श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १ ला

श्रीराजोवाच-भगवन्तं हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमाः ।

तेषामशान्तकामानां का निष्ठाऽविजितात्मनाम् ॥१॥

राजा म्हणे जी मुनिवरा । जो भगवद्भजनीं पाठिमोरा ।

ऐशिया अभक्ता नरा । कोण दातारा गति त्यासी ॥३६॥

जे कामालागीं अतिउद्भट । जे सक्रोध क्रोधें तेजिष्ठ ।

जे अतिलोभें लोभिष्ठ । जे परम श्रेष्ठ प्रपंचीं ॥३७॥

जे गर्वाचे अग्रगणी । जे अहंकाराचे चूडामणी ।

जे विकारांची प्रवाहश्रेणी । जे उघडली खाणी विकल्पांची ॥३८॥

ज्यांचे सद्‍बुद्धिआड आभाळ । महामोहाचें सदा सबळ ।

जे छळणार्थी अतिकुशळ । जे अतिप्रबळ प्रलोभें ॥३९॥

दिवसा न देखती निश्र्चितें । ते अंधारीं देखणीं दिवाभीतें ।

तेवीं नेणोनि परमार्थातें । जे अतिज्ञाते प्रपंचीं ॥४०॥

जे नेणती आत्महित । ज्ञान विकूनि काम पोसित ।

ऐसे जे कां अभक्त । त्यांची गति निश्र्चित सांग मज ॥४१॥

तुम्हांऐसे सद्‍बुद्धी । चालते बोधाचे उदधी ।

भाग्यें लाधलों ज्ञाननिधी । हा प्रश्र्न त्रिशुद्धी सांगावा ॥४२॥;

राजा साक्षेपें बहुवस । पुसे अभक्तगतिविन्यास ।

तो सांगावया 'चमस' । सावकाश सरसावला ॥४३॥