श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३९ व ४० वा

क्वचित् क्वचिन्महाराज, द्रविडेषु च भूरिशः ।

ताम्रपर्णी नदी यत्र, कृतमाला पयस्विनी ॥३९॥

कावेरी च महापुण्या, प्रतीची च महानदी ।

ये पिबन्ति जलं तासां, मनुजा मनुजेश्वर ।

प्रायो भक्ता भविष्यन्ति वासुदेवोऽमलाशयाः ॥४०॥

विशेषें द्रविड देशाचे ठायीं । अतिशयें भक्ति वाढेल पाहीं ।

तेथेंही तीर्थविशेष भुयी । ते ते ठायीं अतिउत्कट ॥५१॥

ताम्रपर्णीच्या तीरीं । हरिभक्तीची अगाध थोरी ।

कृतमालेच्या परिसरीं । उत्साहेंकरीं हरिभक्ति नांदे ॥५२॥

निर्मळजळा पयस्विनी । जीचिये पयःप्राशनीं ।

वृत्ति वाढे हरिचरणीं । भगवद्भभजनीं दृढ बुद्धी ॥५३॥

देखतां कावेरीची थडी । पळती पापांचिया कोडी ।

जेथ श्रीरंगु वसे आवडीं । तेथें भक्ति दुथडी उद्भट नांदे ॥५४॥

प्रतीचीमाजीं देतां बुडी । चित्तशुद्धि जोडे रोकडी ।

भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठीं उभारे ॥५५॥

ऐकें नरवरचूडामणी । या पंचनदींचिया तीर्थस्त्रानीं ।

अथवा पयःप्राशनीं । भगवद्भजनीं दृढ बुद्धी ॥५६॥

या तीर्थांचें केल्या दर्शन । होय कलिमलक्षालन ।

केल्या स्त्रान पयःप्राशन । भगवद्भजन उल्हासे ॥५७॥

दर्शन स्पर्शन स्त्रान । या तीर्थींचें करितां जाण ।

वासुदेवीं निर्मळ भजन । नित्य नूतन दृढ वाढे ॥५८॥

यापरी जे भगवद्भक्त । ते ऋणत्रयासी निर्मुक्त ।

सुरनरपितरां पंगिस्त । हरिभक्त कदा नव्हती ॥५९॥