श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४५ वा

त्वमप्येतान्महाभाग, धर्मान् भागवतान् श्रुतान् ।

आस्थितः श्रद्धया युक्तो, निस्सङ्‌गो यास्यसे परम् ॥४५॥

सकळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती ।

ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती क्रीडत ॥९६॥

वसुदेवा तुझेनि नांवें । देवातें 'वासुदेव' म्हणावें ।

तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे निरसती दोष ॥९७॥

येवढ्या भाग्याचा भाग्यनिधि । वसुदेवा तूंचि त्रिशुद्धि ।

तुवां भागवतधर्माचा विधि । आस्तिक्यबुद्धीं अवधारिला ॥९८॥

श्रद्धेनें केलिया वस्तुश्रवणा । मननयुक्त धरावी धारणा ।

तैं निःसंग होऊनियां जाणा । पावसी तत्क्षणा निजधामासी ॥९९॥

जया निजधामाच्या ठायीं । कार्य कारण दोन्ही नाहीं ।

त्या परम पदाचे ठायीं । निजसुखें पाहीं सुखरूप होसी ॥५००॥