श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५१ वा

शुक उवाच-एतच्छ्रुत्वा महाभागो वसुदेवोऽतिविस्मितः ।

देवकी च महाभागा जहतुर्मोहमात्मनः ॥५१॥

निमिजायंत मुनिगण । इतिहास पुरातन जीर्ण ।

कृष्ण परमात्मा ब्रह्म पूर्ण । नारद आपण निरूपी हर्षें ॥४४॥

शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि नारदावचनोक्ती ।

देवकीवसुदेवो चित्तीं । अतिविस्मितीं तटस्थ ॥४५॥

तया नारदाचेनि वचनें । कृष्ण परमात्मा बोलें येणें ।

देवकी वसुदेव निजमनें । दोघें जणें विस्मित ॥४६॥

तीं परम भाग्यवंत दोन्ही । जो पुत्रस्नेहो होता श्रीकृष्णीं ।

तो सांडोनियां तत्क्षणीं । कृष्णपरब्रह्मपणीं निश्र्चयो केला ॥४७॥

श्रीकृष्णीं ब्रह्मभावो । धरितां निःशेष मोहस्नेहो ।

हृदयींचा निघोनि गेला पहा हो । बाप नवलावो भाग्याचा ॥४८॥