श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ८ वा

वदन्ति तेऽन्योन्यमुपासितस्त्रियो, गृहेषु मैथुन्यसुखेषु चाशिषः ।

यजन्त्यसृष्टान्नविधानदक्षिणं, वृत्त्यै परं घ्नन्ति पशूनतद्विदः ॥८॥

स्त्रीकामें अतिकामुक । मैथुनापरतें नाहीं सुख ।

येणें भ्रमें काममूर्ख । स्त्रिया आवश्यक उपासिती ॥११॥

यापरी मंदबुद्धी । कैसे संवादती शब्दीं ।

मनुष्यजन्में हेचि सिद्धी । नाना भोगविधी भोगाव्या स्त्रिया ॥१२॥

जें स्त्रीभोगीं सद्यसुख । तें त्यागविती ते अतिमूर्ख ।

वैराग्यमिसें लोक । ठकिले देख महामूढीं ॥१३॥

सांडूनि गृहभोग अंगना । जयां वैराग्यें उद्भट भावना ।

ते निजकर्में दंडिले जाणा । नागवूनि वना दवडिले दैवें ॥१४॥

काय गृहश्रमीं देव नसे । मग वना धांवताति पिसे ।

साचचि देव वनीं वसे । तरी कां मृग ससे न तरती व्याघ्र ॥१५॥

घालोनियां आसनें । देवो भेटता जरी ध्यानें ।

तरी बकाचीं पाळिंगणें । कां पां तत्क्षणें नुद्धरती ॥१६॥

एकान्त रहिवास विवरीं । तेथचि भेटता श्रीहरी ।

तरी न तरोनियां उंदिरीं । कां पां घरोघरीं चिंवताती ॥१७॥

देवो सर्वज्ञ चोखडा । तेणें पशुपक्षियां केला जोडा ।

तोही लोकीं मानूनियां वेडा । त्यागाचा गाढा पाडिला मोळा ॥१८॥

'आनंदा उपस्थ एकायतन' । हें देवाचें वेदवचन ।

तेंही न मानूनि अज्ञान । त्यागाचें संपूर्ण मांडिती बंड ॥१९॥

मैथुनीं परम सुख । देवेंचि रचिलें देख ।

तेंही त्यागोनियां मूर्ख । वीतरागें लोक संन्यासी होती ॥१२०॥,

जे जगामाजीं केवळ पिशी । ते स्वयें होती संन्यासी ।

देवें दंड देऊनि त्यांसी । लाविलें भिकेसी दारोदारीं ॥२१॥

त्यागोनियां निजस्त्रियेसी । कर्मत्यागें होती संन्यासी ।

तो स्त्रीशाप बाधी त्यांसी । मागतां भिकेसी पोट न भरे ॥२२॥

हातावरी पावले दंड । खांडमिशा केलें मुंड ।

हिंडती भगवीं गुंडगुंड । हा स्त्रीशापें वितंड विटंबु केला ॥२३॥

घेऊनियां दोहीं हातीं । उदंड गांडीसी लाविती माती ।

त्रिकाळ जळीं बुडविजती । ऐसी स्त्रीशापें ख्याती लाविली त्यांसी ॥२४॥

लंगोटी लाविली गांडीसी । झोळीं लाविली हातासी ।

त्याहीवरी दंड देऊनि त्यासी । स्त्रीशापें संन्यासी लाविले भिके ॥२५॥

स्त्रीसुखापरतें नाहीं सुख । स्त्रीत्यागापरता नाहीं दोख ।

हेंचि नेणोनियां मूर्ख । दंडिले अनेक वैराग्य त्यागें ॥२६॥

स्त्रीसंगेंवीण विविध भोग । ते जाणावे अतिउद्वेग ।

निजभाग्यें जे सभाग्य साङग । ते स्त्रीयोगें भोग भोगिती नाना ॥२७॥

हेंचि देवाचें प्रसन्न होणें । जे सदा इष्ट भोग भोगणें ।

ते भोग जेणें त्यागणें । तेंचि क्षोभणें देवाचें ॥२८॥

स्त्रियादि भोग त्यागिले रोकडे । पुढें निजमोक्ष हें वचन कुडें ।

यापरी भोळे लोक बापुडे । वैराग्यवादें फुडें नाडिले येथ ॥२९॥

ऐसऐसिया अनुवादा । करिती परस्परें संवादा ।

म्हणती त्यागाची बुद्धि कदा । आम्हांसी गोविंदा देऊं नको ॥१३०॥

त्याग करोनि भीक मागणें । यापरीस भलें मरणें ।

मुक्ति देखिली नाहीं कोणें । आपदा भोगणें जग देखे ॥३१॥

कोणासी तरी मुक्ती । कोठें तरी देखिजेती ।

तरी ते साच मानूं येती । मिथ्या वदंती वैराग्यत्यागा ॥३२॥

ऐशी सदा त्यागाची करुनि निंदा । भोग भोगावे म्हणती सदा ।

ऐस‍ऐशिया आशीर्वादा । देती सदा स्वाध्यायासी ॥३३॥;

स्त्रीसुख परम मानून । स्वयें सदा होती स्त्रैण ।

मग जागृती सुषुप्ति स्वप्न । स्त्रियेचें ध्यान अहर्निशीं ॥३४॥

नाहीं सद्गुरुचें भजन । नाहीं वृद्धासी पूजन ।

नाहीं अतिथींसी अन्न । स्त्रीआधीन सर्वस्वें ॥३५॥

स्त्रियेचें दुखवूं नेदी मन । कदा नुल्लंघी स्त्रियेचें वचन ।

नित्य स्त्रियेचें अनुसंधान । सद्भावें उपासन स्त्रियेचें सदा ॥३६॥

नाहीं कुळदेवता कुळवृत्ती । नाहीं पिता-माता-सद्गुरुभक्ती ।

संपत्ति वोपी स्त्रियेहातीं । आपण सर्वार्थीं तीअधीन वर्ते ॥३७॥

ते स्त्रीभोग भोगावयासी । धनार्जन अर्जावयासी ।

यागु आरंभी जीविकेसी । केवळ दंभेंसीं उदरार्थ ॥३८॥;

(पूर्वश्लोकार्ध) - ’यजन्त्यसृष्टान्नविधानदक्षिणं वृत्त्यै परं घ्नन्ति पशूनतद्विदः ।’

यागें व्हावी सर्वसिद्धि । हेही नाहीं दृढ बुद्धि ।

रोकडिये जीविकावधि । उपाय त्रिशुद्धी हाचि केला ॥३९॥

यज्ञदीक्षेची प्रतिष्ठा । तेणें पूज्य होईन वरिष्ठां ।

अग्रपूजा माझा वांटा । ऐशिया उत्कंठा आदरी यागु ॥१४०॥

ऐशिया नाना विवंचना । आधीं संकल्पूनि मना ।

मग प्रवर्ते यागयजना । जोडावया धना कृतनिश्र्चयो ॥४१॥

न पाहे विधिविधाना । नाहीं आदरु मंत्रोच्चारणा ।

न करी अन्नसंपादना । कोरडे कणां हवन मांडी ॥४२॥

मी यज्ञ करितों अंगें । ऐसें जगापासीं सांगे ।

आणि तेणें यागयोगें । चालवी प्रसंगें जीविकायोगु ॥४३॥

स्वयें नेणती विधिविधाना । आणि न पुसती सज्ञाना ।

परी पशूंचिया हनना । प्रवर्तती जाणा शठ नष्ट दंभें ॥४४॥

मग तेथींचा पुरोडाश । सेविती यथासावकाश ।

आम्ही पवित्र झालों निर्दोष । ऐसाही उल्हास लागती करुं ॥४५॥

गौणता आवाहनविसर्जना । तेथ कैंची पूजा दक्षिणा ।

सत्पात्राची अवगणना । करिती हेळणा ज्ञानगर्वें ॥४६॥

केवळ जीविकेच्या आशा । करुं लागती पशुहिंसा ।

आम्ही याज्ञिक या आवेशा । पिटिती ठसा तिहीं लोकीं ॥४७॥

केवळ जीविकेचिया दुराशा । अविधी करिती पशुहिंसा ।

मज दोष होईल ऐसा । कंटाळा मानसा कदा नुपजे ॥४८॥