श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५० वा

भूभारासुरराजन्यहंतवे गुप्तये सताम् ।

अवतीर्णस्य निर्वृत्यै, यशो लोके वितन्यते ॥५०॥

काळयवनादि असुर । कां जरासंधादि महावीर ।

अथवा राजे अधर्मकर । अतिभूभार सेना ज्यांची ॥३५॥

तो उतरावया धराभार । धर्म वाढवावया निर्विकार ।

संतसंरक्षणीं शार्ङगधर । पूर्णावतार श्रीकृष्ण ॥३६॥

प्रतिपाळावया निजभक्तांसी । सुख द्यावया साधूंसी ।

अवतरला यदुवंशीं । हृषीकेशी श्रीकृष्ण ॥३७॥

तो असुरगजपंचाननु । सज्जनवन‍आनंदघनु ।

तुमच्या उदरीं श्रीकृष्णु । अवतार पूर्णु पूर्णांशेंसीं ॥३८॥

उद्धरावया त्रिजगती । थोर उदार केली कीर्ती ।

ज्याच्या अवताराची ख्याती । पवाडे पढती ब्रह्मादिक ॥३९॥

तरावया अतिदुस्तर । ज्याची कीर्ति गाती सुरनर ।

परमादरें ऋषीश्र्वर । कृष्णचरित्र सर्वदा गाती ॥५४०॥

ज्याचें नाम स्मरतां भक्त । कळिकाळ नागवत ।

तो अवतार श्रीकृष्णनाथ । तुम्हांआंत प्रगटला ॥४१॥

श्रीकृष्ण परब्रह्मैकनिधी । त्यासी पाहूं नका बाळबुद्धीं ।

इतुकेन तुम्ही भवाब्धी । जाणा त्रिशुद्धी तरलेती ॥४२॥

ऐशी श्रीकृष्ण‍अवतारकथा । नारद वसुदेवा सांगतां ।

शुक म्हणे गा नृपनाथा । विस्मयो समस्तां थोर झाला ॥४३॥