श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १३ वा

यद्‌ घ्राणभक्षो विहितः सुरायास्तथा पशोरालभनं न हिंसा ।

एवं व्यवायः प्रजया न रत्या इमं विशुद्धं न विदुः स्वधर्मम् ॥१३॥

वेदविहित कर्माचरण । तेथ सर्वथा नव्हे पतन ।

जेथ चुके वेदविधान । तेथें पावे पतन सज्ञान ॥६१॥

वेदींच्या अर्थवादासरिसा । मनीं बांधोनि भोगाशा ।

यज्ञमिषें पशुहिंसा । भोगलिप्सा करुं धांवती ॥६२॥

वेदें बोलिलें 'आलभन' । त्या नांव म्हणती पशुहनन ।

हें सकाम मानिती विधान । निष्कामा हनन कदा न घडे ॥६३॥

निष्कामासी यागयजन । स्वधर्मार्थ करावे यज्ञ ।

तेथ पशूचें आलभन । सर्वथा हनन करूं नये ॥६४॥

पशूचें करूं नये हनन । देवतोद्देशें अंगस्पर्शन ।

या नांव बोलिजे 'आलभन' । हें यज्ञाचरण निष्काम ॥६५॥

हरिश्र्चंद्राच्या यागीं । शुनःशेप-पशुप्रसंगीं ।

तेणें घावो लागों नेदितां अंगीं । वेदोक्त प्रयोगीं यज्ञसिद्धी केली ॥६६॥

वेदोक्तमंत्रभागार्थ । देव सुखी करोनि समस्त ।

आपण झाला निर्मुक्त । हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणीं ॥६७॥

यापरी पशुघात । यज्ञीं न लगे निश्र्चित ।

तो हरिश्र्चंद्र यागार्थ । पशुघात निवारी ॥६८॥

तेथ मीमांसकांचें मत । देवतोद्देशें जो पशुघात ।

या नांव 'आलभन' म्हणत । स्वर्गफलार्थ आवश्यक ॥६९॥

केवळ मांसभक्षणार्थ । जे करिती पशुघात ।

हिंसादोष तेथें प्राप्त । ऐसें बोलत मीमांसक ॥२७०॥

देवतोद्देशें पशूंचा घात । तेणें स्वर्गभोग होय प्राप्त ।

तोही भोगक्षयें क्षया जात । तेणें हिंसा प्राप्त याज्ञिकां ॥७१॥

याग करितां 'सौत्रामणी' । पुरोडाश घ्यावा अवघ्राणीं ।

परी प्रवर्तावें सुरापानीं । हें वेदविधानीं असेना ॥७२॥

एवं जेथें पशुहनन । तें कर्म सदोष पूर्ण ।

यालागीं तेथ अधःपतन । बोलिलें जाण याज्ञिकांसी ॥७३॥

वेदें विहिलें पाणिग्रहण । तें प्रजार्थ स्वदारागमन ।

परी रत्यर्थ नित्य मैथुन । हे वेदाज्ञा जाण असेना ॥७४॥

मद्य-मांस-मैथुनप्रसंग । स्व‍इच्छा न करावया भोग ।

वेदें द्योतिला विवाह याग । भोगत्यागनियमार्थ ॥७५॥

नेणोनि ऐसिया शुद्ध घर्मा । यागमिषें अधर्मा ।

प्रवर्तोनि काम्यकर्मा । भोग संभ्रमा भोगिती मूर्ख ॥७६॥