श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६ वा

कर्मण्यकोविदाः स्तब्धा मूर्खाः पण्डितमानिनः ।

वदन्ति चाटुकान्मूढा यया माध्व्या गिरोत्सुकाः ॥६॥

न कळे विधिविधानमंत्र । कोणे कर्मीं कैसें तंत्र ।

नेणोनियां गर्व थोर । ताठा अपार ज्ञातृत्वाचा ॥८२॥

गारोडियासी विद्या थोडी । परी सर्वांगीं बिरुदें गाढीं ।

कां जाणी जाणपणें जोडी । कडोविकडीं आसनपूजा ॥८३॥

देऊनि पतंगाचे ढाळ । स्फटिकाअंगीं माणिक कीळ ।

तैसे मूर्खही केवळ । मिरविती प्रबळ ज्ञानाभिमानें ॥८४॥

आपण विधान नेणती । शेखीं सज्ञानाही न पुसती ।

कर्म आपमतीं करिती । लौकिकीं स्फिती वाढवावया ॥८५॥

मिथ्या मधुर शब्दें चाटुक । जे भोगीं अणुमात्र नाहीं सुख ।

तरी इहमुत्र भजविती लोक । अप्सरादिक भोगलिप्सा ॥८६॥

येथ भोग भोगावे चोखडे । आणि पुढें स्वर्गभोग जोडे ।

येणें वचनें बापुडे । यागाकडे धांवती ॥८७॥

कर्ता सर्वस्वें नागवो । परि आचार्यत्व आम्हां येवो ।

ऐशी यांची बुद्धि पहा हो । यागप्ररोहो आरंभिती ॥८८॥

पावावया अतिप्रतिष्ठा । नाना कर्मांच्या कर्मचेष्टा ।

करुनि दाविती खटपटा । कर्मारंभु मोठा आरंभुनी ॥८९॥

ना तरी जैसा मद्यपानी । मद्यरसा अमृत मानी ।

या वचनगोडिया मद्यपानीं । प्रवर्तिजे जनीं स्वादलिप्सा ॥९०॥

तें सेविलिया काय जोडे । थिती सावधानता बुडे ।

मग दुर्भगत्व रोकडें । पिशाचत्व गाढें अंगीं वाजे ॥९१॥

तैसें केवळ पतनात्मक । त्या नांव म्हणती स्वर्गसुख ।

जाणोनि प्रवर्तती ते मूर्ख । फळकामुक अभिलाषी ॥९२॥

उंडणी लंघू न शके भिंतीसी । तरी चढों रिघते सायसीं ।

चढतां पडे आपैसी । तेवीं स्वर्गसुखासी दृढ पतन ॥९३॥

कर्माभिनिवेशपडिपाडें । कामलोभ दृढ वाढे ।

तेणें दांभिक करणें घडे । क्रोधाचें चढे महाभरितें ॥९४॥