण । जाहला परी निर्गुणाचे गुण ।

प्रकट करीतचि आपण । कर्माचरण स्वयें दावी ॥८७॥

धन्य धन्य ते हरिगण । जे वर्णिती भगवद्गुण ।

ज्यांचेनि वचनें संपूर्ण । निवे अंतःकरण श्रोत्यांचें ॥८८॥

श्रोत्यांचें अवधान निवे । तेथ वक्ता स्वानंदसुख पावे ।

ग्रंथ वोसंडे स्वभावें । साहित्यगौरवें रसाळ ॥८९॥

जेवीं चंद्रकरें साचा । मुखबंध सुटे चकोरांचा ।

तेवीं एका जनार्दनाचा । संतकृपा वाचा फुटली त्यासी ॥२९०॥

जेवीं सूर्यकिरणस्पर्शें । कमळकळी स्वयें विकासे ।

तेवीं संतकृपासौरसें । ग्रंथु विकासे अर्थावबोधें ॥९१॥

तेचि कृपेनें तत्त्वतां । अर्थिलें श्रीभागवता ।

आतां पंचमाध्यायीं कथा । सावध श्रोतां अवधारिजे ॥९२॥

राजा प्रश्न करील गोड । जो परिसतां पुरेल कोड ।

साधकांची उपशमेल चाड । होय निवाड धर्माधर्माचा ॥९३॥

जेथ भजना भजनहातवटी । प्रश्नोत्तरें कथा गोमटी ।

अतिशयें रसाळ गोठी । जेणें सुटे गांठी अधर्माची ॥९४॥

तें उत्तमोत्तम निरूपण । भरीत संतांचे श्रवण ।

जनार्दनकृपा पूर्ण । एका जनार्दन सांगेल ॥९५॥

अंगीं वारियाचेन संचरणें । घुमारा घुमों लागे तेणें ।

तेवीं एकाजनार्दनें । कविता करणें निजांगें ॥२९६॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायंतसंवादे एकाकारटीकायां चतुर्थोऽध्यायः ॥४॥

श्रीकृष्णार्पणमस्तु (॥श्लोक २३॥ओंव्या॥२९६॥)