श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १० वा

सर्वेषु शश्वत्तनुभृत्स्ववस्थितं, यथा स्वमात्मानमभीष्टमीश्वरम् ।

वेदोपगीतं च श्रृण्वतेऽबुधा, मनोरथानां प्रवदन्ति वार्तया ॥१०॥

जो सर्व भूतांचे ठायीं । निरंतर अंतर नाहीं ।

समसाम्यें सर्वदा पाहीं । उणापुरा कदाही कल्पांतीं नव्हे ॥९२॥

जो सर्वांमाजीं असे सर्वदा । परी सर्वपणा नातळे कदा ।

जेवीं पद्मपत्र जलस्पंदा । अलिप्त बुद्बुदा असोनि संगें ॥९३॥

तेवीं असोनि सकळ जनीं । घसवटेना जनघसणीं ।

नभ जैसें अलिप्तपणीं । नरचूडामणी सबाह्य ॥९४॥

तैसें अलिप्तपण न मोडे । परी रची अनंत ब्रह्मांडें ।

तें ब्रह्मांड अंडें प्रचंडें । वागवी उदंडें अकर्तात्मयोगें ॥९५॥

यालागीं तो 'अंतर्यामी' । अभिधान बोलिजे नित्य निगमीं ।

जो सर्वांच्या हृदयग्रामीं । चेतनानुक्रमीं लक्षिजे ॥९६॥

त्या ईश्र्वरातें नित्य ध्यातां । कां आवडीं नाम मुखीं गातां ।

तरी अभीष्ट मनोरथां । होय वर्षता अखंडधारीं ॥९७॥

त्या ईश्र्वराच्या गातां गोष्टी । सर्व अनिष्टां होय तुटी ।

जो देखतांचि दृष्टीं । स्वानंदसृष्टि तुष्टला वर्षे ॥९८॥

एवं सुखदाता तोचि शास्ता । जो कां अंतकाचा नियंता ।

अकाळें काळही सत्ता । ज्या भेणें सर्वथा करुं न शके ॥९९॥

श्र्वासोच्छ्‍वासांचिया परिचारा । ज्या भेणें नेमस्त वाजे वारा ।

ज्याचेनि धाकें धरा । न विरवे सागरा जळीं असतां ॥२००॥

ज्याचे आज्ञेवरी जाण । सूर्य चालवी दिनमान ।

ज्याचे पुरातन आज्ञेभेण । समुद्र आपण रेखा नुल्लंघी ॥१॥

ज्यातें सदा गायिजे वेदीं । जो वाखाणिजे उपनिषदीं ।

ज्याची पवित्र कीर्ति दुर्बुद्धी । स्वयें त्रिशुद्धी नायकती कदा ॥२॥

ज्याचें नाम स्मरतां जाण । सकळ दोषां निर्दळण ।

ज्याचे कृतांत वंदी चरण । जन्ममरण विभांडी ॥३॥

ज्याची कथा कर्णपुटीं । पडतां विकल्पांचिया कोटी ।

निर्दळूनि उठाउठी । पाडी मिठी परब्रह्मीं ॥४॥

यापरी जो पवित्र मूर्ती । ज्यालागीं वेद सदा वर्णिती ।

अभाग्य नायकती त्याची कीर्ती । वार्ता करिती मनोरथांच्या ॥५॥

अस्वल आपुलिया गुणगुणा । नायके वाजतिया निशाणा ।

तेवीं नायकोनि हरीच्या गुणा । विषयसंभाषणा आदरें वदती ॥६॥

यालागीं ते अतिमंद । अविनीत सदा स्तब्ध ।

विषयांलागीं विषयांध । अतिलुब्ध लोलुप्यें ॥७॥;