श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ११ वा

लोके व्यवायामिषमद्यसेवा नित्यास्तु जन्तोर्न हि तत्र चोदन ।

व्यवस्थितिस्तेषु विवाहयज्ञसुराग्रहैरासु निवृत्तिरिष्टा ॥११॥

वेदें न करितां प्रेरणा । विषयांवरी सहज वासना ।

स्वभावें सकळ जनां । सदा जाण सर्वांसी ॥८॥

मांससेवना मद्यपाना । मिथुनीभूत मैथुना ।

ये अर्थीं सर्व जनां । तीव्र वासना सर्वदा ॥९॥

तेथें सेव्यासेव्यपरवडी । विवंचना कोण निवडी ।

लागली विषायांची गोडी । ते अनर्थकोडी करितील ॥२१०॥

आगी लागलिया कापुसा । विझवितां न विझे जैसा ।

तेवीं विषयवंता मानसा । विवेकु सहसा उपजेना ॥११॥

झाल्या लोलिंगत बडिशा । निजमरण विसरे मासा ।

कां मुठी चणियांच्या आशा । नळीमाजीं आपैसा वानरु अडके ॥१२॥

दूध मिळालिया मांजर । न म्हणे द्विज‍अंत्यजघर ।

तेवीं विषय‍उन्मत्त नर । न करिती विचार सेव्यासेव्य ॥१३॥

कां खवळल्या विषयचाडें । योनिसंकरु घडेल पुढें ।

यालागीं वेदें चोखडे । वर्णाश्रमपाडें विभाग केले ॥१४॥

जैसें अफाट पृथ्वीचें अंग । तेथें सप्तद्वीपें करुनि विभाग ।

मग भिन्नाधिकारें चांग । धरा साङग आक्रमिली ॥१५॥

कां अनावृत मेघजळा । धरणें धरुनि घालिजे तळां ।

मग नेमेंचि ढाळेढाळां । पिकालागीं जळा काढिजे पाट ॥१६॥

आणि पवना नादाकारा । साधूनि कीजे वाजंतरा ।

मग जेवीं नाना ध्वनी मधुरा । वाजविजे यंत्रा सप्त स्वरें ॥१७॥

तैसें उच्छृंखळां विषयांसी । वेदें नेमिलें नेमेंसीं ।

तेचि वेदाज्ञा ऐशी । ऐक तुजपासीं सांगेन ॥१८॥;

आवरावया योनिभ्रष्टां । मैथुनीं विवाहप्रतिष्ठा ।

लावूनियां निजनिष्ठा । वर्णवरिष्ठा नेमिले ॥१९॥

ब्राह्मण जातां रजकीपासीं । ते तंव कडू न लगे त्यासी ।

रजक जातां ब्राह्मणीपाशीं । तिखट त्यासी ते न लगे ॥२२०॥

भलती स्त्री भलता नर । मैथुनीं होय वर्णसंकर ।

तो चुकवावया प्रकार । विवाहनिर्धार नेमिला वेदें ॥२१॥

धर्मपत्‍नीपाणिग्रहण । विवाह नेमिला सवर्ण ।

तेथें सप्तम पंचम त्यजून । स्वगोत्रीं लग्न करूं नये ॥२२॥

तीन्ही वेद तीन्ही वर्ण । वेदें सांडूनियां जाण ।

सवेद आणि सवर्ण । पाणिग्रहण नेमिलें ॥२३॥

कन्या सवेद सवर्ण । जीसी नाहीं रजोदर्शन ।

तेही पित्यापासीं याचून । करावें लग्न विधानोक्त ॥२४॥

धर्म-अर्थ-कामाचरण । अन्यत्र न करावें आपण ।

ऐशी वाहूनियां आण । पाणिग्रहण वेदोक्त ॥२५॥

करितां वधूवरां पाणिग्रहण । साक्षी द्विज-देव-हुताशन ।

इतर स्त्रिया मातेसमान । स्वदारागमन नेमिलें वेदें ॥२६॥

एवं नेमूनियां विवाहासी । वेदरायें दिली आज्ञा ऐशी ।

सांडूनि सकळ स्त्रियांसी । स्वदारेपाशीं मैथुन ॥२७॥

दिवा मैथुन नाहीं स्त्रियांसी । रात्रीं त्यजूनि पूर्वापर प्रहरांसी ।

मैथुन स्त्रियेपासीं । मध्यरात्रीसी नेमस्त ॥२८॥

नेमिलें स्वदारामैथुन । तेंही अहोरात्र नाहीं जाण ।

प्रजार्थ स्त्रीसेवन । ऋतुकाळीं गमन नेमस्त ॥२९॥

ऋतुकाळीं ज्यां स्त्रीगमन । ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण ।

वेद निवृत्तिपर जाण । त्यागरूपें आपण भोगातें नेमी ॥२३०॥

'आत्मा वै पुत्रनामासि' । पुत्र झालिया स्त्रियेसी ।

संग करूं नये स्त्रीपासीं । शनैःशनैः विषयांसी त्यागवी वेद ॥३१॥;

सेवावया आमिषा । वेदें नेमु केला कैसा ।

न घडावया पशुहिंसा । संकट आयासा स्वयें द्योती ॥३२॥

आवडीं खावया मांसा । अथवा स्वर्गाचिया आशा ।

जे करिती पशुहिंसा । तयां पुरुषां अधःपतन ॥३३॥

निष्काम कर्मीं पशुहिंसा । करी तरी तो निष्काम कैसा ।

तेथ निगमाचा नेमु ऐसा । मुख्य अहिंसा सर्व धर्मीं ॥३४॥

नित्य न करावया मांसभक्षण । यज्ञीं पुरोडाशसेवन ।

तेंहि परिमित जाण । स्वेच्छा मांसादन वारिलें वेदें ॥३५॥

याग करूनि 'सौत्रामणी' । प्रवर्तावें सुरापानीं ।

हे वेदाज्ञा जो सत्य मानी । तो स्वधर्माचरणीं नागवला ॥३६॥

जे कर्मीं मद्यपान घडे । तो स्वधर्म म्हणतां जीभ झडे ।

लोलुपते भुलले बापुडे । वेद विषयांकडे वोढिती ॥३७॥

यागु करितां सोत्रामणी । स्वयें न व्हावें मद्यपानी ।

तें यज्ञशेष अवघ्राणीं । परी सर्वथा वदनीं घालूं नये ॥३८॥

हे विषयांचें त्रिविध विंदान । मैथुन-मांसभक्षण-सुरापान ।

यदर्थीं निवृत्तीचि प्रमाण । हें मनोगत पूर्ण वेदाचें ॥३९॥

विषयांपासूनि निवृत्ती । वेद विभागें हेंचि द्योती ।

परी धरावी विषयासक्ती । हे वेदोक्ति सर्वथा न घडे ॥२४०॥

वेंचोनियां निजधन । करोनियां विवाह यज्ञ ।

सेवावें मद्य-मांस-मैथुन । हें वेदवचन कदा न घडे ॥४१॥